तू भ्रमत आहासी वाया - वपू काळे

1. रडणं म्हणजे दुबळेपणाचं लक्षण नव्हे. मोकळेपणी रडायला धैर्य लागतं.


2. हसता हसता माणूस एका क्षणात थांबू शकतो. दुःखातली व्यक्ती रडणं एका क्षणात विसरू शकत नाही

3. एकाकीपण वेगळं, एकांत वेगळा. परिसराचं मौन म्हणजे एकांत. आणि परिवारात असतानाही निराधार वाटणं हे एकाकीपण.

4. सोन्याप्रमाणे आगीतून तावून सुलाखून पार होण्याची संधी म्हणजे, असं एखादं दुःख.

5. प्रियकर परिपूर्ण असतो. नवऱ्याला मार्यादा असतात. कारण संसार हा व्यवहार आहे. प्रियकराच्या बाबतीत संपूर्ण समर्पण असतं. ‘मी’ उरत नाही म्हणून संघर्ष नसतो. संसारात तसं होत नाही.’ ‘मी’ हा शब्द प्रेमात आणि भक्तीत उरत नाही.

6. प्रचिती आली की ती तुमची तत्त्वं होतात आणि तुमची तत्त्वं इतरांची थेअरी होतात.

7. कबुतराला गरुडाचे पंख लावता येत नाहीत. कदाचित् लावता येतीलही, पण गगनभरारीचं वेड रक्तातच असावं लागतं. आकाशाची ओढही दत्तक घेता येत नाही.

8. रडताना कुणी फोटो काढत नाहीत. रडणं भोगायचं असतं. हसणं उपभोगायचं असतं. ह्याच कारणासाठी आनंदाला परिवार हवा, सगेसोयरे हवेत. आनंदाला सहल हवी, दुःखाला घर हवं.

9. एखाद्या गोष्टीच्या अज्ञानाचं जितकं शल्य नसतं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त त्या अज्ञानावर कुणी बोट ठेवलं तर होतं. हे बोट जर अधिकारी व्यक्तीनं ठेवलं तर जळजळ जरा कमी. निदान मग ती व्यक्ती किमान देखणी हवी.

10. ज्या गोष्टींवर प्रेम करण्यात रिस्क नाही अशा गोष्टींवर प्रेम करणारी माणसं खूप असतात. खरं तर ते प्रेमच नाही. त्याला मालकी म्हणतात. कारण ते प्रेम सुरक्षित असतं. तिथं समर्पणाचा प्रश्न उद्‌भवत नाही

11. स्वतःजवळ जे असतं तेच माणूस दुसऱ्याला देऊ शकतो

12. ज्ञानी माणूस हयात असतो, तोपर्यंत तो धोकादायकच असतो. तो ढोंगांवर प्रहार करत राहतो. तो गेल्यावर त्याच्यापासून कसलाच वैचारिक उपद्रव नाही. मग त्याच्या आरत्या गायच्या, अभंग म्हणायचे, शेवटी पुतळे उभे करायचे. ज्ञानी माणसांना त्यांच्या हयातीत आणि मेल्यावरही कावळ्यांच्याच सहवासात राहावं लागतं. जिवंतपणी चोचा मारणारी माणसं आणि पुतळ्यांच्या नशिबी...

13. अगदी क्षुल्लक कारणासाठी, वेळ निभावून नेण्यासाठी माणसं इतकं खोटं बोलतात की तो त्यांचा स्वभावधर्म बनतो. अशी माणसं सतत मग तणावाखाली वावरतात.

14. पागल झाल्याशिवाय प्रेम संभवतच नाही. जिथं हिशोब नसतो, विचार नसतो, संयम नसतो, तिथंच प्रेमाचा उगम होतो. प्रेम महापुरासारखं असतं. तिथं किनारे हरवतात. जिथं तर्क आहे, तिथं स्वतःचा बचाव आला.

15. वस्तुत्त्वानं असणं आणि अस्तित्त्वानं असणं ह्यात फरक आहे.

16. ऑफिस म्हणा, घर म्हणा, तिथं वास्तुपेक्षा आपण मोठे असतो. मालकीचा अहंकार तिथं बोलतो. आपण क्षुद्र आहोत ह्याची जाणीव स्वतःला करून देण्यासाठीच समुद्राजवळ बसायचं असतं. निसर्गाची प्रत्येक निर्मिती भव्यच असते.

17. कोणत्याही माणसाला फसवणारा दुसरा माणूस नसतो. कुणाची हिंमतच नसते. आपण गुलाम व्हायला तयार असतो, तिथं फसतो. कोणत्याही क्षणी आपण आपलं मालक असलो पाह्यजे.

18. वस्तू वापरण्यापेक्षा, ती आपल्यापाशी आहे, ह्याचाच आनंद.

19. सर्वात मोठा धर्म कोणता ? -तर ‘प्राण आहे तोपर्यंत जगणं’ हाच धर्म मोठा.

20. निसर्ग रोज बदलतोय आणि निसर्गाचीच एक निर्मिती असूनही माणसाला उबग येतो, ह्याचं कारण काय ? -तर कालचा दिवस तो आजही घट्ट धरून ठेवतो. भूतकाळावर अलोट प्रेम. पार केलेलं दु:खही आठवत बसायचं

21. जो तुमचा आनंद वाढवतो, तो धर्म.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा