प्रीतीची दुनिया सुहास, हसते वाऱ्यावरी भाबडी;

स्वानंदें रमते समुत्सुक जनीं निर्हेतुका बापुडी;

अद्वैतांतिल मंजु गीत-रव तो आलापुनी गुंजनीं,

राही मग्न अशीच गोड अपुल्या स्वप्नांत रात्रंदिनीं.

आशांची बकुलावली विकसली मंदस्मितें भोवती;

ईषत्कंपितकल्पनाकिसलयीं निष्काम डोलेल ती !

चाखावा मकरंद त्यांतिल जरा; जावें, झुलावें जरा;

शंकाही नच की कधी वठुनि हा जाईल गे मोगरा.

सौख्याभाव नि सौख्य एकच इथे संवेदनाजीवनीं;

नीती आणि अनीति संभ्रम फिटे स्नेहार्द्र संभावनीं;

संध्यादेवि उषेसह प्रगटते आकाल निलांबरीं;

येई गे, अजरामत्व मरुनी निर्वेध ताऱ्यांपरी.


नाही हें नशिबीं ! — नसोच ! — मिटती जागेपणीं पापण्या;

आई ! येत म्हणून मस्तक तुझ्या अंकावरी ठेवण्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा