आई


आई माझा देव। आई माझा गुरू।

आई कल्पतरू। आई माझी॥ १॥


गर्भात तुझिया । वाढले निवांत ।

भासली ना भ्रांत । कशाचीच॥ २॥



थोर उपकार। आई जन्म दिले।

सोने माझ्या झाले। जीवनाचे॥ ३॥


आईचे वात्सल्य । जगाहून मोठे।

जीवनाच्या वाटे। अडले ना॥ ४॥


अमृताची धार। पाजलेस आई।

होऊ उत्तराई । सांग कशी॥ ५॥


प्राणाहूनी प्रिय। धन्य माझी आई।

नांव हो विजाई। आई माझी॥ ६॥


माझ्यासाठी देव। असे माझी आई।

आईची पुण्याई। लाभतसे॥ ७॥


स्वामी तिन्ही जगी। आईविना दीन।

सुवचन छान। सांगतसे॥ ८॥


कसं फेडू सांग। तुझे उपकार।

जीवना आकार। तुच दिले॥ ९॥


धन्य पुंडलिक। केली सेवा खरी।

पांडुरंग हरी। पाहतसे॥ १०॥


आईचे रे छत्र। सोन्याचे झालर।

मायेचा पदर। लाभलासे॥ ११॥


धन्य तोच जगी। आई ज्यास आहे।

डोळा भरू पाहे । माऊलीस॥ १२॥


आई माझी राही। थंडगार छाया।

अविरत माया । अखंडीत। १३॥


आईचे काळीज । तुटते लेकरा।

गाय रे वासरा। हंबरते॥ १४॥


संस्काराची खाण।आई रे महान

देगा देवा दान। जन्मभर॥ १५॥


वृद्धाश्रमी नका । पाठवू आईस।

आईच परीस। जीवनाची॥ 16

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा