उंट

क्षितिज नाचले वाळूभवती
वाळु बरळली, ’नाही, नाही.’
अशाच वेळी उंट उगवला;
आणि म्हणाला, ’करीन काही.’
अन मानेच्या बुरुजावरती
चढले डोळे अवघड जागी;
क्षितिज पळाले दूर दूर अन
वाळु जाहली हळूच ’जागी’.
रूप असे पाहुनी अजागळ
भुलले वाळूचे भोळेपण;
आणि तिच्या त्या वांझपणावर
गळला पहिला सृजनाचा क्षण.


उंट चालला वाळूवरुनी
वाळु म्हणाली, ’आहे, आहे.’
...खय्यामाने भरले पेले;
महंमदाने रचले दोहे.
हा यात्रेकरु तिथे न खळला.
निळा पिरॅमिड शोधित जाई!
तहानेसाठी प्याला मृगजळ;
भूक लागता तहान खाई.
निळा पिरॅमिड दिसला का पण?
...खूण तयाची एकच साधी...
निळा पिरॅमिड दिसतो ज्याला
तोच पिरॅमिड बनतो आधी.

कवी - विंदा करंदीकर

आधीच ठरले होते

आधीच ठरले होते तुझे माझे नाते
म्हणुनच ह्रदय फक्त तुझे गीत गाते
एकांतपणी ही माझ्या साथ तु येते
कळत न कळत गीत तयार होते
योगा योग म्हण नाही तर अंधश्रधा
पण लाखोंच्या दुनियेत मन तुझेच का होते ?
आधीच ठरले होते तुझे माझे नाते
म्हणुनच ह्रदय फक्त तुझे गीत गाते
टाळतो मी , जाळतो मी, तरी ही
मनापुढे कित्येकदा हारतो मी
स्वप्नात ही तुझाच वावर
झोपेत ही मुखी नाव तुझेच येते
आधीच ठरले होते तुझे माझे नाते
म्हणुनच ह्रदय फक्त तुझे गीत गाते
नाही कळत जगाला जगापलिकडे हे जाते
"कृष्ण, कृष्ण "करीत मीरा विष ही पीते
ठरविले होते आधीच त्याने म्हणुन हे होते
मान न मान तु पण मन गीत तुझेच गाते
आधीच ठरले होते तुझे माझे नाते
म्हणुनच ह्रदय फक्त तुझे गीत गाते

तू

तू तेव्हा अशी,
तू तेव्हा तशी,
तू बहराच्या बाहूंची.

तू ऐल राधा,
तू पैल संध्या,
चाफेकळी प्रेमाची.

तू काही पाने,
तू काही दाणे,
तू अनोळखी फुलांची.

तू नवी जुनी,
तू कधी कुणी,
खारीच्या गं डोळ्यांची.

तू हिर्वीकच्ची,
तू पोक्त सच्ची,
खट्टीमिठ्ठी ओठांची.

तू कुणी पक्षी:
पिसांवर नक्षी
कवितेच्या ईश्वराची


कवी - आरती प्रभू
कवितासंग्रह - नक्षत्रांचें देणें

तुझे नाम मुखी

तुझे नाम मुखी ध्यान तुझे डोळा
व्रुत्ती या चंचळा स्थिरावल्या॥

चिंता भय दुःखे अवघी दूर झाली
अनाथांचा वाली जवळी केला॥

भिकार या जगी इच्छित न मिळे काही
म्हणुनी तुझे पायी भिक्शां-देहि॥

केशवसुत म्हणे देवा दीन-नाथा
तुझे पायी माथा वाहियेला॥


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय

किती पायी लागू तुझ्या

किती पायी लागू तुझ्या
किती आठवू गा तूंते
किती शब्द बनवू गा
अब्द अब्द मनी येते

काय गा म्या पामराने
खरडावी बाराखडी
आणि बोलावी उत्तरे
टिनपट वा चोमडी

कधी लागेल गा नख
तुझे माझिया गळ्याला
आणि सामर्थ्याचा स्वर
माझिया गा व्यंजनाला !

सोपेच असतात तुझे केस

सोपेच असतात तुझे केस
सोपीच असते लकेर डोळ्यांची
सोप्याच असतात तुझ्या गाठी
कठीण असते तर्‍हा चोळ्यांची
सोपेच असते मानेचे वळण
सोपीच उतरण निमुळत्या पाठीची
सोपेच असते तुझे पाऊल
कठिण असते वाट दाटीची
सोपाच असतो राग, अनुराग
सोपीच असते तुझी कळ
सोप्या सोपस मांड्यामध्ये
दहा हत्तींचे असते बळ...

कवी-विंदा करंदीकर

दिसली नसतीस तर

रतन अबोलीची वेणी माळलेली
आणि निळ्या जांभळ्या वस्त्रालंकारात
संध्येसारखी बहरलेली तू
तळ्याकाठच्या केवड्याच्या बनात
आपल्याशीच हसताना मला दिसली नसतीस
तर आज माझ्या जीवनाच्या अस्ताचलावर
हा भुलावणा सप्तरंगी सोहळा
असा सर्वांगांनी फुलारलाच नसता.

आपल्याच नादात तू
पाठ फिरवून परत जाताना
तुझी पैंजणपावले जिवघेण्या लयीत
तशी पडत राहिली नसती
तर माझ्या आनंदविभोर शब्दांतून
कातरवेळची कातरता
आज अशी झिणझिणीत राहिलीच नसती.

अबोलकेपणाच्या गूढ गाढाईने
जाईजुईच्या सान्द्र मंद सुगंधाचा लळा
सहज चुकार स्पर्शाने तू मला लावला नसतास
तर उमलत्या फुलपाखरांची
आणि मुक्याभाबड्या जनावरांची
आर्जवी हळूवार भाषा
इतक्या स्पष्टपणाने मला कळलीच नसती.

तू कशामुळे माझी जिवलग झालीस
ते खरेच मला आता आठवत नाही
पण मला तोडताना
समुद्रकाठच्या सुरुंच्या बनात
मिट्ट काळोखातून चंद्रकोर उगवेपर्यन्त
तू मुसमुसत राहिलीस
हे मात्र मी अजून विसरू शकलेलो नाही.
त्या वेळची तुझी ती आसवे
अजून माझ्या कंठाशी तुडुंबलेली आहेत.
तू तेव्हा तशी मुसमुसली नसतीस
तर माझ्या शृंगाराचा अशोक
आज करुणेच्या आरक्त फ़ुलांनी
असा डवरलाच नसता.

तू तेव्हा आकाशा एवढी विशाल
आणि अवसेच्या गर्भासारखी दारूण
निराशा मला देउन गेली नसतीस
तर स्वत:च्याच जीवन-शोकांतिकेचा
मनमुराद रस चाखून
नि:स्संग अवधूतासारखा
मी या मध्यरात्रीच्या चांदण्यात
असा हिंडत राहिलोच नसतो.

तू केवळ माझी प्रेयसी नव्हतीस
माझी सशरीर नियती होतीस.
तसे नसते तर आज जो काय मी झालो आहे
तो झालोच नसतो.

कवी-बा.भ.बोरकर