फिर्याद

( चाल-उद्धवा शांतवन कर जा. )

जिनें मला वेडा केलें   तिच्यावरी ही फिर्याद ! ॥ध्रु०॥

ऋतु वसन्त येउनि कुसुमीं   उपवनास शोभा आली;
कुंजीं मीं बसलों एका   हर्षित मम वृत्ती झाली;
आली तों कोणी युवती   त्या स्थळीं रूपगुणखाणी;
चुम्बुनि मज गुणगुणली ती   मधुर गीत माझे कानीं !

तल्लीन सवें झालों,
विकलगात्र होउनि गेलों,
निर्वाणीं पूर्ण बुडालों ---
नुरलीच जगाची याद !

जिनें मला वेडा केलें   तिच्यावरी ही फिर्याद !
अन्तर्हित झाली रामा   भानावरि येतां कळलें;
विरही मी पीडित झालों   ह्रदयीं उत्कण्ठा---अनलें;
ध्यास तिचा घेउनि फिरलो  शून्य दिशा रानोमाळ,
तिचेवरी गाणीं वेडीं   गाइलीं क्रमाया काळ !

“ पुरतां न अनुग्रह करितां,
गेलीस कशी सुखसरिता ?
धांव ! करीं न दयाब्धि रिता !”---
ही तिला घातली साद !

जिनें मला वेडा केलें   तिच्यावरी ही फिर्याद !
स्वप्नांतचि केव्हां भेटे   नेते तों स्वर्गद्वारीं,
लोटिते मागुती खालीं   भूतलावरी अन्वारीं !
तेणें मी विव्हल भारी   संसारीं परि करमेना;

धन न करीं; वणवण करितों जम कोठ नीट जमेना !

तरि तिलाच चित्त ध्यातें,
निद्रेविण रजनी जाते !
आप्तवर्ग म्हणती ” यातें ---
कुठली ही जटली ब्याद !”

जिनें मल वेडा केलें   तिच्यावरी ही फिर्याद !
हीन दीन झालों छंदी   फंदी मी तुझिया नादीं,
त्यामुळें परी न मनाला  घालितों कधींहि विषादीं;
बूज तुवां या दासाची   केली गे नाहीं अजुनी,
दुःख हेंचि वाटे म्हणुनी   गातसें अशीं गार्‍हाणीं

तूंच चित्त आधीं हरिलें,
मज आतां कां दुरी धरिलें;
चिर चरण तुझे मीं स्मरले !---
हो प्रसन्न नुरवीं खेद !

जिनें मला वेडा केलें   तिच्यावरी ही फिर्दाद !


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- १९०२

रुष्ट सुन्दरीस

( चाल --- वीरा भ्रमरा )

नादीं लावुनि वेडा केलें ज्याला तूं सुन्दरी !
रुष्ट कशी होऊनि बैसशी आतां त्याच्यावरी ॥ध्रु०॥

सकल दैवतें तुच्छ करुनि मी तव भजनीं लागलों,
व्यर्थ का आजवरी भागलों ?

तुझ्या कृपेचा प्रसाद व्हावा म्हणुनी झटलों किती,
असे का त्याला कांहीं मिती ?

कधीं मला तूं उत्तेजनही दिलें ---
स्मरत नसे का ? --- स्मित मजला दाविलें !

अर्थपूर्ण --- वीक्षणेंहि केव्हां श्रम मम केले दुरी !
लहर कां आतां फिरली परी ?

कितीक माल्यें श्रमसाकल्यें गुम्फुनियां तीं भलीं
तुला गे सन्तत मीं वाहिलीं !

आभरणेंही असाधारणें दिधलीं तुजकारणें,
फिटाया दासाचें पारणें !

परि दुर्भग मम कसें उभें राहिलें ?
काय तयानें न्य़ून बरें पाहिलें ?

तेणेंकरुनी रोष असा तव उद्‍भवला अन्तरीं,
मम मना चिन्तावश जो करी !

हाय ! हाय ! हें विफल जिणें तव सहवासावांचुनी,
निघूं कीं निवटूं मनुजांतुनी !

प्रीतिविषय तो जर का परका प्राण्याला जाहला,
तयाचा जन्महेतु खुंटला !

विषण्ण तो मग विषवृक्षाचीं फळें
सुधारसाचीं मानुनि गिळिलचि बळें !

दोष तयाचा काय त्यामधें ?--- वद मधुरे ! सत्वरी ---
करूं ना मीहि अतां त्यापरी ?

तुजवरि पद्यें, हे अनवद्ये ! कितीतरी गाइलीं,
भक्तिविण कोणीं तीं प्रेरिलीं ?

तुजला वाहुनि असे घेतलें; म्हणुनि निदानीं असें
निखालस तुजला मी पुसतसें :---

निष्ठा माझी काय लाविसी कसा ?
कीं मज पिळिसी रुचि चढवाया रसा ?

किंवा तुझिया कुपेस नाहीं पात्रच मी लवभरी ?
सोक्ष कीं मोक्ष बोल लौकरी !


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- जुलै १८९७

थकलेल्या भटकणाराचें गाणें

किती रहावें तुजविण आतां ! धीर न मजला क्षण धरवे !
गेलें गेलें वय हें वायां ! --- मरणहि तें वाटे बरवें !

काय करावें मज न सुचे,
मुळीं न मजला किमपि रुचे,
ह्रदयी सगळें धैर्य खचे;

भणभण वणवण करित अधिक मज आढयींहि जगीं नच फिरवे !
किती रहावें तुजविण आतां ! धीर न मजला क्षण धरवे !

कितिक योजिले यत्न यावया तुजशीं मी उत्सुकतेनें !
व्यर्थ जाहले अवघे ! दुर्धर कसें न व्हावें मग जगणें !

पुष्णांनो ! तर दूर सरा !
कष्टक हो ! मार्गीं पसरा !
प्रकाश नलगे---तिमिर बरा !

सर्व चांगलें व्हावें होतें तुजसाठीं---पण लभ्य नव्हे !
किती रहावें तुजविण आतां ! धीर न मजला श्रण धरवे !

शूळ कपाळीं, कंडन ह्रदयीं, कम्प शरीरीं भरलासे,
सलिल लोचनीं, शीण अवयवीं, हाय ! निराशा मनीं वसे;

तरि, माझी ती भेटेल का ?
पांग मनींचा फिटेल का ?
अलिंगूं ती झटेल का ?

क्षमा करील का मला चुक्यांची ? --- पुसतों मी माझे बरचे !
किती रहावें तुजविण आतां ! धीर न मजला क्षण धरवे !


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- मुंबई २८ सष्टेंबर १८९३

प्रीति

प्रीति मिळेल का हो बाजारीं ?
प्रीति मिळेल का हो शेजारीं ?
प्रीति मेळेल का हो बागांत ?
प्रीति मिळेल का हो शेतांत ?

प्रीतिची नसे अशि ग मात;
पहा शोधुनी ह्रदयांत !

नंदनवनामघीं आला
कल्पलतेला बहर भला;
तिचीं ह्रदयीं बीजें पडलीं,
प्रीति त्यांतूनी अवतरली !

प्रीतिची असे अशि ग मात;
पहा आपुल्या ह्रदयांत !

प्रेमळ कृत्यांची माळ
प्रियजनकण्ठीं तूं घाल;
द्विगुणित मग तो प्रीति तुला
देइल, न धरी शंकेला.

प्रीतिचा असा असे न सौदा ---
प्रीतिनें प्रीति सम्पादा !

ह्रदयीं आलिंगन पहिलें,
चुम्बन मुखकमलीं वहिलें
आणिक रुचतिल ते चार
प्रीतिला होती उपचार !

प्रीति वाढली, गडें ग, सतत
पहा तूं प्रियजनहृदयांत !

प्रीति असेल का ग बाजारीं ?
वेडे ! प्रीति मिळेल का ग शेजारीं ? 


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
१८८८

प्रयाणगीत

( चाल---पांडुकुमारा पार्थ नरवरा )

तुजविण मजला कांहि असेना प्रिय या गे जगतीं;
तूं मम जीवित, तूं मम आत्मा, तूं माझी शक्ति !
तुजला सोडुनि जाणें येई, सखे ! जिवावरती,
परी ओढुनी दूर नेति या, निर्दय दैवगति !

प्रीति जगाचें वसन विणितसे, वामांगीं ढकली ---
धागा, परि तो परतुनि उजविस भेटतसे कुशलीं !
मेघ विजेला नभी सोडुनी खालीं ये, परि तो
रविदीप्तीच्या दिव्यरथीं तिज भेटाया वळतो !

रवि, पूवेंला रडत सोडुनी, कष्टें मार्ग धरी.
प्रहरामागें प्रहर लोटतां तिजला घे स्वकरीं !
धरेस सोडुनि गिरि जरि वरि ते उंच नभीं चढले
तरीं खालते कालगतीनें येती प्रेमकले !

प्रीतीचा पथ वर्तुळ आहे, नर त्यानें जातां
मागें असल्या प्रियेचिया तो सहजचि ये हाता !
धीर धरोनी आटप, म्हणुनी बाष्पें मजसाठीं,
ठसा प्रीतिचा ठेवूं शेवटीं ये ग गडे ! स्वोष्ठीं !


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- ११ जानेवारी १८८९

माझा अन्त

मीं पाहिली एक सुरम्य बाला;
वर्णू कसा त्या स्मरसंपदेला ?
वृक्षावरी वीज जघीं पडावी,
त्याच्या स्थितींतचि तिची महती पहावी.

माझी अवस्था बघुनीच तीचें
सौंदर्य सोपें अजमावयाचें;
वस्ताद जी चीज जगीं असावी,
तिचें स्वरूप सगळें परिणाम दावीं.

सौंदर्य पुष्पासम वर्णितात,
झालें मला कंटकसें प्रतीत;
सौंदर्य मानोत सुधानिधान,
तें जाहलें मज परंतु विषासमान !

नेत्रें क्षणीं तारवटून गेलीं,
अंगें ज्वरीं त्या परतंत्र झालीं,
झालों तिला मी बघतां भ्रमिष्ट,
शुद्धि सवेंचि मग होय अहा ! विनष्ट.

माझा असा अन्त अहो जहाला !
‘ कोठूनियां हा मग येथ आला !---’
ऐसा तुम्हां संशय येतसे का ?
मी भूत हें मम असें, नच यांत शंका !


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- वृत्तधैचित्र्य
- मुंबई, ४ जानेवारी १८९०

फार दिवसांनीं भेट

( चाल --- इस तनधनकी कोन बढाई )

बहुतां दिवशीं भेट जाहली,
प्रणयसिंधूला भरती आली ! ॥ध्रु०॥

आलिंगन दृढ देतां आला
उभयीं ह्रदयीं त्वरित उमाळा;
नावरून तो रमणीनयनीं
बाष्पें आलीं ऊन होउनी;

गलितशीर्ष निज पतिच्या ह्रदयीं
ठेवुनि रडली ती त्या समयीं;
तोहि उसासे टाकित, तिजला
चुम्बित, गाळूं टिपें लागला;

उभयाश्रुजलें मिसळुनि गेलीं !
बहुतां दिवशीं भेट जाहली !
वियोगसमयीं झालें त्यांचें
म्लान रूप तें परस्परांचें ---

ध्यानीं येतां, प्रेमग्रंथी
त्यांची झाली अधिकच दृढ ती;
कालें आणिक कष्टदशेनें
क्षीणत्वाला होतें जाणें

सगळयांचेंहि, परी प्रीतिचा
जोम वाढतो उलटा साचा !---
कुरवाळित अन्योन्यां ठेलीं !
बहुतां दिवशीं भेट जाहली !

किती वेळपर्यंत तयांना
कांहीं केल्याही वदवेना;
‘ प्रिय लाडके !’--‘ जिवलग नाथा !’
हे रव वदली मग उत्सुकता;

फुटकळ वाक्यें मग दोघांहीं
परस्परां जीं म्हटलीं कांहीं,
भाव त्यांतला कीं---नच व्हावा
वियोग फिरुनी, किंवा यावा

मृत्यूच दोघां त्याच सुवेळीं !
जधीं बहु दिनीं भेट जाहली !


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- २६ जानेवारी १८९८