"मी रोज जगते आहे......"

पुन्हा चालले ती वाट, सोबतीस घाव उरात
मी रोज जगते आहे, एकाकी बस शून्यात !

सांगू कसे कुणाला, आधार ना मज कुणाचा
वेलीवरल्या कळीचा, त्या वेलीस भार झाला
मग आस का मी ठेवू कुणाची या जगात
मी रोज जगते आहे, एकाकी बस शून्यात !

स्वरात माझ्या दडली एक आर्त हाक होती
जाऊन ओठांनजीक अबोलच ती परतून येई
आवाज तिचा तो घुमतो मनातल्या मनात
मी रोज जगते आहे, एकाकी बस शून्यात !

नयनांत आसवांची रोज रात उतरत आहे
रात निजून अंधारी मज रोज जागवत आहे
टिपूस एक उजेड मी शोधते त्या तिमिरात
मी रोज जगते आहे, एकाकी बस शून्यात !

जख्म होई मनाला तरीही का ते शांत होते
दखल घ्याया त्याची कुणी जवळी त्या नव्हते
माझ्यापरी एकांताची सवय जडली या मनास
मी रोज जगते आहे, एकाकी बस शून्यात !


कवियत्री - प्रीत 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा