चैत्राची सोनेरी पहाट..
नव्या स्वप्नाची नवी लाट,
नवा आरंभ, नवा विश्वास
नव्या वर्षाची हीच तर खरी सुरवात

गुडी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

गुढी उभारनी

गुढीपाडव्याचा सन
आतां उभारा रे गुढी
नव्या वरसाचं देनं
सोडा मनांतली आढी

गेलसालीं गेली आढी
आतां पाडवा पाडवा
तुम्ही येरांयेरांवरी
लोभ वाढवा वाढवा

अरे, उठा झाडा आंग
गुढीपाडव्याचा सन
आतां आंगन झाडूनी
गेली राधी महारीन

कसे पडले घोरत
असे निस्सयेलावानी
हां हां म्हनतां गेला रे
रामपहार निंघूनी

आतां पोथारा हे घर
सुधारा रे पडझडी
करीसन सारवन
दारीं उभारा रे गुढी

चैत्राच्या या उन्हामधीं
जीव व्हये कासाईस
रामनाम घ्या रे आतां
रामनवमीचा दीस

पडी जातो तो 'पाडवा'
करा माझी सुधारनी
आतां गुढीपाडव्याले
म्हना 'गुढी उभारनी'

काय लोकाचीबी तर्‍हा
कसे भांग घोटा पेल्हे
उभा जमीनीच्या मधीं
आड म्हनती उभ्याले

आस म्हनूं नही कधीं
जसं उभ्याले आडवा
गुढी उभारतो त्याले
कसं म्हनती पाडवा ?


कवयित्री – बहिणाबाई चौधरी

ध्येयावर !

झिरुन सिकताकणांपरिस जाति आयुःक्षण

हळूहळु म्हणून हा डळमळे पहा हृत्तट

हुरुप नच राहिला, मतिहि जाहली अस्थिर

निरर्थक विचारितो निज मना, ’करु काय मी ?’

हिमाद्रि-शिखराहुनी अधिक उंच मद्‌ध्येय, ती---

जिवा सतत ओढणी गगनिच्या पतंगापरी

जिणे अजुनि पायथ्यावरिच राहुनी कंठितो

वरी नजर टाकिता नयन जाति हे फाटुनी !

विशाल दिसती उभे किति पहाड माझ्यापुढे

चढून अवघी मला चढण थेट जाणे असे

प्रवासपथ पाहुनी बिकट, वृत्ति हो कंठित

इथून मम जीव हा तळमळे समुत्कंठित !

उडून दिन चालले तरल या अवस्थेमधे

कसे न अजुनी पडे प्रगतिचे पुढे पाउल ?

वृथा बघत अंबरी निघुन आयु जाणार का ?

मनोरचित वैभवे विफल हाय ! होणार का ?

अशी अहह ! दुर्दशा बघु नकोस गे शारदे

तुझाच वसती करी नव ’निसर्ग’ ध्येयावर

क्षणात मज पोचवी बसवुनी तुझ्या वाहनी

सवे सुभग घेत मी कवनदेहिनी नंदिनी !

प्रभाव मग तू पहा जननि, तेथ जाताक्षणी

वसंत फुलवील ती रुचिर दिव्य आलापिनी

बघून नव वैभवा मग हवेतल्या देवता

’अहो नवल !’ बोलुनी तुकवितील माना निज

अदृश्य किमयांसवे उतरतील त्या खालती

सहर्ष कवितेत मी प्रगटवीन त्या अद्‌भुत

अनेक किमया सुधोपम मिळून गंगानदी

प्रसन्न, मधु गायिका सरस वाहु लागेल ती !

प्रवाह मग मी तिचा वरुनि खालती आणिन !

म्हणेल अवघे जगत्, ’अवतरे महाकाव्य हे !’

भगीरथ उभा असे जननि गे, परी प्रश्न हा

प्रवाह शिरि झेलुनी धरिल कोण गंगाधर ?

चमत्कृति करीन मी सकल उच्च ध्येयावर

भुईवरति रांगुनी अधिक पांगला होइन

त्वरा करुनि पोचवी मजसि शारदे, कारण

झिरुन सिकताकणांपरिस जाति आयुःक्षण !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

काय घडे अवगत

उचलला हारा

हारखलं मन भारी

निजला हार्‍यांत

तान्हा माझा शरीहांरी

डोक्यावर हारा

वाट मयाची धरली

भंवयाचा मया

आंब्याखाले उतरली

उतारला हारा

हालकलं माझं मन

निजला हार्‍यांत

माझा तानका 'सोपान'

लागली कामाले

उसामधी धरे बारे

उसाच्या पानाचे

हातींपायीं लागे चरे

ऐकूं ये आरायी

धांवा धांवा घात झाला !

अरे, धांवा लव्हकरी

आंब्याखाले नाग आला

तठे धांवत धांवत

आली उभी धांववर

काय घडे आवगत

कायजांत चरचर

फना उभारत नाग

व्हता त्याच्यामधीं दंग

हारा उपडा पाडूनी

तान्हं खेये नागासंग

हात जोडते नागोबा

माझं वांचव रे तान्हं

अरे, नको देऊं डंख

तुले शंकराचा आन

आतां वाजव वाजव

बालकिस्ना तुझा पोवा

सांग सांग नागोबाले

माझा आयकरे धांवा

तेवढ्यांत नाल्याकडे

ढोरक्याचा पोवा वाजे

त्याच्या सूराच्या रोखानं

नाग गेला वजेवजे

तव्हां आली आंब्याखाले

उचललं तानक्याले

फुकीसनी दोन्हीं कान

मुके कितीक घेतले

देव माझा रे नागोबा

नहीं तान्ह्याले चावला

सोता व्हयीसनी तान्हा

माझ्या तान्ह्याशीं खेयला

कधीं भेटशीन तव्हां

व्हतील रे भेटी गांठी

येत्या नागपंचमीले

आणीन दुधाची वाटी


कवियत्री - बहिणाबाई चौधरी

प्रतिभा

आकाशसृष्टि निमिषी नयनांत मावे

मी हो कशास तिजशी प्रतिभे तुलावे ?

पक्षी अथांग गगनी क्षण घे भरारी

आला न एकहि परी बघुनी तमारी

या भास्करात तळपे जरि भा स्वभावे

नामे यथार्थ परि ही प्रतिभा प्रभावे

त्या भास्करा मग कशास वृथा तुलावे ?

हीत बघून निज नेत्र दिपून जावे !

हा उंच उंच चमके गगनात तारा

कक्षेस सोडुनि फिरे न परी बिचारा

या पोकळीपलिकडे प्रतिभा प्रदेश

निर्मी नवे रुचिर, विश्व जसा परेश !

आता तुलू जरि शशी, क्षय त्यास आहे

ही पौर्णिमा-पदि सदैव विराजताहे

ही शीतला पसरली गगनात गंगा

हो म्लान, ये जइ उषा उधळीत रंगा

हीत न वेध परि लागत कोणताही

आळा न घालिल हिला कुणिही कधीही

केव्हातरी उगवतो नभि धूमकेतू

साश्चर्य दावित जनांस अभद्र हेतू

ठावा न अस्त हिजला, शुभदा सदा ही

हीत बघून कविचे मन फुल्ल होई

दिग्मंडळात करिते प्रतिभा प्रवेश

ही यत हृदी वसत, तोच खरा कवीश !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

जाईची फुले

हे नव्हे आकाश, भासे

यामिनीचा हा बगीचा

या नव्हे तारा, सडा हा

शुभ्र जाईच्या फुलांचा

आणि तो हौशी फुलांचा----

नी मुलांचा चंद्रराणा

नाकळे येऊन केव्हा

वेचुनी ने या फुलांना !

मात्र मी जेव्हा उठूनी

अंबरी पाहे पहाटे

एकही तारा दिसेना

अंतरी आश्चर्य वाटे

वेचलेली ती फुले का

चंद्रमा टाकून जाई !

आणि बागेतील माझ्या

ये बहारा शुभ्र जाई !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या

लिंबोळ्या

एकटा एकटा अगदी एकटा

अज्ञात बेटात अज्ञातवासात

दिवस कंठीत दिवस मोजीत

आहे मी दुर्भागी अगदी अभागी

घरदार दूर आईबाप दूर

मुलेबाळे दूर माय त्यांची दूर

इथे मी एकटा अगदि एकटा !

अशाच तंद्रीत अशाच भ्रांतीत

घरच्या स्मृतीत होऊनिया रत

बसलो होतो मी ’जीवन-आश्रमी’

एका सायंकाळी लिंबतरुखाली !

आकाशी मोठाले ढग काळे काळे

ढग वळवाचे मृग पावसाचे

अचानक आले खाली कोसळले

आले तसे गेले पुन्हा लख्ख झाले !

लिंब झाला चिंब भिजलो मी चिंब

जरी माझ्यावर होते त्याचे छत्र

कितीतरी वेळ मृगाचा हा खेळ

उभा मी पाहत परी शून्य चित्त !

मधून मधून अंग हालवून

जलबिंदूसर माझ्या शिरावर

सोडी ओघळून मजेत तो लिंब !

आणिक आपल्या पिकल्या लिंबोळ्या

टाकून दे खाली टपटप खाली

मजेत तो लिंब !

हातात घेतली एक मी लिंबोळी

वाटले चोखोनी चव तिची घ्यावी

कडवट गोड करावया तोंड !

परी न चाखिली टाकून ती दिली

माझा प्रौढपणा तसे करु दे ना

आणि माझे मन पंख पसरुन

भूतकाळामध्ये बाळपणामध्ये

गेले ते उडून मजला घेऊन !

माझ्या वाडीतील छोटी ती पडळ

पुढे रुंद ओटा शेजारीच गोठा

विहीरीजवळ थोराड तो लिंब !

ज्येष्ठ सुरु झाला मृगपावसाचा

आणि पावशाचा ’पेर्ताऽहो पेर्ताऽ‍हो’

टाहो फोडण्याचा

पिकल्या लिंबोळ्या खाली गळण्याचा !

भाऊ नी बहिणी मित्र नी मैत्रिणी

मिळुनी सगळे वेचल्या लिंबोळ्या

होते ते ’हापूस’ किंवा ’राजहंस’

पिवळे धमक आंबे नामवंत

आणि पडवीत तृण पसरुन

आम्ही त्या आंब्यांच्या लावियेल्या आढया

आंबराई होती पाडला लागली

घरामधी होत्या आढया लागलेल्या

पण त्या आढयांची पाडाच्या आंब्यांची

शुद्धही नव्हती गोडीही नव्हती !

आम्ही आढीतल्या शेलक्या पिवळ्या

काढिल्या लिंबोळ्या भरल्या टोपल्या

आणि ओटीवर मांडिला बाजार

खरेदीविक्रीचा झाला व्यवहार

चिंचोक्यांचा गल्ला केला मग गोळा

रुपये आण्यांचा हिशोब तो साचा !

कमाई पाहून गेलो हरखून

मग सगळ्यांनी मिळून चाखिल्या

पिवळ्या लिंबोळ्या !

आणिक म्हणालो, ’काय आंबे गोड !’

पुन्हा परतून आले माझे मन

आणि लिंबाखाली नव्हते ते आंबे

लिंबोळ्यांचा खच घ्यावया वेचून

पुन्हा तो संकोच !

मग मी बाळांना माझ्या सोनुल्यांना

मनच्या मनात घातलीसे साद

होती ती पुण्यात आपुल्या घरात

हासत खेळत नाचत डोलत !

’यारे इंदू, सिंधू शाम आणि नंदू

ये ग बाळ मंदा तान्हुल्या आनंदा !’

माझ्या भोवताली नाचा थयथय !

मोठयाने मोठयाने आरडा ओरडा

येथला एकांत भयाण एकांत

पिटूनिया टाळ्या पिटाळून टाका !

घ्यारे वेचूनिया येथल्या लिंबोळ्या

आंबे समजून सारे खा चोखून

मिटक्या मारुन म्हणा, ’हे हपूस

किती गोड गोड !’

हातात माझिया देऊन लिंबोळ्या

करा ना एकदा खाण्याचा आग्रह

होऊ द्या एकदा मुलामध्ये मूल

तुम्हा छोटयांमध्ये एक मोठे मूल !

माझिया वंशाचे माझिया रक्ताचे

माझिया बाल्याचे माझिया भावांचे

तुम्हा आहा अंश !

तुमच्यात माझा तुमचा माझ्यात

भरलेला आहे माझ्या ममत्वाचा

काही एक अंश !

गेलेल्या वाल्याचा गेलेल्या काळाचा

उगीच का शोक ?

गेलेच जे नाही हरपले नाही

अशा त्या श्रेयाचा उगीच का शोक ?

कल्पने, आवर आपली पाखर

पुन्हा वास्तवात चित्त आहे येत

अरेरे ! पुन्हा मी उरलो एकटा

अगदी एकटा

एका सायंकाळी लिंबतरुखाली !

डोळ्यांतून माझ्या गळून पडल्या

अश्रूंच्या लिंबोळ्या !

सहानुभूतीने आणि त्या लिंबाने

वरुन गाळिल्या आपल्या लिंबोळ्या !


कवी - ग. ह. पाटील
कवितासंग्रहलिंबोळ्या