पाखरास

तुरी हातावर देऊन पाखरा,

गेलास चतुरा निसटुनी

लळा लावून तू जाशी अवचित

करूनी फजित मला का रे?

कोणती लागली तुला अशी ओढ

कोणते गा वेड भरे मनी?

करमत नाही, लागे हुरहूर

भरूनि ये ऊर स्मृतियोगे

तुझिया चंचूची खूण मी पाहून

एकान्ती स्फुंदून रडतो मी


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

काम

विजय : कारे संजय, तु कधिपासुन इथे काम करतो आहेस ?

संजय : मालकांनी कामावरुन काढून टाकायची धमकी दिल्यापासून.

आली पंढरीची दिंडी

दारीं उभे भोये जीव
घरीं पयाले पाखंडी
टायमुर्दुंगाचि धून
आली पंढरीची दिंडी

पुढें लाह्याची डालकी
बुक्कागुलालाची गिंडी
मधी चालली पालखी
आली पंढरीची दिंडी

दोन्ही बाजू वारकरी
मधीं 'आप्पा महाराज'
पंढरीची वारी करी-
आले 'जयगायीं, आज
आरे वारकर्‍या, तुले
नही ऊन, वारा थंडी
झुगारत अवघ्याले
आली पंढरीची दिंडी

टायमुर्दुंगाच्यावरी
हरीनाम एक तोंडी
'जे जे रामकिस्न हारी'
आली पंढरीची दिंडी

शिक्यावर बालकुस्ना
तठी फुटली रे हांडी
दहीकाला खाईसनी
आली पंढरीची दिंडी

मोठ्या तट्ट्याच्या दमन्या
त्यांत सर्वा सामायन
रेसमाच्या कापडांत
भागवत रामायन
आले 'आप्पा महाराज'
चाला दर्सन घेयाले
घ्या रे हातीं परसाद
लावा बुक्का कपायाले
करा एवढं तरी रे
दुजं काय रे संसारी
देखा घडीन तुम्हाले
आज पंढरीची वारी

कसे बसले घरांत
असे मोडीसन मांडी
चला उचला रे पाय
आली पंढरीची दिंडी


कवयित्री – बहिणाबाई चौधरी

पिंजरा

कोंडून ठेविशी पिंजर्‍यात मला

म्हणशी, 'तू लुळा पांगळा रे'

उगवून झाला अंकूर हा वर

धोंडा तू त्यावर ठेवलास

टोचून बोलशी, 'खुरट तू खुजा

पिंड रोगी तुझा मूळचाच !

माझ्या सामर्थ्याची तुला ना कल्पना

चालू दे वल्गना दुष्टा, तुझी

येईल तो क्षण, पंख उभारून

घेईन उड्डाण अंतराळी !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

अपराध

तुझा मी कोणता अपराध केला?

जिव्हारी मारिला बाण माझ्या !

एकान्तात होतो गात मी मंजुळ

तोच तू घायाळ केले मला

अंतरीच्या कोणा सांगू मी वेदना ?

तुला रे कल्पना काय त्याची !

भरून का कधी जखम येणार !

आता उपचार कशाला रे !

कसा कंठ खुला करून मी गाऊ ?

भरारी मी घेऊ अंतराळी ?


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

नाटकी मी

काय जीवनाचे केले मी सार्थक !

करूनी नाटक दाखविले

कुणी केले टाळ्या पिटूनी कौतुक

त्यांना ते ठाऊक खरे खोटे

मुळातच होते थोडे भांडवल

होता तो केवळ मूर्खपणा

फसलो स्वतःला मानून शहाणा

अंगाशी बहाणा परी आला

नाटकी मी, नका भुलू माझ्या सोंगा

भीड नको, सांगा खरे खोटे !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

आई

थोडके आपुले सोसून मरण

माझे तू जीवन घडवीले

थोडके आपुले देऊन व्यक्तित्व

माझे तू जीवत्व वाढवीले

थोडके आपुले देऊन कवित्व

माझे स्फुर्ति-काव्य फुलवीले

पाजळून माझी जीवनाची ज्योत

क्षीण तुझा होत आता दीप

बाळ तुझा होऊ पाहे उतराई

अशक्य ते आई, जन्मोजन्मी


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या