विशाखा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
विशाखा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

निर्माल्य

होता मोहरला व संत वितरी मार्गावरी तो फुले
होते धुंद सुवास ते चहुकडे विश्वामधे दाटले,
स्वप्नांच्या कमली अलीपरि दडे रात्री सुके अन्तर
आणि पंख उभारवून दिवसा झापू बघे अम्बर !

वेशी दृष्टिपथात तू जणु उभी प्राचीवरी हो उषा
झाला आरुण जीवनौघ, भरला आल्हाद दाही दिशा
मूर्ती मोहक गौर, गोल सुख अन् किंचित निळ्या लोचनी
वाहे मन्थर आणि जीवनमयी त भावमन्दाकिनी !

साधी वेषतर्‍हा तयातहि खुले ती आकृती लालस
डोळ्यातूनच भावबन्ध जडले-प्रीती असे डोळस !
जाण्याला निघसी अचानक पुढे, व्याकूलसी पाहुनी,
गंगा लोपुनी गर्जना करित तो सिंधूच नेत्रांतुनी !

आणी गेलिस तू-वसन्तहि सखे गेला तुझ्या संगती,
पुष्पातील उडून गंध उरले निर्माल्य हे भोवती !


कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - विशाखा

आगगाडी आणि जमीन

शिरवाडकरांची ही कविता रुपकात्मक आहे. दलित-वर्गावर होणाऱ्या अत्याचारांचे आणि त्याच्या प्रतिक्रियेचे हे चित्रण आहे.


नको ग! नको ग!
आक्रंदे जमीन
पायाशी लोळत
विनवी नमून -

धावसी मजेत
वेगत वरून
आणिक खाली मी
चालले झुरुन

छातीत पाडसी
कितीक खिंडारे
कितिक ढाळसी
वरून निखारे!

नको ग! नको ग!
आक्रंदे जमीन
जाळीत जाऊ तू
बेहोष होऊन.

आगगाडी मात्र स्वतःच्या मस्तीत गुर्मित म्हणते -

दुर्बळ! अशीच
खुशाल ओरड
जगावे जगात
कशाला भेकड

पोलादी टाचा या
छातीत रोवून
अशीच चेंदत
धावेन! धावेन!

या उन्मत्त गाडीचे बोल ऐकून जमीन सूडाने पेटून उठते.

हवेत पेटला
सूडाचा धुमारा
कोसळे दरीत
पुलाचा डोलारा!

जमीनीच्या ताकदीपुढे गाडीचे काहीही चालले नाही -

उठला क्षणार्ध
भयाण आक्रोश
हादरे जंगल
कापले आकाश

उलटी पालटी
होऊन गाडी ती
हजार शकले
पडती खालती!


कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - विशाखा

ऋण

पदी जळत वालुका
वर उधाणलेली हवा जळास्तव सभोवती
पळतसे मृगांचा थवा

पथी विकलता यदा
श्रमुनि येतसे पावला तुम्हीच कवी हो, दिला
मधुरसा विसावा मला !


अहो उफळला असे
भवति हा महासागर धुमाळुनि मदांध या
उसळतात लाटा वर,

अशा अदय वादळी
गवसता किती तारवे प्रकाश तुमचा पुढे
बघुनि हर्षती नाखवे !

असाल जळला तुम्ही
उजळ ज्योति या लावता असाल कढला असे,
प्रखर ताप हा साहता,

उरात जखमातली
रुधिर-वाहिनी रोधुनी असेल तुम्हि ओतली
स्वर-घटात संजीवनी !

नकोत नसली जरी
प्रगट स्मारकांची दळे असंख्य ह्रदयी असती
उभी आपुली देवळे


कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - विशाखा

क्रांतीचा जयजयकार

गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार
अन् वज्रांचे छातीवरती घ्या झेलून प्रहार!

खळखळू द्या या अदय शृंखला हातापायांत
पोलादाची काय तमा मरणाच्या दारात?
सर्पांनो उद्दाम आवळा, करकचूनिया पाश
पिचेल मनगट परि उरातील अभंग आवेश
तडिताघाते कोसळेल का तारांचा संभार
कधीही तारांचा संभार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!

क्रुद्ध भूक पोटात घालू द्या खुशाल थैमान
कुरतडू द्या आतडी करू द्या रक्ताचे पान
संहारक काली, तुज देती बळीचे आव्हान
बलशाली मरणाहून आहे अमुचा अभिमान
मृत्यूंजय आम्ही! आम्हाला कसले कारागार?
अहो हे कसले कारागार?
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!

पदोपदी पसरून निखारे आपुल्याच हाती
होऊनिया बेहोष धावलो ध्येयपथावरती
कधी न थांबलो विश्रांतीस्तव, पाहिले न मागे
बांधू न शकले प्रीतीचे वा कीर्तीचे धागे
एकच ताळा समोर आणिक पायतळी अंगार
होता पायतळी अंगार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!

श्वासांनो जा वायूसंगे ओलांडुनी भिंत
अन् आईला कळवा अमुच्या हृदयातील खंत
सांगा वेडी तुझी मुले ही या अंधारात
बद्ध करांनी अखेरचा तुज करिती प्रणिपात
तुझ्या मुक्तीचे एकच होते वेड परि अनिवार
तयांना वेड परि अनिवार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!

नाचविता ध्वज तुझा गुंतले शृंखलेत हात
तुझ्या यशाचे पवाड गाता गळ्यात ये तात
चरणांचे तव पूजन केले म्हणुनी गुन्हेगार
देता जीवन-अर्घ्य तुला ठरलो वेडेपीर
देशील ना पण तुझ्या कुशीचा वेड्यांना आधार
आई वेड्यांना आधार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!

कशास आई, भिजविसी डोळे, उजळ तुझे भाल
रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल
सरणावरती आज अमुची पेटता प्रेते
उठतील त्या ज्वालांतून क्रांतीचे नेते
लोहदंड तव पायांमधले खळखळा तुटणार
आई, खळखळा तुटणार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!

आता कर ॐकारा तांडव गिळावया घास
नाचत गर्जत टाक बळींच्या गळ्यावरी फास
रक्तमांस लुटण्यास गिधाडे येऊ देत क्रूर
पहा मोकळे केले आता त्यासाठी ऊर
शरीरांचा कर या सुखेनैव या सुखेनैव संहार
मरणा, सुखेनैव संहार
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा क्रांतीचा जयजयकार


कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - विशाखा

स्मृति

नवलाख तळपती दीप विजेचे येथ
उतरली तारकादळे जणू नगरात
परि स्मरते आणिक करते व्याकुळ केव्हा
त्या माजघरातिल मंद दिव्याची वात!

वाऱ्यावर येथिल रातराणि ही धुंद
टाकता उसासे, चरणचाल हो मंद
परि स्मरतो आणिक करतो व्याकुळ केव्हा
त्या परसामधला एकच तो निशिगंध!

हेलावे भवती सागर येथ अफाट
तीरावर श्रीमान इमारतींचा थाट
परि स्मरतो आणिक करतो व्याकुळ केव्हा
तो नदीकिनारा आणि भंगला घाट!

बेहोष चढे जलशांना येथिल रंग
रुणझुणता नूपुर जीव बने निःसंग
परि स्मरतो आणिक करतो व्याकुळ केव्हा
तो आर्त मला जो ऐकविलास अभंग!

लावण्यवतींचा लालस येथे विलास
मदिरेत माणकापरी तरारे फेस
परि स्मरती आणिक करती व्याकुळ केव्हा
ते उदास डोळे, त्यातिल करुण-विलास!


कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - विशाखा

समिधाच सख्या या...

दूरस्थ कुणी दे तुझ्या करी ही कविता
वाहते जिच्यातुनि त्याची जीवन-सरिता,
खळखळे, अडथळे, सुके, कधी फेसाळे
परि अखंड शोधे वाट समुद्राकरिता ||

खडकाळ प्रान्त तो ही जेथून निघाली
पथ शोधित आली रानातून अकेली,
नच रम्य राउळे, कलापूर्ण वा घाट
तीरावर तुरळक परि अंकुरती वेली ||

नव पर्णाच्या या विरल माण्डवाखाली,
होईल सावली कुणा, कुणास कहाली,
तोषेल कुणी, शापील कुणी दुर्वास,
"या जळोत समिधा-भव्य हवी वृक्षाली !"

समिधाच सख्या या, त्यात कसा ओलावा,
कोठून फुलापरि वा मकरन्द मिळावा?
जात्याच रुक्ष या, एकच त्या आकांक्षा,
तव आंतर अग्नी क्षणभर तरि फुलवावा ||


कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - विशाखा

अहि नकुल

ओतीत विखारी वातावरणी आग
हा वळसे घालित आला मंथर नाग,
मधुनीच उभारी फणा, करी फुत्कार
ये ज्वालामुखीला काय अचानक जाग !

कधी लवचिक पाते खड्‌गाचें लवलवते,
कधी वज्र धरेवर गगनातुनी कडकडते,
कधी गर्भरेशमी पोत मधे जरतार,
प्रमदेचे मादक वस्त्र जणूं सळसळते.

मार्गावर याच्या लवत तृणाची पाती
पर्णावर सुमने मोडुनी माना पडती
थरथरती झुडुपे हादरती नववेली
जग गुलाम सारे या सम्राटापुढती.

चालला पुढे तो-काय ऐट ! आनंद !
अग्नीचा ओघळ ओहळतो जणुं मंद,
टाकली यमाने कट्यार वा कनकाची
चालली बळींचा वेध घेत ही धुंद.

वा ताण्डव करता सोम प्राशुनी काली
रक्तांत नाहली, शिरमुंडावळ भाली,
थयथया नाचता नरड्यांवर प्रेतांच्या,
हे कंकण निखळुनि पडले भूवर खाली.

चालला पुढे तो लचकत मुरडत मान,
अवतरे मूर्तिमान् मल्हारांतिल तान
चांचल्य विजेचे दर्याचे गांभीर्य
चालला मृत्युचा मानकरीच महान !

हा थांब-कुणाची जाळीमधे चाहूल
अंगावर-कणापरी नयन कुणाचे लाल,
आरक्त ओठ ते ध्वजा जणू रक्ताच्या,
रे नकूल आला ! आला देख, नकूल !

थबकलाच जागीं सर्प घालुनी वळसा,
रिपु समोर येता सोडुनी अन् आडोसा,
भूमीस मारुनी मागे तीव्र तडाका,
घे फणा उभारुन मरणाचा कानोसा.

पडलीच उडी ! कि तडितेचा आघात
उल्केपरि तळपत कण्यात घुसले दात,
विळख्यावर विळखे कसून चढवी सर्प
फुंफाट करी अन् पिशापरी त्वेषांत !

रण काय भयानक-लोळे आग जळांत
आदळती, वळती, आवळती क्रोधांत,
जणु जिंकायासी गगनाचे स्वामित्व
आषाढघनाशी झुंजे वादळवात !

क्षणि धुळीत गेली वहात ती विषधार
शतखंडित झाले ते गर्वोन्नत ऊर
विच्छिन्न तनूंतुनि उपसुनी काढुनी दात
वार्‍यापरी गेला नकुल वनांतुनी दूर।

संग्राम सरे, रक्ताचे ओघळ जाती,
आनंदे न्हाती त्यात तृणाची पाती,
पिंजून कापसापरी पडे तो नाग,
ते खंड गिळाया जमले कीटक भोती !


कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - विशाखा

जालियनवाला बाग

रक्ताचे नच ओघळ सुकले अजुनि क्रुसावरचे
विरले ना ध्वनि तुझ्या प्रेषिता, अजुनी शब्दांचे

मंगल तव गीतांचा होतो मंदिरात घोष-
"प्रेम, शांती अन् क्षमा यामधे वसतो परमेश !"

आणि आज हे तुझ्या पताका ज्यांच्या हातात
निःशस्त्रांच्या रक्तामांसामधे नाहतात

मर्दांच्या बंदुका उडाल्या मुलाबायकात
जगजेत्यांच्या प्रराक्रमाची स्फूर्तिप्रद रीत !

पाचोळ्यापरि पडली पाहुन प्रेतांची रास
नयन झाकले असशील देवा, तूं अपुले खास;

असेल ही वा सैतानाची प्रभूवरी मात
एक जखम अन् नवीन येशू, तुझ्या काळजांत !


कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - विशाखा

सहानभूती

उभे भवती प्रासाद गगनभेदी
पथी लोकांची होय दाट गर्दी

प्रभादिपांची फ़ुले अंतराळी
दौलतीची नित चालते दिवाळी

कोप-याशी गुणगुणत अन् अभंग
उभा केव्हाचा एक तो अपंग

भोवतीचा अंधार जो निमाला
ह्रदयी त्याच्या जणु जात आश्रयाला

जीभ झालेली ओरडूनी शोश
चार दिवसांचा त्यात ही उपास

नयन थिजले थरथरती हात पाय
रुप दैन्याचे उभे मुर्त काय ?

कीव यावी पण तयाची कुणाला
जात उपहासुनी पसरल्या कराला

तोची येइ कुणी परतूनी मजुर
बघूनी दीना त्या उभारुनी ऊर

म्हणे राहीन दीन एक मी उपाशी
परि लाभु दे दोन घास त्यासी

खिसा ओतुनी त्या मुक्या ओन्जळीत
चालू लागे तो दिनबंधू वाट

आणी धनिकांची वाहने पथात
जात होती ती आपुल्या मदात


कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - विशाखा

सात


वेडात मराठे वीर दौडले सात

“श्रुती धन्य जाहल्या, श्रवुनी अपुली वार्ता
रण सोडूनी सेनासागर अमुचे पळता
अबलाही घरोघर खऱ्या लाजतील आता
भर दिवसा आम्हा, दिसू लागली रात”
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ १ ॥

ते कठोर अक्षर एक एक त्यातील
जाळीत चालले कणखर ताठर दील
“माघारी वळणे नाही मराठी शील
विसरला महाशय काय लावता जात!”
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ २ ॥

वर भिवयी चढली, दात दाबिती ओठ
छातीवर तुटली पटबंधाची गाठ
डोळ्यांत उठे काहूर, ओलवे काठ
म्यानातून उसळे तलवारीची पात
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ३ ॥

“जरी काल दाविली प्रभू, गनिमांना पाठ
जरी काल विसरलो जरा मराठी जात
हा असा धावतो आज अरि-शिबिरात
तव मानकरी हा घेऊनी शिर करांत”
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ४ ॥

ते फिरता बाजूस डोळे, किंचित ओले
सरदार सहा, सरसावूनी उठले शेले
रिकिबीत टाकले पाय, झेलले भाले
उसळले धुळीचे मेघ सात, निमिषांत
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ५ ॥

आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना
अपमान बुजविण्या सात अर्पूनी माना
छावणीत शिरले थेट भेट गनिमांना
कोसळल्या उल्का जळत सात, दर्यात
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ६ ॥

खालून आग, वर आग, आग बाजूंनी
समशेर उसळली सहस्र क्रूर इमानी
गर्दीत लोपले सात जीव ते मानी
खग सात जळाले अभिमानी वणव्यात
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ७ ॥

दगडांवर दिसतील अजून तेथल्या टाचा
ओढ्यात तरंगे अजूनी रंग रक्ताचा
क्षितिजावर उठतो अजूनी मेघ मातीचा
अद्याप विराणि कुणी वाऱ्यावर गात
वेडात मराठे वीर दौडले सात… ॥ ८ ॥


कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - विशाखा

पृथ्वीचे प्रेमगीत

युगामागुनी चालली रे युगे ही, करावी किती भास्करा वंचना
किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी, कितीदा करू प्रीतीची याचना

नव्हाळीतले ना उमाळे उसासे, न ती आग अंगात आता उरे
विझुनी अता यौवनाच्या मशाली, उरी राहिले काजळी कोपरे

परी अंतरी प्रीतीची ज्योत जागे, अविश्रांत राहील अन् जागती
न जाणे न नेणे कुठे चालले मी, कळे तू पुढे आणि मी मागुती

दिमाखात तारे नटोनी थटोनी शिरी टाकती दिव्य उल्काफुले
परंतु तुझ्या मूर्तिवाचून देवा, मला वाटले विश्व अंधारले

तुवा सांडलेले कुठे अंतराळात वेचुनिया दिव्य तेज:कण
मला मोहवाया बघे हा सुधांशु, तपाचार स्वीकारुनि दारूण

पिसारा प्रभेचा उभारून दारी पहाटे उभा शुक्र हा प्रेमळ
करी याचना प्रीतीची लाजुनि लाल होऊनिया लाजरा मंगळ

निराशेत संन्यस्त होऊनी बैसे ऋषींच्या कुळी उत्तरेला ध्रुव
पिसाटापरी केस पिंजारुनि हा, करी धूमकेतू कधी आर्जव

परी भव्य ते तेज पाहुन पूजुन घेऊ गळ्याशी कसे काजवे
नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा तुझी दूरता त्याहुनि साहवे

तळी जागणारा निखारा उफाळून येतो कधी आठवाने वर
शहारून येते कधी अंग तुझ्या स्मृतीने उले अन् सले अंतर

गमे की तुझ्या रूद्र रूपात जावे, मिळोनी गळा घालोनिया गळा
तुझ्या लाल ओठांतली आग प्यावी, मिठीने तुझ्या तीव्र व्हाव्या कळा

अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन् मला ज्ञात मी एक धूलिकण
अलंकारण्या परी पाय तुझे धुळीचेच आहे मला भूषण


कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - विशाखा

कोलंबसाचे गर्वगीत

हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे, प्रतिध्वनीने त्या समुद्रा, डळमळु दे तारे
विराट वादळ हेलकावु दे पर्वत पाण्याचे ढळु दे दिशाकोन सारे

ताम्रसुरा प्राशुन मातु दे दैत्य नभामधले, दडु द्या पाताळी सविता
आणि तयांची अधिराणी ही दुभंग धरणीला, कराया पाजळु दे पलिता

की स्वर्गातून कोसळलेला, सूड समाधान मिळाया प्रमत्त सैतान
जमवुनि मेळा वेताळांचा या दरियावरती करी हे तांडव थैमान

पदच्युता, तव भीषण नर्तन असेच चालु दे फुटु दे नभ माथ्यावरती
आणि तुटु दे अखंड उल्का वर्षावत अग्नी नाविका ना कुठली भीती

सहकाऱ्यांनो, का ही खंत जन्म खलाशांचा झुंजण्या अखंड संग्राम
नक्षत्रांपरी असीम नीलामध्ये संचरावे, दिशांचे आम्हांला धाम

काय सागरी तारु लोटले परताया मागे, असे का हा आपुला बाणा
त्याहुन घेऊ जळी समाधी सुखे कशासाठी, जपावे पराभूत प्राणा?

कोट्यवधी जगतात जीवाणू, जगती अन् मरती जशी ती गवताची पाती
नाविक आम्ही परंतु फिरतो सात नभांखाली निर्मितो नव क्षितिजे पुढती

मार्ग आमुचा रोधू न शकती ना धन ना दारा घराची वा वीतभर कारा
मानवतेचे निशाण मिरवू महासागरात, जिंकुनी खंड खंड सारा

चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती, कथा या खुळ्या सागराला
"अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला!"


कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - विशाखा