माझी गाणी

-१-
ओळख, रे जीवा, आता देव-देवा
मग देह-भावा-संगे नाचू

माझा देव सखा सर्वत्र सारखा
कोणाला पारखा नाही नाही

बाहेर अंतरी उभा खाली-वरी
आहे घरीदारी खरोखर

विश्वाचे मंदिर, विश्वच ईश्वर,
सगुण सुंदर निर्गुणही

आता ओळखले : विश्वच हासले
नाग म्हणे, झाले समाधान

-२-
एकाचाच सूर एकतारीवर
मधुर मधुर वाजवावा

माझा योगा-याग आळवावा राग
डोलवावा नादरंगी

मंद मंद चाली वागीश्वरी आली
आता दुणावली कोवळीक

तन्मात्रांचे पांच नानाविध नाच
झाला सर्वांचाच एकमेळ

मन हळुवार झाले एककार
विविध विकार दुरावले


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा