प्रेम कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
प्रेम कविता लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

प्रेम पहाव करून

एक दृष्टिक्षेप टाकुन गेला तो निघून
पण ती नजर ह्रुदयात बसली रुतून
तेव्हा वाटल..
प्रेम पहाव करून...

करत होते कविता पण शब्दच गेले विसरून
मैफिलीत माझ्या सुर गेले दुरून
तेव्हा वाटल...
प्रेम पहाव करून

एकांत हवा म्हणुन बसले दूर जाउन
डोळ्यासमोर तोच दिसला राहून राहून
तेव्हा वाटल...
प्रेम पहाव करून...

त्याच्या विचारान टाकल मला घेरून
आठवणीन डोळ्यात पाणी आल दाटून
तेव्हा वाटल...
प्रेम पहाव करून
खरच एकदा तरी प्रेम पहाव करून...

असं प्रेम करावं ...

थोडं सांगावं थोडं लपवावं,

असं प्रेम करावं

थोडं रुसावं थोडं हसावं,

असं प्रेम करावं

गुपचुप फोन वर बोलावं,

कोणाची नाज़र पडताच पटकन ""अरे चा "अगं" करावं

असं प्रेम करावं


जग पुढे चाललं असलं

तरी आपण मात्र थोडं मागेचं रहावं,

फोन, SMS, आणि E-MAILS च्या जगात ही,

आपण मात्र पत्र लिहुन मांडावं,

असं प्रेम करावं




कुठे भेटायला बोलवावं,

पण आपण मात्र उशिरा जावं

मग आपणच जाऊन sorry म्हणावं,

असं प्रेम करावं


वर वर तिच्या भोळसट पनाची,

खूप चेष्टा करावी,

पण तरीही ती तुम्हाला किती आवडते, हे जरूर सांगावं,

असं प्रेम करावं


प्रेम ही एक सुंदर भावना,

हे ज़रूर जाणावं,

पुन त्या बरोबर येणार्‍या वेदनांना ही सामोरं जावं

असं प्रेम करावं



विरह येतील, संकट ओढवतील,

प्रेमाच्या अनेक परीक्षा होतील,

पण आपण मात्र खंबीर रहावं,

असं प्रेम करावं



एकदाच होतं, नशिबवानानाचं मिळतं,

म्हणूनच जीवापाड जपावं,

असं प्रेम करावं ... असं प्रेम करावं ...

पाऊस व ती

एकटीच मला ती दिसली होती
उनाड पावसात भिजली होती
मी हि भिजत होतो
ती बघेल म्हणून बघत होतो
तिने पहिले अन विचारले
कारण मला भिजण्याचं
मी हि विचारलं कारण तिचं
एकटी बाहेर पडण्याचं
असंच भिजावं वाटतंय
आभाळ फुटावं असं वाटतंय
मला म्हणाली, चल भिजूया
बघ, पावसाची सर आली
तिच्या बरोबर भिजण्याची
खरच इच्च्या झाली
तिचं अल्लड धावणं
पावसासारखं
मातीत खेळणाऱ्या
पोरानं सारखं
वाकलेल्या झाडाची फांदी
तिने हळूच धरली
शुभ्र मोगर्यांच्या फुलांनी ओंजळ
भरली
किती छान फुले आहेत या
झाडाला
मी चरकलो,
कशी येतील मोगऱ्याची फुले
कडू निम्बाला
तिला समजले हा प्रयत्न
माझाच होता
पुढच्याच क्षणी तीचा
हात माझ्या हातात होता
म्हणाली,
मनात होतं, मग एवढा उशीर का?
मला कधीच कळलंय अन तू एवढा बधीर का?
वेड्या, खूप प्रेम आहे माझे तुझ्या वर
♥ ♥ ♥, तुझ्या वेडेपणावर!

वास्तववादी प्रेम

मी चंद्र-तारे आणायच्या गोष्टी करतनाही,
डाळ-तांदूळ आणता आले, खूप झालं....

तू नाही दिसत ऐश्वर्यासारखी! हरकत नाही,
पण एकदम आवडलीस, खूप झालं...

काचेचं शामदान मी नाही लावू शकत छताला,
पावलापुरता प्रकाश येतोय,खूप झालं....

नको करूस पक्वान्न पंचतारांकीत हॉटेलमधली,
दोन वेळचं रांधता येतं तुला, खूप झालं....

मला नाही जमणार तुला न्यायला लँाग ड्राईव्हला,
ऑफिसपर्यंत सोडता आलं, खूप झालं....

तुला नाही समजली माझी कविता चालेल..
हिशोब समजतोय ना? खूप झालं....

नसू आपण रोमियो-ज्युलिएट, वा नसू शिरी-फरहाद,
दोन श्वास, एक प्राण..
खूप झालं......

माझी प्रेयसी एम.बी.बी.एस.

माझी प्रेयसी.....

तिला म्हणलो.., मला आज काळ झोप येत नाही..,
काय करू तुझी आठवण मला झोपूच देत नाही...,
क्षणभर विलंब न करता तिने तिची पर्स उघडली..,
झोपेची गोळी काढून ..तिने हातावर ठेवली ...,
काय सांगू तुम्हाला माझी वेगळीच केस आहे ...,
माझी प्रेयसी...!!!!! एम.बी.बी.एस आहे .....

मी म्हणालो माझ्या प्रत्येक श्वासात तिचाच गंध आहे...,
रक्ताच्या प्रत्येक ठेम्बास .. तुझाच रंग आहे...,
ती म्हणाली धीर धर..अजून थोडासा उशीर आहे...,
उद्या आमच्या रुग्णालयात ...मोफत रक्त शिबीर आहे...,
काय सांगू तुम्हाला माझी वेगळीच केस आहे ...,
माझी प्रेयसी...!!!!! एम.बी.बी.एस आहे .....

मी म्हणलो तुझ्यासाठी काहीही करू शकतो ...,
माझ रुदय काढून..तुझ्या हाती देवू शकतो ..,
त्याक्षणी ती उठली ...आत निघून गेली...,
माघारी येताना ती देसेशन बॉक्स घेऊन आली...,
काय सांगू तुम्हाला माझी वेगळीच केस आहे ...,
माझी प्रेयसी...!!!!! एम.बी.बी.एस आहे .....

एकदा तिच्याशी बोलता बोलता ठेच मला लागली ...,
तिने तिची ओढणी ...माझ्या पायावर बांधली...,
नजरेस नजर मिळवून ..मला हळूच ती म्हणली...,
पडलास तू पण जख्म माझ्या काळजाला झाली...,
....तर माझी हे केस अशी आहे...,
माझी प्रेयसी...!!!!! एम.बी.बी.एस आहे .....

विवेक राजहंस,पुणे

सांग आठवतोय ना तुला ?

सांग आठवतोय ना तुला ?
फिरताना घेतलेला हातात हात तुझा
मोरपिशी मखमली परी
अंगभर शहारलेला स्पर्श तुझा
जेव्हा देशील तो हात हातात कुणाच्या
क्षणभर शहारून .....

..... सांग आठवशील ना मला ?



सांग आठवतोय ना तुला ?
सोबत पाहिलेला तुटताना तारा
काहीतरी मागुया म्हणताना
उजळून आलेला चेहरा तुझा
जेव्हा तुटेल हे मन कुशीत कुणाच्या
सौधात उभी राहून .....
..... सांग आठवशील ना मला ?

सांग आठवतोय ना तुला ?


कातरवेळी उगवलेला पुनवेचा चांदवा
दूर राहिलो तरी
न चुकता पहायचा हट्ट तुझा
जेव्हा उगवेल पुन्हा सांजेला देशात कुणाच्या
हलकेच कातरून .....
..... सांग आठवशील ना मला ?

सांग आठवतोय ना तुला ?

अवघड वळणावरचा वेडा बहाणा


तू नको नको म्हणताना
श्वासात मिसळलेला श्वास तुझा
जेव्हा भासेल उग्र तो मिठीत कुणाच्या
संकोचात गुदमरून .....
..... सांग आठवशील ना मला ?

सांग आठवतोय ना तुला ?
हरेक क्षण तो मंतरलेला

तुजवर रचलेल्या कवितांमधून


जिवंत केलेला आभास तुझा
जेव्हा होईल हे शरीर अधीन कुणाच्या
मन माझ्यात गुंतवून .....
..... सांग आठवशील ना मला ?

राहूनच गेलं...

तिच्या प्रेमात पडतांना
तिला प्रेमात पाडायचं राहून गेलं
तोंड दुखेपर्यंत बडबडलो
पण हवं ते सांगायचं राहूनच गेलं.


तिनं माझ्या नजरेतून जग पाहिलं
तिच्या नजरेला नजर भिडवतांना
तिला डोळ्यात साठवायचं राहूनच गेलं.

तिच्या हाताचा, ओठणीचा,
स्पर्श हवाहवासा वाटतो
सांगेन तिला कधीतरी म्हणतांना
हा विषय काढायचं राहूनच गेलं.


हसत राहीलो, हसवत राहिलो
तिला दरवेळी, दर भेटीला.
तिच्या हसण्यामागचे अर्थ शोधतांना
माझ्या हसविण्याचा मतितार्थ सांगायचं राहूनचं गेलं.

ती आली की वेळही
उडून जायचा मला न समजता.
पण,
त्या दिवशी ती आली आणि निघाली
त्यावेळी तिला नेमकं अडवायचं राहून गेलं...

बघ तिला सांगुन

कधी कधी कोणासाठी असलेले आपले शब्द मनातच रहातात.
कधी ते ओठांवर येतात पण तिथेच अडतात.
कधी प्रयत्न करतो पण धाडस होत नाही
असेच काही ‘दुसरी’ कडेही होत असेल…
शेवटी तेच शब्द मुके होतात. आणि म्हणुनच…
म्हणुनच म्हणतो एकदातरी बघ तिला सांगुन !

किती दिवस पहाणार तिला तू खिडकीतुन
तो गुलाबही जाईल एक दिवस कोमेजुन
राहशील फक्त तू जगशील मरुन मरुन
म्हणूनच म्हणतो एकदातरी
बघ तिला सांगून !

किती दिवस बोलणार तू पडद्या आडुन
पोहोचवशील जरी भावना तिला दुसऱ्यांकडुन
“थॅंक्स!” म्हणेल तूला ती त्याचाच हात धरुन
म्हणूनच म्हणतो एकदातरी
बघ तिला सांगून !

किती दिवस घालवणार तू वायफळ बोलुन
बोलायला जाता एक वेगळाच विषय काढुन
एवढ्यात जाईल कोणतरी तेच तिला विचारुन
म्हणूनच म्हणतो एकदातरी
बघ तिला सांगून !

रोज रोज देशील एसएमएस तू पाठवुन
आतुरतेने हसत तॊ काढेल ती वाचुन
मेमरी फुल झाली की टाकेल डिलीट करुन
म्हणूनच म्हणतो एकदातरी
बघ तिला सांगून !

तुझा एक एक गुलाब ठेवील ती साठवुन
एक दिवस येईल गुलकंदाची बरणी घेवुन
लग्न ठरतय म्हणत जाईल ती निघुन
म्हणूनच म्हणतो एकदातरी
बघ तिला सांगून !

दिसली नसतीस तर

रतन अबोलीची वेणी माळलेली
आणि निळ्या जांभळ्या वस्त्रालंकारात
संध्येसारखी बहरलेली तू
तळ्याकाठच्या केवड्याच्या बनात
आपल्याशीच हसताना मला दिसली नसतीस
तर आज माझ्या जीवनाच्या अस्ताचलावर
हा भुलावणा सप्तरंगी सोहळा
असा सर्वांगांनी फुलारलाच नसता.

आपल्याच नादात तू
पाठ फिरवून परत जाताना
तुझी पैंजणपावले जिवघेण्या लयीत
तशी पडत राहिली नसती
तर माझ्या आनंदविभोर शब्दांतून
कातरवेळची कातरता
आज अशी झिणझिणीत राहिलीच नसती.

अबोलकेपणाच्या गूढ गाढाईने
जाईजुईच्या सान्द्र मंद सुगंधाचा लळा
सहज चुकार स्पर्शाने तू मला लावला नसतास
तर उमलत्या फुलपाखरांची
आणि मुक्याभाबड्या जनावरांची
आर्जवी हळूवार भाषा
इतक्या स्पष्टपणाने मला कळलीच नसती.

तू कशामुळे माझी जिवलग झालीस
ते खरेच मला आता आठवत नाही
पण मला तोडताना
समुद्रकाठच्या सुरुंच्या बनात
मिट्ट काळोखातून चंद्रकोर उगवेपर्यन्त
तू मुसमुसत राहिलीस
हे मात्र मी अजून विसरू शकलेलो नाही.
त्या वेळची तुझी ती आसवे
अजून माझ्या कंठाशी तुडुंबलेली आहेत.
तू तेव्हा तशी मुसमुसली नसतीस
तर माझ्या शृंगाराचा अशोक
आज करुणेच्या आरक्त फ़ुलांनी
असा डवरलाच नसता.

तू तेव्हा आकाशा एवढी विशाल
आणि अवसेच्या गर्भासारखी दारूण
निराशा मला देउन गेली नसतीस
तर स्वत:च्याच जीवन-शोकांतिकेचा
मनमुराद रस चाखून
नि:स्संग अवधूतासारखा
मी या मध्यरात्रीच्या चांदण्यात
असा हिंडत राहिलोच नसतो.

तू केवळ माझी प्रेयसी नव्हतीस
माझी सशरीर नियती होतीस.
तसे नसते तर आज जो काय मी झालो आहे
तो झालोच नसतो.

कवी-बा.भ.बोरकर

प्रेम नावाचा "टाईमपास"

त्याची अन तिची पहिली भॆट दोघांची होणाऱी "नजऱभेट" काळजाला जाऊन भिडणारी थेट दोघांचं एकमेकांना पाहून हसणं अन नाजुकशा जाळ्यात अलगद फसणं... या हसण्या या फसण्याची सवय झालीय सगळयांना... नजऱभेटीचं रूपांतर चोरून भॆटीत भेटीचं रूपांतर हळुवार मिठीत अन त्याहीपुढे कित्येक पटीत नात्यातल्या या वेगाची सवय झालीय सगळयांना... मग रंगू लागतात स्वप्नं एक त्याचं,एक तिचं फक्त दोन मनं त्याचं हसणं तेव्हा तिचं हसणं तिचं रडणं तेव्हा त्याचं रडणं या हसण्या या रडण्याची सवय झालीय सगळयांना... दिल्या जातात वेळा,पाळल्याही जातात वेळा घेतल्या जातात शपथा दिल्या जातात उपमा त्याला ती वाटते "रांझ्याची हीर" तिलाही तो वाटतो "कपूरांचा रणबीर" या शपथा या उपमांची सवय झालीय सगळयांना... मग येतो असाही एक दिवस पूनवेची रात्र वाटू लागते अवस दोघांनाही येऊ लागतो एकमेकांचा कंटाळा हीर वाटू लागते "बधीर" अन रणबीर वाटू लागतो चक्क "काळा" या अवसेची या पूनवेची सवय झालीय सगळयांना... पहिल्या भेटीच्या चौकातच फूटतात "नव्या वाटा" दोघंही करतात एकमेकांना "टाटा" अहो तु्म्ही कशाला होताय डिस्टर्ब दुःख वैगरे विसरा त्याला भॆटते दूसरी तिलाही भॆटतो दूसरा पुन्हा होते देवाणघेवाण,पुन्हा होते "दिलफेक" पुन्हा जुन्या कहानीचा नव्याने "रिटेक" बदलत्या प्रेमाच्या रंगाची सवय झालीय सगळयांना... खरं सांगायचं अगदी मनापासून तर प्रेम नावाचा "टाईमपास" करण्याची सवय झालीय सगळयांना.....

म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही.....

कितीही सुंदर मुलगी दिसली तरी,
तिची स्तुती करुन तिला
हरबरयाच्या झाडावर चढवायला
आम्हाला कधी जमलेच नाही ॥१॥
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही.....

कोणाच्या मागे शिट्या मारत फिरणं
आमच्या तत्वात कधी बसलेच नाही ॥२॥
म्हणुन आम्हाला प्रेम ..

कोणी जर आवडलीच तर
स्वतः हुन गप्पांना सुरवात करायला
आम्हाला कधी जमलेच नाही ॥३॥
म्हणुन आम्हाला प्रेम ..

दुसरयाचे विचार ऎकत असतांना
आपले विचार मांडण्याची संधी
आम्हाला कधी साधताच आली नाही ॥४॥
म्हणुन आम्हाला प्रेम ..

कधी हिंमत करुन कोणाला जर विचारलेच
तर मी तुला त्या द्रुष्टीने कधी बघितलेच नाही
याव्यतिरीक्त दुसरे काही
आम्हाला ऎकायलाच मिळाले नाही ॥५॥
म्हणुन आम्हाला प्रेम ...

प्रेमात नाहीचा अर्थ हो असतो
हे गणित आम्हाला कधी समजलेच नाही ॥६॥
म्हणुन आम्हाला प्रेम..

फुलपाखरा प्रमाणे आम्हीही
बरयाच सुदर फुलांमध्ये वावरत होतो
पण जाऊन बसण्यासारखे फुल
अजुन आम्हाला दिसलेच नाही ॥७॥
म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही....

प्रेम कोणीही करीना

प्रेम कोणीही करीना, का अशी फिर्याद खोटी ?
प्रेम दे अन्यास आधी, ठेविशी का स्वार्थ पोटी ?

आपल्या या चारुतेशी विस्मरूनी जा सुकेशी,
भाळता कोणास देशी का न भक्तीची सचोटी ?

प्रेम का संगीन गुच्छी, प्रेम का रंगीन ओठी
प्रेम लाभे प्रेमळाला, त्याग ही त्याची कसोटी.


गीतकार - माधव ज्युलियन
गायक  - जी. एन्‌. जोशी
संगीतकार - जी. एन्‌. जोशी

प्रेम करावे असे, परंतू....

हिरवे हिरवे माळ मोकळे;
ढवळ्या ढवळ्या त्यावर गाई;
प्रेम करावे अशा ठिकाणी
विसरुनि भीती विसरुनि घाई.

प्रेम करावे, रक्तामधले;
प्रेम करावे शुद्ध, पशूसम;
शतजन्मांच्या अवसानाने
रक्तामधली गाठावी सम.

प्रेम करावे मुके अनामिक;
प्रेम करावे होउनिया तृण;
प्रेम करावे असे, परंतू....
प्रेम करावे हे कळल्याविण.


कवी - विंदा करंदीकर

प्रेम म्हणजे फक्त भावनांचा खेळ.....!

!..प्रेम म्हणजे फक्त भावनांचा खेळ..!

प्रेम म्हणजे फक्त भावनांचा खेळ...!!१!!
दोन मनाचा फक्त शब्दांचा मेळ,
दोन हृदयाचा फक्त तालमेल,
दोन भावनांचा फक्त फक्त मेळ,
प्रेम म्हणजे फक्त भावनांचा खेळ....!

प्रेम म्हणजे फक्त भावनांचा खेळ.....!!२!!
दूर असून सुद्धा जवळ असण्याचा मेळ,
फक्त अवाजावारून दुःख ओळखन्याचा मेळ,
ती नाराजी ओळखन्याची खेळ,
ती वेळ साधून प्रेम करण्याचा खेळ,
सारा सारा फक्त भावनांचा खेळ,
प्रेम म्हणजे फक्त भावनांचा खेळ.....!!३!!

प्रेम म्हणजे फक्त भावनांचा खेळ.....!