केशवाचें ध्यान धरूनि अंतरीं । मृत्तिके माझारीं नाचतसे ॥ १ ॥

विठ्ठलाचें नाम स्मरे वेळोवेळ । नेत्रीं वाहे जळ सद्‍गदीत ॥ २ ॥

कुलालाचे वंशीं जन्मलें शरीर । तो गोरा कुंभार हरिभक्त ॥ ३ ॥


- संत गोरा कुंभार

सरितेचा ओघ सागरीं आटला । विदेही भेटला मनामन ॥ १ ॥

कवणाचे सांगातें पुसावया कवणातें । सांगतों ऐक तें तेथें कैचें ॥ २ ॥

नाहीं दिवस राती नाहीं कुळ याती । नाहीं माया भ्रांति अवघेची ॥ ३ ॥

म्हणे गोराकुंभार परियेसी नामदेवा सांपडला ठेवा विश्रांतीचा ॥ ४ ॥


   - संत गोरा कुंभार

केशवाचे भेटी लागलें पिसें । विसरलें कैसें देहभान ॥ १ ॥

झाली झडपणी झाली झडपणी । संचरलें मनीं आधीं रूप ॥ २ ॥

न लिंपेची कर्मीं न लिंपेची धर्मी । न लिंपे गुणधर्मी पुण्यपापा ॥ ३ ॥

म्हणे गोरा कुंभार सहज जीवन्मुक्त । सुखरूप अद्वैत नामदेव ॥ ४ ॥


  - संत गोरा कुंभार

 श्रवणें नयन जिव्हा शुद्ध करी । हरीनामें सोहंकारी सर्व काम ॥ १ ॥

मग तुझा तूंचि दिवटा होसीगा सुभटा । मग जासील वैकुंठा हरिपाठें ॥ २ ॥

रामनामें गणिका तरली अधम । अजामिळ परम चांडाळ दोषी ॥ ३ ॥

म्हणे गोरा कुंभार विठ्ठल मंत्र सोपा । एक वेळा बापा उच्चारीरे ॥ ४ ॥


  - संत गोरा कुंभार

 प्रेमळ तो भक्त कुंभार गोरा।।१।।

असे घराश़मी करीत व्यवहार

न पडे विसर विठोबाचा ।।२।।

कालवुनी माती तुडवीत गोरा।

आठवीत वरा रखुमाईच्या।।३।।

प्रेमे अंगी असे झाकुनी नयन

करीत भजन विठोबाचे ।।४।।

 

- संत नामदेव

 मन गुंतलेले देखा पांडुरंगी।।१।।

मृतिकेसम जाहला असे गोळा।

बाळ मिसळला मृतिकेत ।।२।।

रक्तमांस तेणे जाहला गोळा लाल

नेणवे तात्काळ गोरोबासी।।३।।

एका जनार्दनी उटक आणुनी कांता

पाहे तवं तत्वता बाळ न दिसे।।४।।


  - संत एकनाथ

 योग याग जप तप अनुष्ठान । नामापुढें शीण अवघा देखे ॥१॥

नामचि पावन नामचि पावन । अधिक साधन दुजें नाहीं ॥२॥

कासया फिरणें नाना तीर्थाटणी । कासया जाचणी काया क्लेश ॥३॥

चोखा म्हणे सुखे जपता विठ्ठल । सुफळ होईल जन्म त्याचा ॥४॥


  - संत चोखामेळा