घंटी वाजली, शाळा सुटली आन् तुंबून धरल्यालं पाणी फुटावं, तसं दारातोंडून पोरं वाहात सुटली. शाळेच्या समद्या पटांगणात चुरमुरं उधळल्यागत झालं. घोळक्या-घोळक्यानं रस्तं तुंबत चाललं. पेठातली पोरं पेठात घुसली. घरं जवळ करीत निघाली. बर्या घरच्या सायकली घंट्या वाजवीत गर्दीतून वळण घेत सकळनं निघाल्या. उगचच आपून आपल्याला आवकीत-जवकीत साळुंक्यांच्या थव्यागत निघालेल्या पोरींनी सम्दा रस्ता कालवून सोडला. मास्तरं-प्राध्यापकं सावकाशीनं पाय उचलीत गप्पा मारीत निघाली व्हती... आम्ही खेड्यावरची पोरं दप्तरं पाठशी टाकून निघालाव. कुणी आडतीकडं आपलं कुणी आलंय का मनून निघालं, तर कुणी गाववढीनं गावरस्त्याला लागलं. तिसरा तितंच हापसा बघून भाकर सोडून खात बसला... पर माज्यामागं येगळीच घाई लागल्याली. सोम्मारचा बाजार आसल्यामुळं आज आर्दीच शाळा व्हती. बाजारगावची माणसं टकुर्यावर काईतरी वझी घेऊन धावत होती. शेळ्या, कोंबड्या, बैलं, माळवं, दाळी-दुळी इक्रीटिक्रीला जमंल तसं आणलं जात व्हतं. गाढवं, घोडी, गाड्या, सायकली... आसल्या वर्दळीनं सम्दा सम्दा रस्ता गजबजून गेला व्हता. बाया-बापड्या काचकं-बोचकं घेऊन धावत-पळत व्हत्या. बोलता बोलता, सवयीनं रस्तं धरून हालत व्हत्या. बाजार कालवा वाढत व्हता आन् पुरागत माणसं तालुक्याकडं धावत व्हती...माणसाचं लोंढं बघत, निरखीत म्या बी घाईनं बाजारतळाकडं निघालो व्हतो. उरात दम भरला व्हता. आज लईच उशीर झाल्यामुळं काळजात भ्या दाटत व्हतं. पायात गती तशी टकुर्यात येगळीच चाती फिरत व्हती. आबानं आन् मायीनं पुन्हा पुन्हा सांगितलं व्हतं. जतावून ठिवलं व्हतं,
‘बापू...’
‘आंऽऽ’ म्या दप्तर पाठीशी टाकून निघालो व्हतो.
‘ह्य बक, गेल्या बाजारासारखं करू नकू. नीट पेठंच्या तोंडाची नळाजवळची जागा धरून ठीव बग. एकांदा तास बुडला तर बुडला.’
‘व्हय.’ मनून मी रस्त्याला लागलो.
नदीच्या बाहीर सडकंला लागलो की, मी वही काढायचो आन् इंठाजीचं शब्द पाठ करीत चालायचो. गावची पोरं सोबत असायची तर कवा नसायची... कवा इतिहासाचं तर कवा मराठीचं पुस्तक मी चालता चालता वाचायचो. कळंबापस्तोर सहज आब्यास व्हायचा. तसंच शाळा सुटून गावाकडं येताना बी करायचो... असंच खेळत वाचायचो, वाचीत खेळायचो... समद्या वर्गात वाढ नंबर यायचा. पर ह्या वर्षी मॅट्रिक व्हती. आबाला, मायीला मोप समजावून सांगितलं. मास्तरानं दिलेली चिठ्ठी वाचून दावली... पर आबाचं गणितच येगळं व्हतं. मनात असून बी त्यांचा इलाज नव्हत्या... आन् म्या उरावर दगड घिऊन साल काढायचं ठरविलं. पर ह्यो सोम्मार मुळावरच यायचा...
आन् एकाएकीच माझ्या दप्तराला वड लागली. तसं म्या चमकून म्हागं बघितलं.
‘बाप्या, लेका किती हाका मारल्या रं...?’ काळ्याचा गिना जरा जाजावल्यागत झाला.
‘का? काय झालं...?’
म्या जरा थबकून नेट लावलं. तसं गिनानं धोतराच्या कोपर्यात बांधून आणल्याली भाकर माज्या हातावर टेकविली. आन् उसासा टाकीत, चिडल्यागत बोलला,
‘तुह्या म्हातारीनं भाकर दिलीय. आन् चांगली पैसून जागा धर मनून सांगितलंय... ’
गिन्या ह्यवढंच फटकारल्यावानी बोलला. आन् ‘व्हय-न्हाय’ करता करता माणसात इरघळून गेला...
हातातली भाकर म्या दप्तराच्या पिसवीत कोंबली. ताराचं कुंपन वलांडून, मी वाकून बाजारतळावर आलो. आन् चांगली जागा, मोक्याची जागा हुडकीत हिंडायलो. जागूजाग माणसांनी दगडं, पोतडी, करंड्या टाकून जागा धरल्या व्हत्या. खड्याची रांगोळी घालून आपापल्या जागा आखून घेतलेल्या व्हत्या. मी वाटकूळ भांबावल्यागत हिंडत व्हतो. फिरत व्हतो... चवकडं दुकानाची मांडामांड चालली व्हती. गाड्या, हातगाड्या फिरत व्हत्या. च्यावाल्याच्या कळकट किटल्या फिरत व्हत्या. पालं, कनाती ठोकल्या जात व्हत्या. चांभार-मोच्यांची दुकानं थाटत व्हती. कातडी-सागळीचा घोंगता वास पसरत व्हता. झाडू-फड्याची आन् चऱ्हाटा- दोरखंडाची मांडामांड व्हत व्हती. पलीकडं सकाळ धरून भांडीवाल्याच्या लाइनी थाटत-सजत व्हत्या. तांबुळी, भुई गिऱ्हायकाची वाट बघत होते.
म्या फिरून फिरून आखरीला एका कोपऱ्यात जागा हेरली. पिसवीतलं धोतर काढलं आन् लांबवून पसरून टाकलं. त्याच्यावर दोन-चार दगडं वजन मनून ठेवलं. आबा आन् माय हितं बसत्यात. आन् आपली जागा...? पुन्हा माजी नजर सांधं हुडकीत फिरायली. म्या पुन्हा एकदा सम्दीकडं चक्कर टाकली... एक मोकळी जागा हेरून तितंच दप्तर टाकलं. आन् पलीकडं मेख ठोकणाऱ्या माणसाला म्या हाटकिलं, जवळ जात इच्यारलं,
‘मामा, ही जागा खुलीय नं...?’
‘काय मांडायचंय?’ त्यानं माज्याकडं न बघताच गुरकल्यागत इच्यारलं.
‘उल्सं माळवंय...’ मी उभाच.
‘कोण गाव?’ उगचंच ताठत चालला.
मलाच चुकल्यागत वाटलं. न इच्यारता तसंच ‘खडं-दगडं’ मांडून बसाया फायजी व्हतं. पर बोलणं उरकीत म्या बी जोर देऊन बोललो,
‘हास्यागाव...’
‘...जरा पलीकडं सरून बस.’ तवर तर म्या दगडं मांडून बसलो व्हतो. आन् उल्संक उसासा टाकीत तितंच दप्तर मांडीवर घिऊन बसलो. त्या हातरलेल्या धोतराकडं एकदा नजर टाकून म्या भाकर सोडली. आन् एक एक तुकडा मोडीत चाबलीत र्हायलो...’
‘साळंत जातूच?’ त्यो मेख ठोकणारा रस्सी बांधून उठला. माज्या मांडीवरलं दप्तर बघत बोलला.
‘हां...’
‘कितवीला?’ त्यानं डब्यावर फळ्या टाकल्या.
‘मॅट्रिकला...’ म्या चटणीवर टोच्या मारीत घास उचलला.
‘मॅट्रिकला? मग आवघडंय् गड्या...’
त्यानं धोतरानं तोंड पुसीत बोलणं वाढविलं. आन् म्या घास चावायच्या नादात बोलणंच तोडलं. पर ‘आवघडंय् गड्या’ ह्यो शब्द मातर मनात घासागत घोळत चालला. वर्गातलं जोशीमास्तराचं बोलणं आठवायलं. महात्मा फुल्यांच्या धड्यातला त्यो माळवेवाला आपल्या आबागतच आसंल? पर काय हुबेहूब वाटायलंय... मला राहवलंच न्हाय. जेवता जेवता दप्तरातलं पुस्तकं काढलं. आन् घास चावता चावता पानं चाळायलो... तर ह्या खुणा केलेल्या वळी डोळ्यावाटं शिरायल्या, मना-काळजात पसरायल्या... पटत चालल्या...
‘...शेतकऱ्यांनी शेतात तयार करून आणिलेला एकंदर सर्व भाजीपाला वगैरे माल शहरात आणितेवेळी, त्या सर्व मालावर म्युनिसिपालिटी जकात घेऊन शेतकऱ्याला सर्वोपरी नाडिते... गाडीभर माळवे शहरात विकण्याकरिता आणिल्यास.... गाडीभाडे अंगावर घेऊन त्यास घरी जाऊन मुलांबाळांपुढे शिमगा करावा लागतो... असले अधम कारभारी शेतकऱ्यांमध्ये पुढारी असल्यास... शेतकऱ्यांची सुधारणा कशी होणार बरे!...’
...माज्या डोळ्यात ही आक्सरं उतरत व्हती. आतल्या आत त्या आक्सराचा पडताळा करून म्या बघत व्हतो. दर बाजारी आपूनही भाजीपाला-माळवं आणतो. घसा फाटुस्तर वरडून-सरडून इकतो. आरडून-वरडून बोलतो. पर आखरीला काय हाय... वाळूत मुतल्यागत ‘फेस ना पाणी.’ मला वाचता वाचताच कसंतरी झालं, टकुरं चकरून गेलं. इतिहासातला इंठाज आठवू लागला. दादाभाईंचं बोलणं, जोशीसरांचा आवाज कानामनात घुमू लागला. गोरा इंठाज गेला, पर काळ्या इंठाजानं तसलंच पाऊल उचललं... आपलं आबा, माय, थोरला भाऊ आन् चार बैलं रातंध्या राबत्यात. उरं-खांदी फुटल्यात... घासातला घास पिकाच्या वाफ्याबुडी घालून, टकुरं धरून बसल्यात... दोन सालं झाली, न्हाणीची भित पडलीय... माज्या डोक्या-उरात सम्दा सम्दा इतिहास आठवत चालला. मोगलाच्या लढाया, रयतेची लुटालूट, इंठाजांचा व्यापार, सावकारं-संस्थानिकांचे सौक... जोशीसरांनी सांगितल्यालं जळण्याचं उदाहरण... मला सालोसालचा खंगत-झिजत जगणारा बहुजन समाज दिसायला.
...म्या वाटकूळ कसल्यातरी तंद्रीतच बुडून गेलो होतो... इंठाजांनी सुधारणा केल्या...? छ्या! छ्या लुटीचीच व्यवस्था केली! मनं, आजच्या योजना...?
‘ये पोरा!’
तसं म्या दचकूनच वर बघितलं, तर आमच्या गावचा सटवा तेली.
‘का वं?’ म्या भाकर बांधली. पुस्तक उचलून दप्तरात कोंबलं. आन् हिकडं- तिकडं बघत सटवाला इच्यारलं,
‘आबा न् माय दिसली का वं...?’
‘येड्या, तू हितंच तप घालीत बस. आरं म्हातारं मरणाचं वझं घिऊन बाजारात हिंडायलंय की... तुला जागा धरायचं सांगितलंय् की जणू...’ आन् सटवा पुन्हा बाजारात मिसळून गेला. तसं म्या जागा धरलेल्या आन् पसरून टाकलेल्या धोतराकडं बघितलं. आन् तितंच दप्तर ठेवून आबाला-मायीला न्याहाळत, बघत उभं र्हायलो. टाचा उचलू उचलू निरखायलो... तसं मिरच्याच्या लाईतून म्हातारी दोन वझी घिऊन यायल्याली दिसली. तसं म्या जरा पुढं झालो. तिच्या टकुऱ्यावरचं वझं उरी-खांदी घेतलं.
म्हातारी धपापली व्हती. हुसासा टाकून बोलली, ‘बापू, हाळूच माय. न्हायतर पोटा-फिटात दुकंल...’ आन् म्या दावलेल्या धोतराकडं कांद्याचं वझं घिऊन गेली. गवारीचं ठिकं उघडून बघितलं. हिरव्यागार लस्लसीत शेंगा... म्या पोत्याचं तोंड घडीनं गुंडाळीत शेंगापस्तोर गुंडाळलं. गिर्हायकाला दिसंल आस्या पद्धतीनं पसरून ठेवलं.
...म्हाताऱ्याच्या बी दोन डाली मायीनं तिकडंच उतरून घ्यातल्या... म्या माजं दुकान लावून आबाकडं गेलो. मायीनं लाल कांद्याचा ढीग पुढ्यात वतला व्हता. आन् आवरीत-सावरीत त्याला आकारात आणीत व्हती. टमाट्याच्या दोन मोठमोठ्या डाली बघून माझा ऊरच दडपला. ह्यवढं वझं?... आबानं टकुर्यावरच आणलं व्हतं. टमाटी फुटत्याल मनून कावडीगत खांद्यावर आणलं व्हतं. एरांडाच्या पानानं चवकून डाल सावरून बोंदर्यानं बांधली व्हती. आबाबराबर मी बी डाली सोडल्या. लाल लाल, ताजी ताजी टमाटी... एका किलूत चार न्हायतर तीनच बसणारी... आन् एक डाल उघडी ठेवली. दुसरी पानानं झाकून टाकली. तागडं, मापं बाहीर काढली. आबानं उभं ऱ्हाऊ सम्द्या बाजारावर, माळव्याच्या लाइनीत नजर टाकली. आन्...
‘मायला, जिकडं तिकडं लालेलालच हाय बाबा...’
सुस्कारा टाकून आबाचा चेहरा उतरलेला दिसला. मला भावाचं समजावून सांगितलं. पैसं संभाळ मनून जतविलं. आन् कसल्यातरी उसण्या बळानं आरुळी ठोकली, ‘चला, चला... लाल टमाटी सस्ती लावली. सस्ती...’
अन् ‘सस्ती’वर जोर देऊन आबा आरडत र्हायलं. माय आरडू लागली. आन् म्या हळूहळू मप्ल्या जाग्याकडं निघालो...
म्या मन मारून दुकान लावलं. हिरवीगार ताजी गवारी पोत्यावाटं गिर्हायकाला दिसावी मनून म्या आतल्या आतच ढिगारून ठेवली व्हती. भावाचा कानुसा घेण्यासाठी म्या शेजारच्या माळवेवाल्याचा अंदाज घेतला. घसट दावून हिकडचं-तिकडचं बोलत र्हायलो. वळक वाढत चालली. म्या मनातला सवाल केला. आन् तसा समजावून बी घेतला. मन्लं, ‘मामा, ह्ये माळवं ठोकीनं इकल्यालं परवडतं का असं बसून... इकल्यालं फायद्यात पडतं...?...’
शेजाऱ्याला पोराचा सवाल जरासाक पोक्त आन् यव्हारी वाटला. त्यानं हिरव्या मिर्च्याचा ढीग सारखा करीत सांगितलं, ‘...आरं आसं बसून इकल्यालं कसं आयकंल. आस्लंच फायद्यात पडतं.’ म्या त्यातलं बोलणं समजावून घेतलं. पर इकनाराचा रोजगार, टकुऱ्यावरून वाह्यची मजुरी आस्लं जवा मी बोलायलो, तवा शेजार्यानं हासून माज्याकडं बघितलं. आन् सिस्ताईनं बोलल्यावनी बोलला, ‘ह्या बागवानाली कसं परवडतं रं...? आं... आरं ह्या घेण्यादेण्यातून तर त्यांचा परपंच चालतोय. पण आपल्याला त्ये दांडी मारायचं जमत नस्तंय...’
असं बोलून पावणा हासाया लागला. मला त्याचं ह्ये बोलणं खरं वाटलं अन् जरासंक गमतीचं बी वाटलं. मेहनत करून पिकविणारा वांद्यात पण ह्ये दलाल, आडत्ये मातर फायद्यात...?... आता ह्ये आबानं आन् मायीनं गावाकडून चार गठुडी माळवं आणलंय... त्यातलं एक गठुडं जर हमालानं तितूनच उचललं अन् तितंच उभ्या असणार्या गाडीवर ठेवलं तर एक रुपाया... पर आबानं, मायीनं, दादानं रानातून गावात, आन् गावातून कळंबात पर... काय खरंय... माज्या मनात येगळंच गणित जुळत चाललं... आन् आतल्या आत घसरत चालल्यागत वाटायलं.
‘का रं माप हाय का किलूचं...’ शेजारच्या पावण्यानं मला हाक मारून हाटकिलं. माज्याजवळचा आर्धा किलू मागून घेतला. आन् त्याची गिऱ्हायकी म्या खिनभर बघत बसलो. पावण्यानं गिऱ्हाईक वारलं. आन् झाल्याली भवानी कपाळाला लावून आदबीनं बसला. तसं म्या त्याला बोलत बोलत इच्यारलं,
‘...आन् ह्ये ह्याचं भाव कोण ठरवितंय वं...’
‘कोण कस्याला ठरवील. आपलं नशीब मनायचं आन् गप्प बसायचं...’ पावण्यानं बोलणं थांबवीत आरुळी ठोकली,
‘घ्या घ्या. हिर्वी मिर्ची, लवंगी मिर्ची... घ्या... सस्त लावली सस्त...’
‘भवानी झाल्यानं पावण्याला चेव आला व्हता. येगळाच हुरूप चढला व्हता... अन् माज्याकडं बघून सांगत व्हता.’
‘पोरा, मुका ऱ्हायलाच तर तसंच गठुडं गावाकडं न्यावं लागंल, बैलाला खाऊ घालावं लागंल... आरं बोलंल त्यांचं हुलगं इकत्यात, मुक्याचं गहू बी कुणी इच्यारीत नस्तंय...’ असं सांगत सांगतच त्यो उभा र्हायला आन् कानाला हात लावून आरडायला-
‘घ्या. घ्या. सस्तीची-मस्तीची. घ्या लवंगी मिर्ची... हिरवी मिर्ची, हिर्वी हिर्वीऽऽ आलीऽऽ आलीऽऽऽ’
आता बाजार चांगलाच भरला व्हता. चांगली गिर्हायकं पिसव्या घिऊन हिंडत व्हती. रंगीत छत्र्याखाली हिंडणाऱ्या बायका, पोरी नाजूक जाळीच्या पिसव्या घेऊन बाजार बघत व्हत्या. भाव करीत हिंडत व्हत्या. धा-पाच पैस्याची हुज्जत घालताना मला त्यांची चीड यायची. कीव वाटायची... पर ह्ये गिर्हाईक येताना दोन-दोन, तीन-तीन जमून यायचं. घोळका घालून बसायचं. ‘माल’ चिवडून बघायचं. किलूचा भाव करून छटाक-पावशेर मागायचं. आन् उठताना ‘सुटं न्हाई’ मनून पाच-धा पैसं कमी टाकून निघून जायचं. धा पैसाच्या कोतिंबिरीसाठी सम्दा बाजार फिरून यायचं. गड्याचं गिर्हाईक बरं, पण बायकाची हुज्जत मला सम्दी सम्दी म्हायती व्हती...
पैस्यामागं पैसा जात व्हता. माणसं कुणालातरी फसवायला मनूनच बाजारात आल्याली व्हती. शेतात राबणारी मजुरं सोम्मारचा वायदा करणार्या फाटक्या मालकाला हुडकीत व्हती. आन् तसली मालकं आडत्याच्या हातापाया पडत बसली व्हती, तर कुणी बैलं-म्हशी बाजारात मांडल्या व्हत्या... शेळ्या, अंडी, कोंबड्या, बोंबील, मासळी-सम्द्याचा वास एकमेकात मिसळून गेला व्हता. भाजीपाला, पसाकुडता पिसवीनी आणल्याला धान्य-धुन्याचा माल बसला व्हता. तांबुळ्याच्या दुकानात रेटारेट व्हत व्हती. चाट्याची पालं, बोहरणीचं आरडणं... भांडीवाल्याचं सौदं झडत व्हतं. पाहुण्या-रावळ्याच्या भेटीगाठी व्हत व्हत्या. दलाल हेड्याला बोलत व्हते. कांडी-बत्ताश्यासाठी पोरं चिरकत-आरडत व्हती. आन् दारूगुत्याकडं गेलेल्या नवर्याला बायका धुंडीत व्हत्या. आपल्या परपंच्यावर थुकत व्हत्या. देवाला शिव्या घालीत, पोराच्या पाठीत रपका घालीत व्हत्या...
आन् एकाएकीच मला माज्या वळकीचा आवाज आयकू आला. बाजूला बघितलं, तर आबा उभं र्हाऊन आरडत व्हतं. हात वर करून करून चिरकत व्हतं. त्यांच्या घस्याला कातर लागल्यागत वरडत चिरकत व्हतं... मायीचा बी आवाज त्यांच्या म्हागूम्हागच आयकायला यायला... मला आतल्या आतून डुचमळल्यागत झालं... उगचच भरून आल्यागत झालं. आपून बी आरडावं, उठून उभा र्हावं... घसा फाटुस्तर... पर मला समुरूनच आमच्या वर्गातली पोरं येताना दिसली. पोरी बी त्यांच्या त्यांच्या घोळक्यानं यायच्या. माज्याकडं तिरकं बघत हसायच्या... तर कवा मुद्दामच माज्या शेजारच्या माळवंवाल्याशी भाव मोडून निघून जायच्या. दुसऱ्या दिवशी वर्गात आवघडल्यावनी व्हायचं. जीव बारीक बारीक होऊन जायचा.
पर मास्तरं मुद्दाम माज्याकडून घ्यायची. ‘धंद्यात लाज बाळगूनै’ मनून सांगायची... आता बी माजा जीव इगरून गेल्यागत झाला. सुमन जोशी, अनघा देशमुख, विमल राऊत आल्या तशा मला कोपर्यातून बघत गेल्या... म्या तोंडावरला घाम पुसला. त्यांच्याकडं बघता बघताच, आबाचा आवाज आला,
‘चला, चला. सस्त लावली. बीन बियाची टमाटी... लाल लाल टमाटी.. मस्त-सरकारी टमाटी घ्या घ्या...’
पर गिऱ्हाईक यायचं. डालीत हात घालून बगायचं. चेंडू दाबल्यागत दाबून न्याहाळायचं. आन् आर्ध्या भावातच मागून निघून जायचं. आबाचा राग उसळून यायचा. काळ्या चष्म्यावाल्याकडं ‘खाऊ का गिळू’ असं डोळं फिरवीत बघायचं. पर तसंच घटाघटा गिळून सिस्ताईनं सांगायचं...
‘मामा, पुढच्या आठवडी या... आज न्हाय मिळायचं...’ तसं त्ये माणूस काईतरी बुटबुटत निघून जायचं. आन् आबा गळ्याच्या दोर्या ताणू ताणू आरडायचं. मधीच मायीला बी टोचणी देऊन सांगायचं,
‘...मुकी झालीच काय ह्येडंबा? आरड की आवसंन आसल्यावनी...’
आन् आपूनच मुठी आवळीत आरडत उठत. आरडता आरडताच माज्याकडं बघत अन् तितूनच शिव्या हासडून गर्जत,
‘ये पोरा. बसलाच कसा? उठून आरड की हँद्रया... ऊठ ऊठ.’
...तसा माजा नाइलाज व्हायचा. म्या वळकी-फिळकीचं माणूस बघून घ्यायचो. आन् मन मारून उठायचो. डोळं झाकून खच्चून आरडायचो,
‘घ्या. घ्या. ताजी गवारी, हिर्वी गवारी सस्त लावलीय् सस्त... घ्याऽऽ घ्याऽऽऽ.’
लगेच डोळं उघडून म्या खाली बसायचो. कासवागत मान आकसून बघत र्हायचो.
...पयला तास संपला आन् दुसरा तास सुरू झाला.
‘...आन ‘राष्ट्रीय जागृती’ भाग सुरू झाला. इंठाजांच्या आर्थिक नीतीवर दादाभाईंनी कसा झगझगीत प्रकाश टाकून हिंदी जनतेला जाहीर आवाहन केले. ’चळवळ करा-चळवळ करा’ असा संदेश दिला. ‘तुमचे साम्राज्य हिंदी रयतेच्या घामावर व रक्तावर उभारले आहे.’ दादाभाईंनी इंग्रजी गोऱ्या सत्तेला निक्षून सांगितले. ...कच्चा माल कमी भावात इंग्लंडला निर्यात होई, तिथला पक्का इथं बाजारपेठ बनवून विकला जाई... इंग्रज सुधारला. भारत दरिद्री बनला... आज आपण स्वतंत्र आहोत पण... आजही दादाभाईंची हाक, त्यांचे आवाहन तसेच कायम आहे. गोरा इंग्रज गेला. पण आता आपल्यातलेच काळे इंग्रज त्याच गोऱ्या नीतीनं वागत आहेत... कष्टकरी माणूस अजून न्याय मिळवू शकला नाही. श्रमणारा दलित, भटका अजूनही पारतंत्र्यातच भटकतोय...’
मी हे सम्दं कान देऊन, मन लावून ऐकत होतो... वहीत भराभर लिहीत होतो. आपली गरिबी-आपलं दारिद्य्र ह्याची कारणं पडताळीत व्हतो. ...हीच बोंब शिक्षणाची बी इंठाजांनी केली मनं... आम्हाला काळ्या रंगाचा व गोऱ्या वृत्तीचा माणूस घडवायचाय...’ हे तो मॅकोले म्हणतो मनं... पर आज काय आन् कसलं घडतंय्?...
मी वर्ग सुटला तरी ह्येच टकुऱ्यात घिऊन वावरतोय. ह्यातलं कवा कळतंय, कवा कळत बी न्हाय. पर ‘पास’ व्हायची चिमट हाय. पुस्तकातल्या वळी, अन् जोशीसराची, जाधवसराची सांगण्या-शिकविण्याची ढब डोळ्या-मनापुढून जातच न्हाय...
मग म्या घरी गेल्यावर चिमणीम्होरं बसून रात रात जागायचो. आर्ध्या-आर्ध्या भाकरीवर दिवस काढायचो. पुस्तकातल्या माणसाशी बोलत ऱ्हायचो. तीच माणसं मला सांगत्यात असला भास मुद्दाम करून घ्यायचो. त्याची सम्दी सम्दी पडताळणी करून घ्यायचो. आज बाहीर काय चालतंय आन् ह्यात काय हाय. कालचा राजा आजचा राजा, ह्यांचा मेळ घालता घालता खरं-खोटं पटायचं. राग, संताप, चीड यायची. पर पुन्हा वाचीत-टिपणं काढीत र्हायचो... कवा आबाला सवड आस्ली तर बोलत, सांगत र्हायचो. आबा-माय मयेत आस्ली की मी हळूच बोलायचो,
‘आबा...’
‘का रं?’
‘एक इच्यारू?’
‘इच्यार की.’
‘नगं, तुमी रागावताल...’
‘...पर मला आगुदर कळू तर दी की...’
कधी न्हाय त्ये आबानं पाठीवरून हात फिरवीत जवळ घेतलं.
‘मॅट्रिक हुवस्तर मला कळंबातच ठिवताव का?’
...तसं आबा खीनभर दुमतून बसायचे. आन् कसल्यातरी कातरभरल्या आवाजानं बोलायचे,
‘पोरा... ह्ये मला कळत न्हाय व्हय रं? तू शिकावं, मोठं व्हावं, मामलेदार व्हावं... पर तुला तरी म्या काय सांगू आन् सांगून तरी काय उपेगय?...’
उगचच आबाचं तोंड गहिवरल्यागत दिसायचं. मला आपून उगचच बोललाव वाटायचं. माजं मलाच नंतर कसनुसं वाटायचं... पर खीनभर गप्प राहून त्येच काईतरी काढून बोलायचे. मायीला जवळ बसवून सांगायचे,
‘का गं...’
‘काय?’ माय जवळ टेकायची.
‘ती दुभती म्हैस इकावी मन्तो...’
‘का?’ माय चमकून बघत बोलली.
‘म्हैस काय पुन्हा कवा घेता यील, पर पोराचं ह्ये साल गेलं, तर पुन्हा थोडंच म्हागारी येणार हाय?’
आबाचं बोलणं जडावलं व्हतं. जरासंक आतून-बाहिरून वलसर झालं व्हतं. पण त्यांचं ह्ये बोलणं खिनाभरातच बदलून गेलं. इच्यारात बसून बसून त्यांनीच मुद्दा फिरविला... आता सिक्सनाचं तरी कुठं काय र्हायलंय. कुठं नोकर्या तरी बोंबलायल्यात. त्यापेक्स्या एका म्हशीला दुसरी म्हैस जोड घ्यावी. दुधाचा रतीब लावावा. न्हाय तर डेरीला घालावं.
उद्याचं काय कुणी बघितलंय. पर ह्या वक्ताला त्यांच्या बोलण्यात यगळीच धार व्हती. नेटका इरादा व्हता. मनून निस्तं आयकून घेतलं. पर बोलता बोलता आबाला काय वाटलं की, तट्वन उठून बसलं. आन् माज्याकडं बघत जवळ सरकत बोलायले,
‘तिला काय कळंतय ह्यातलं? पर बापू, ह्यातलं गणित येगळंच हाय रं... शिकल्यालं वाया जात न्हाय, पर बाजाराची आडचण हाय बघ. तुज्यामुळं मास्तराचं, तुमच्या हास्टेलाचं हामखास गिऱ्हाईक येतंय... झालं तर, एक दुकान वाढेव व्हतंय...’
आबाचं कस्यातूनच मन निघत नव्हतं. एक गरीब पर होतकरू पोर मनून विद्यार्थी-वसतिगृहासाठीचा भाजीपाला मुद्दाम माज्याजवळूनच पोरं नेत होते. तेवढीच इक्री आबाला भरवश्याची वाटत व्हती. पर मला त्या रेक्टरचं बोलणं आयकून लाज वाटायची. उगचच आपल्यावर ‘दया’ व्हतीय वाटायचं. मन खजील व्हायचं. पर काईच इलाज चालत नव्हता. एकांदं साल वाया गेलं तरी काय बिघडतंय? तेवढाच आब्यास पक्का व्हतोय, परपंच्याला बी हातानं हात लागतोय, आसा साधा हिशेब व्हता आबाचा. आन् ह्यो हिशेब त्यांच्या टकुर्यात बसला की, बसलाच... पर ह्ये सम्दं मला ठावं व्हतं. पर म्या बी मन लावून नेटून बसत व्हतो. रातीचा दिवस आन् दिवसाची रात करून आब्यास करीत व्हतो. ...पर सोम्मारचा दिवसच माजा घातवार मनून यायचा. माजा सम्दा इलाजच खुटायचा... पाप केलं आन् कुणब्याच्या पोटाला आलो वाटायचं.
आज बाजार सुटायचा वकूत झाला व्हता. माणसं बारीक-मोठी काचकी-बोचकी घिऊन गाववाटंला लागली व्हती. इकनाराची घाई झाली व्हती. आन् गिऱ्हाइकं भाव पाडून मागत व्हती. ‘माल’ द्यावा तरी पंच्याईत आन् न्हाई द्यावा तर उकिरड्याचीच भरती व्हणार व्हती... चार रुपयाचं चऱ्हाट दामू मांग तीन रुपयाला सांगत व्हता. आन् दोन रुपयाचा पावसेर भाजीपाला रुपयावर येऊन ठेपला व्हता. माणसं घाई करीत हिंडत व्हती. गाववढीनं पाय उचलीत व्हती. पर आबाच्या टमाट्याला सकाळ धरून गिर्हाईकच नव्हतं. ‘नगं-व्हय’ करता करता दोन डालीतून एकच डाल आर्दी-निम्मी इकली व्हती. आन् एक तशीच न फुटता पडून व्हती. ह्या महिन्यात टमाट्यांनी चांगलाच मार खाल्ला व्हता. पीकच अव्वाच्या सव्वा पिकलं व्हतं. सम्दा बाजारच्या बाजार लालेलाल दिसत व्हता. भाव करताना आताडी पिळत व्हती. माप करताना काळीज थरथरत होतं. अन् माणसं नेमका ह्याचाच फायदा उठवीत व्हती. दोन रुपये किलुवरून आबा रुपया किलू मनून आरडत व्हतं. आन् माप टाकल्यावर तोंड कसनुसं करून दीड-सव्वासाठी आठोव करीत व्हतं. ...मपल्या गवारीच्या शेंगा दोनेक किलू उरल्या व्हत्या. मायीचं कांदं संपलं व्हतं. आन् ती आबाची चिकाटी बसून बघत होती. मधी काईच बोलायचा तिचा लाग नव्हता, मनून ती निस्ती गालाला हात लावून बघत व्हती.
...बाजार आता चांगलाच फाकला व्हता. दुकानं हालली व्हती. माणसानं माणसं पांगली व्हती. पर आबाचा घसा चिरकतच व्हता...
‘चला, चला. बारा आणे, बारा आणे किलोऽऽ घ्याऽऽऽ खाऽऽ लाललाल टमाटीऽऽ’
पर माणसं निस्तच चालता चालता बघायची. आबाचा आवतार बघून पुढं व्हत हासायची. आन् आबा चिडीला आल्यावानी मुद्दाम उभं र्हाऊन ऱ्हाऊन आरडायचं,
‘चला. बारा आण्याची आठ आणे-आठ आणेऽऽ झालीऽऽ झालीऽऽ घ्या घ्या.’
तरी बी गिऱ्हाईक फिरकत नव्हतं. कुणी जवळ येऊन बघत नव्हतं.
आन् दिवस मावळून आंधारून यायलं. बाजार सुनासुना झाला. पण आबाला ह्याचं भानच ऱ्हायलं नव्हतं...हातात तागडं धरून उभा र्हात आबा आरडत व्हतं... किरुळ्या ठोकून आरडत, हाका मारीत चिरकायलं. आन् न र्हाऊन एक गिऱ्हाईक जवळ आलं.
‘काय सांगितलं?’ गिऱ्हायकानं नवी डाल उघडली. एक-दोन टमाटी चाचपून बघितली.
‘आठ आणे किलू.’ आबाचा तसलाच तार लावलेला आवाज.
गिऱ्हाईकानं चार-दोन टमाटी हातात घेतली.
‘पर... घ्यायचं काय?’ गिऱ्हायकानं खिसं चाचपून बघितलं. तसं चिडलेलं आबा ठिसरल्यागत झालं.
‘घ्यायचं मंजी...?’
‘सांगणं आठ आण्याचं, पर आखरीला किती घ्यायचं?’
आबाच्या माथ्यात भडका उडाला. कपाळाची शीर फरफरली. कानशिलं बघता बघता तापली. व्हट थरारल्यागत झालं. पर राग आवरून आबानं इच्यारलं.
‘पावनं, किती घ्यायचीत?’
‘सिस्ताईनं सांगितलं, तर पावशेर घेतली आस्ती...’
असं मनून त्यानं चार-दोन मोठी मोठी टमाटी उचलून ताजण्यात टाकली. आन् पिसवी धरीत त्ये गिऱ्हाईक बोललं.
‘चार आणे किलोनं धरा...’
‘काय?’
आबा पिसाळलं. डोळ्यातून ठिणग्या गाळीत उठलं. सम्दं आंगच थरारलं. आन् कडाड्कन आबा गरजलं...
‘ये हायवानाऽ जिभीला हाड बसवून घे! चल ऊठ, पळ हितून...’
तसं त्यो माणूस तट्वन उठला. आन् काईतरी बुटबुटत म्हागं सरकत निघून गेला...
आबा भुसा भरल्यागत ताठच्या ताठच उभं व्हतं. चेहरा तापला व्हता. आन् डोळ्यात टमाट्याच्या डालीच्या डाली उतरल्या व्हत्या.
‘...चार आणे किलो... ईस पैस्या किलो... धा पैस्या, पाच पैस्या... आरं फुकट घ्या की मनावं...’
आन् एकाएकी आबानं दोन्ही बी डाला खाली रिचविल्या. लालेलाल टमाट्याचा, टचटचीत टमाट्याच्या गुडघ्याएवढा रसरसीत ढीग झाला. आन् आबानं मनगट तोंडावर आपटीत एकच बोंब ठोकली. कचाकचा टमाट्याचा ढीग तुडवीत नाचायला बोंबलायला.
आबा लालेलाल चिखलात कवरच्या कवर नाचतच व्हता...
लेखक - भास्कर चंदनशिव
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा