***जेष्ठा गौरी ***


माहेरवाशिणी ज्या दिवसाची आतुरतेने वर्षभर वाट पहात असतात, तो दिवस म्हणजे ज्येष्ठा गौरी आगमनाचा.
जेव्हा लक्ष्मीला माहेरपणाचं सुख अनुभवावसं वाटतं तेव्हा ती गौर म्हणून येते, अशी कहाणी सांगितली जाते.

माहेर ही गोष्टच मुळात स्त्रिला अतिशय जवळची आहे. त्यामुळेच गौरींच्या आगमनाची तयारी देखील घरोघरी अगदी पारंपारीक पद्धतीने करतात.

ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींचे आगमन होते, अनुराधा नक्षत्रावर पूजन तर मूळ नक्षत्रावर विसर्जन केलं जाते. काही घरांत गौरींनाच ‘महालक्ष्मी’ असे म्हटले जाते. ज्येष्ठ नक्षत्रावर ही पूजा होते म्हणून ‘ज्येष्ठ गौरी’ असेही म्हणतात. महालक्ष्मी आणि गौरी किंवा ज्येष्ठा-कनिष्ठा, सखी-पार्वती अशा जोडीने त्या घरात आणल्या जातात. खड्याच्या गौरी, मुखवट्याच्या गौरी( शाडू, माती तसेच पितळी मुखवटे), तेरड्याच्या गौरी मोठ्या सजावटीसह घरोघरी बसवतात.

काही लोकांकडे परंपरेप्रमाणे पाणवठ्यावर जाऊन पाच खडे मुक्याने( तोंडात पाणी भरुन) आणून पूजन करतात तर काही ठिकाणी पाच मडक्यांची उतरंड किंवा भात मोजण्याचं माप घेतात. त्यावर गौरीचे मुखवटे बसवतात. हे दोन मुखवटे म्हणजे पार्वती व तिची सखी. काही लोकांकडे तेरड्याची गौर असते.

एक गौर तांदूळ भरलेल्या तांब्यावर, दुसरी गहू
भरलेल्या तांब्यावर तर काही घरांमध्ये सुपात बसवतात. तेरड्याची रोपे मुळासकट आणली जातात
कारण ही मुळे म्हणजे गौरीची पावले समजली जातात.

काही घरात नवसाने बोललेले गौरींचे बाळ देखील मांडतात. आणताना पावलांच्या रांगोळ्या, हळदी-कुंकूवा च्या सड्यावरुन वाजत-गाजत आणतात.

"गौरायी आली सोन्या-मोत्याच्या पावलांनी" असे म्हणतात.
स्त्रीचं मन नेहमी स्वत:च्या कुटुंबाशी जोडलेलं असतं. घराची भरभराट व्हावी घरात नेहमी सुखसमृद्धी नांदावी,
आपल्या माणसांचा उत्कर्ष व्हावा व त्यांना चांगले आरोग्य प्राप्त व्हावे ही इच्छा तिच्या मनात सदैव
असते त्यामुळेच हे सणवार, व्रतवैकल्ये ती मोठ्या उत्साहाने, श्रद्धेने व मनोभावे करते.

अशा ह्या महालक्ष्मीला, वैभवलक्ष्मीला, वेळप्रसंगी दुर्गामाता म्हणून अवतरणार्या आणि गृहलक्ष्मीला कोटी कोटी प्रणाम.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा