आता सुटला धीर!

आता सुटला धीर,
सख्या बघ
आता सुटला धीर!

कुठवर लपवू
ह्र्दयामधला
हा रुतलेला तीर ?

हासत वरवर
रोधू कुठवर
हे नयनांचे नीर ?

भ्रामक, अपुरे
शब्द दुहेरी
वाढवतात फिकीर

जीवन अथवा
मरण मिळू दे :
शिणले ह्र्दयशरीर

काय खरे ते
नीट कळू दे
तू केलास उशीर


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

"मी रोज जगते आहे......"

पुन्हा चालले ती वाट, सोबतीस घाव उरात
मी रोज जगते आहे, एकाकी बस शून्यात !

सांगू कसे कुणाला, आधार ना मज कुणाचा
वेलीवरल्या कळीचा, त्या वेलीस भार झाला
मग आस का मी ठेवू कुणाची या जगात
मी रोज जगते आहे, एकाकी बस शून्यात !

स्वरात माझ्या दडली एक आर्त हाक होती
जाऊन ओठांनजीक अबोलच ती परतून येई
आवाज तिचा तो घुमतो मनातल्या मनात
मी रोज जगते आहे, एकाकी बस शून्यात !

नयनांत आसवांची रोज रात उतरत आहे
रात निजून अंधारी मज रोज जागवत आहे
टिपूस एक उजेड मी शोधते त्या तिमिरात
मी रोज जगते आहे, एकाकी बस शून्यात !

जख्म होई मनाला तरीही का ते शांत होते
दखल घ्याया त्याची कुणी जवळी त्या नव्हते
माझ्यापरी एकांताची सवय जडली या मनास
मी रोज जगते आहे, एकाकी बस शून्यात !


कवियत्री - प्रीत 

***जेष्ठा गौरी ***


माहेरवाशिणी ज्या दिवसाची आतुरतेने वर्षभर वाट पहात असतात, तो दिवस म्हणजे ज्येष्ठा गौरी आगमनाचा.
जेव्हा लक्ष्मीला माहेरपणाचं सुख अनुभवावसं वाटतं तेव्हा ती गौर म्हणून येते, अशी कहाणी सांगितली जाते.

माहेर ही गोष्टच मुळात स्त्रिला अतिशय जवळची आहे. त्यामुळेच गौरींच्या आगमनाची तयारी देखील घरोघरी अगदी पारंपारीक पद्धतीने करतात.

ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींचे आगमन होते, अनुराधा नक्षत्रावर पूजन तर मूळ नक्षत्रावर विसर्जन केलं जाते. काही घरांत गौरींनाच ‘महालक्ष्मी’ असे म्हटले जाते. ज्येष्ठ नक्षत्रावर ही पूजा होते म्हणून ‘ज्येष्ठ गौरी’ असेही म्हणतात. महालक्ष्मी आणि गौरी किंवा ज्येष्ठा-कनिष्ठा, सखी-पार्वती अशा जोडीने त्या घरात आणल्या जातात. खड्याच्या गौरी, मुखवट्याच्या गौरी( शाडू, माती तसेच पितळी मुखवटे), तेरड्याच्या गौरी मोठ्या सजावटीसह घरोघरी बसवतात.

काही लोकांकडे परंपरेप्रमाणे पाणवठ्यावर जाऊन पाच खडे मुक्याने( तोंडात पाणी भरुन) आणून पूजन करतात तर काही ठिकाणी पाच मडक्यांची उतरंड किंवा भात मोजण्याचं माप घेतात. त्यावर गौरीचे मुखवटे बसवतात. हे दोन मुखवटे म्हणजे पार्वती व तिची सखी. काही लोकांकडे तेरड्याची गौर असते.

एक गौर तांदूळ भरलेल्या तांब्यावर, दुसरी गहू
भरलेल्या तांब्यावर तर काही घरांमध्ये सुपात बसवतात. तेरड्याची रोपे मुळासकट आणली जातात
कारण ही मुळे म्हणजे गौरीची पावले समजली जातात.

काही घरात नवसाने बोललेले गौरींचे बाळ देखील मांडतात. आणताना पावलांच्या रांगोळ्या, हळदी-कुंकूवा च्या सड्यावरुन वाजत-गाजत आणतात.

"गौरायी आली सोन्या-मोत्याच्या पावलांनी" असे म्हणतात.
स्त्रीचं मन नेहमी स्वत:च्या कुटुंबाशी जोडलेलं असतं. घराची भरभराट व्हावी घरात नेहमी सुखसमृद्धी नांदावी,
आपल्या माणसांचा उत्कर्ष व्हावा व त्यांना चांगले आरोग्य प्राप्त व्हावे ही इच्छा तिच्या मनात सदैव
असते त्यामुळेच हे सणवार, व्रतवैकल्ये ती मोठ्या उत्साहाने, श्रद्धेने व मनोभावे करते.

अशा ह्या महालक्ष्मीला, वैभवलक्ष्मीला, वेळप्रसंगी दुर्गामाता म्हणून अवतरणार्या आणि गृहलक्ष्मीला कोटी कोटी प्रणाम.

म्हणूं दे, ह्रदया

म्हणू दे, ह्र्दया,
अदय नीतीचे
नियम रीतीचे
विषम प्रीतीचे गीत;

गहन मनिषेने
जतन केलेल्या
पण न घडलेल्या
मधुर मिलनाचे गीत;

बिभव-दैन्याच्या
अशुभ कलहाचे,
व्यथित ह्र्दयाचे,
विकल विरहाचे गीत;

करुण तपलेल्या
नयनसलिलाने,
ह्र्दयरुधिराने
सतत भिजणारे गीत;

विगत आशेच्या
विकट भासांनी
कढत श्वासांनी
सतत सुकणारे गीत

म्हणूं दे, ह्रदया
म्हणूं दे, ह्रदया


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

"जीवना सांग मला रे...."

जीवना सांग मला रे, काय तू दिले आहेस
आजही का पावसात मन हे कोरडे आहे !

नावाखाली सुखाच्या, कोरी उमेद का दिली
रस्ता काटेरी त्यासवे दुतर्फा बाभळीची दरी !

नभ दावून स्वप्नांचे, पंख दिलेस तू शोभेचे
सांग कशी घेऊ भरारी पंखच माझे तोकडे !

फाटकीच झोळी माझी ना उरले त्यात काही
लावून ठिगळे तिला, जपले क्षण मी काही !

खुंटीला अडकवली होती हक्काची ती झोळी
न राहवून तिलाही पावसात तू वाहून नेली !

उपकार एक करून जा ओंजळ ही घेऊन जा
उगा का ठेवशी मागे हातावरल्या तुटक रेषा !


कवियत्री - प्रीत

माझी गाणी

-१-
ओळख, रे जीवा, आता देव-देवा
मग देह-भावा-संगे नाचू

माझा देव सखा सर्वत्र सारखा
कोणाला पारखा नाही नाही

बाहेर अंतरी उभा खाली-वरी
आहे घरीदारी खरोखर

विश्वाचे मंदिर, विश्वच ईश्वर,
सगुण सुंदर निर्गुणही

आता ओळखले : विश्वच हासले
नाग म्हणे, झाले समाधान

-२-
एकाचाच सूर एकतारीवर
मधुर मधुर वाजवावा

माझा योगा-याग आळवावा राग
डोलवावा नादरंगी

मंद मंद चाली वागीश्वरी आली
आता दुणावली कोवळीक

तन्मात्रांचे पांच नानाविध नाच
झाला सर्वांचाच एकमेळ

मन हळुवार झाले एककार
विविध विकार दुरावले


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ