‘अडगळीत गेलेले शब्द

‘अडगळीत गेलेले शब्द’ हे शीर्षक लिहिताच लक्षात आले की ‘अडगळ’ हा शब्दच अडगळीत गेला आहे.पूर्वी प्रत्येक घरात एक अडगळीची खोली असायची.सगळ्या नको असलेल्या,परंतु कधीतरी कामास येणार्‍या वस्तू तेथे जाऊन पडायच्या.पण 1 BHK अथवा 2 BHK¨च्या जमान्यात अडगळ सरळ भंगारवाल्याकडे जाते. वास्तुशास्त्राच्या दृष्टीने तेच योग्य आहे असे म्हणतात. काय योग्य,काय अयोग्य, हा प्रश्न वेगळाच; पण काळानुसार खूपच शब्द अडगळीत गेले आहेत हे खरे.

जुनी घरे आठवताच तसे शब्द खूपच आठवायला लागतात. ओटी, पडवी, परसू, माजघर, कोठीघर हे शब्द विसरायला झाले आहेत.‘वळचण’ हा असाच एक अडगळीत गेलेला शब्द. वळचण म्हणजे छपराचा भिंतीच्याही पुढे आलेला भाग. ऊन-पावसापासून घराचे संरक्षण होण्यासाठी तो तसा ठेवलेला असायचा. घराची वळचण ही गुरा-ढोरापासून आगंतुकापर्यंत सगळ्यांचं विसाव्याचं ठिकाण होतं. कोणीही तेथे विश्रांती घ्यावी असं.

 ‘फडताळ’ ..... फडताळ म्हणजे भिंतीतील कपाट. खुंटी, कोनाडे, देवड्या हे असेच अडगळीत गेलेले शब्द.घरात माळा असायचा.  त्याला ‘आटळा’ म्हणायचे.जुन्या घरातील न्हाणीघर (बाथरूम) असंच. ऐसपैस चुलाण्यावर पंचवीस-तीस लिटरचा हंडा तापत असायचा. दगडी चौरंग, अंग घासायला ‘वज्री’, ‘घंगाळ’ असायचे. तेही असेच कालबाह्य झाले.

गृहिणीची कुंकवाची पेटी, त्यातील आरसा, फणी, करंडा, मेणाच्या डाबल्या सहित गडप झाली.सामान्य स्त्रीला शृंगारासाठी एवढं साहित्य पुरेसं व्हायचं. लहान मुलीच्या वेण्या घट्ट लोकरीच्या धाग्याने बांधल्या जायच्या, त्याला ‘आगवळ’ म्हणायचे. हाही शब्द अडगळीतच गेलेला.

स्वयंपाकघरातील चूल गेली त्याचबरोबर चूल,वैल,निखारे हे शब्दही गेले. स्वयंपाकघरातील सतेली, तपेली, कथली, रोळ्या, गंज हे शब्द आठवेनासे झाले. ओगराळं हा शब्दही असाच अडगळीत गेलेला. पंचपाळे, चौफुले, कावळे हे सगळे हरवले. ‘काथवट’हा शब्द तर इतिहासजमा झालेला. काथवट म्हणजे लाकडी परात, हिंदीतली ‘मन में चंगा तो कथोटी में गंगा’ ही म्हण त्यावरूनच आलेली.

कपड्यांचा विचार करताना तठव,जाजम,सुताडे सगळे हरवून गेलेले.सोवळ्यात नेसण्याचा पितांबर हा शब्द ऐकू येतो,  पण उत्तरवस्त्र ‘पाभरी’ हरवून गेली. सोवळ्यात नेसण्याची‘ धाबळी’ सोवळ्याबरोबर कालबाह्य झाली.
सोन्याचे भाव गगनाला भिडले आणि जुने सोन्याचे अलंकार विसरले गेले.

कोठीघरातील कोठय़ा आहेत; पण कणग्या,ढोल्या-ज्यात भरपूर धान्य भरलेले असायचे-त्या गडप झाल्या.

एखाद्या वर्षी जेव्हा शेतात खूपच भरपूर धान्य येईल तेव्हा अडीअडचणीसाठी अंगणात मोठेमोठे ‘पेव’ खणून त्यात ते धान्य साठविले जाई. एकेका पेवात कमीत कमी दहा-दहा पोते साठविले जाई.

‘अ’ अडकित्त्याचा हळूहळू हद्दपार होऊ घातला आहे.लाइट आले आणि अनेक तर्‍हेचे दिवे गडप झाले.काळानुसार आणि गरजेनुसार असे अनेक शब्द गडप होत असतात तसेच खूप नवेनवे शब्दही वापरात येत असतात.भाषा ही सतत समृद्धच होत असते. विकास आणि प्रगती ही सतत चालूच राहणार आहे,फक्त गेल्या अर्धशतकाच्या पूर्वी विसरल्या गेलेल्या शब्दांची सहज आठवण झाली म्हणून हा सारा शब्दप्रपंच,इतकेचः।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा