पुष्पमाला

प्रियेला सादर केलेली पुष्पमाला किंवा कर्तव्य आणि प्रीति
नदीच्या तीरानें सहल करितां मी, जिवलगे,
पहाली ती शोभा कुसुमित वनाची जवळ गे;
तधीं तेथें गेलीं उचलूनि पदे मी झरझरा,
जसा बाळया शाळेमधुनि अपुला ये निज धरा !

तृणाची गे खालीं रुचिर हिरवी चादर बरी,
लतांची वृक्षांची निविड फुगडी शोभत वरी;
फुलें तीं वल्लीं नव किसलयीं शोभत किती !---
तुझ्या ओंच्यामध्यें जशिं निज अपत्यें विलसती !

स्वप्नांहीं तें होतें विपिन मधुरे ! फार गढलें,
मुलांच्या शब्दांहीं स्वसदन असे जेंवि भरलें;
सुगन्धें तें होतें स्थल भरुनि गेलें अतिशय
तुझ्या प्रेमानें हें भरुनि असतें जेंवि निलय !

तरी सुद्धां तेथें, मज गमतसे, लौकिक नव्हे,---
असें कांहीं होतें, कथन करण्या जें मज न ये; ---
वसे तो विश्वात्मा वरुनि कवितादेविस तिथें,
वसे जैसा मी हा मनुज तुजला घेउनि इथें .

मनीं माझ्या व्हावी चलित कविताशक्ति, म्हणुनि
कशाला एकाकी फिरत असतों नित्य निपिनी ,---
तुला तूं त्या ठायीं असतिस तरी हें समजतें;
कदाचित्‍ तूं गाणें मधुर रचिलें तेथ असतें !

तधीं मालें तेथें सहज कवनस्फूर्ति चढली,---
तुझी वर्णायाला अकपट अशी प्रीति सुचली;
फुलांच्या मीं भाषेंमधिं रुचिर हें काव्य रचिलें,
मिषानें माल्याच्या;--- ग्रहण कर तूं तें तर भलें.

शिरीं तूं या माल्या तर जिवलगे ! धारण करीं,
छबी तूझे काळया कुरळ अलकीं येइल बरी;
फुलांच्या गे भाषेमधिंच कवनें नित्य करणें.
मला व्हावें तेणें प्रिय. तुज शिरीं त्यांत धरणें.

सुवर्णाच्या भूषा जरि तव शिरीं या विलसती,
तरी या माल्याचें अणुभर न त्या काम करिती,---
करी हें सोनें गे प्रकट मम कर्तव्यपरते,
मदीय प्रेमाला प्रकट पण हें माल्य करितें

सुवर्णाचे केले तुज जरि अलंकार रमणी,
करावें तूं प्रेमा अधिक मजशीं काय म्हणुनी ?---
स्थितीला शोभावे, तुजवरि अलंकार असले
न मीं केलें. मातें म्हणतिल तरी काय सगळे ?

जरी तूझी माझी प्रबल नसती प्रीति, तरि ते
जनांसाठीं केले तुजवरि अलंकार असते;---
परी तूझे तेथें स्मरण करुनी, प्रेमळपणें,
करें माझ्या झालें खचित नसतें माळ करणें.

( वसंततिलका )

कर्तव्या जोंवरि चुकूं न करावयास,
सम्बन्ध तों सुखद होय परस्परांस;
कर्तव्य तें परि जगीं न कधीं उदात्त
प्रीतिस जागृत करील परस्यरांत.

( शार्दूलविक्रीडित )

अन्यानें न अपेक्षिलें प्रियतमे ! जें आपणापासुनी,
तें सद्वर्तन दावितां सहज तो जातो मनीं मोहुनी,
त्याच्या गे ह्रदयांत नंतर उठे उद्वेग तो प्रीतिचा;
ऐसा आपण पाहतों नियम हा कान्ते ! सदा सुष्टिचा.

( शिखरिणी )

कधीं मी कर्तव्यीं चुकुनि तव गे चित्त दुखलें,
तरी चित्तामध्यें स्मरण कर हीं सुन्दर फुलें;
जधीं या हाताचें सकल बल जाईल सरुनी,
दिलेलें हें त्यानें स्मर सखि ! तधीं माल्य फिरुनी !


कवी - केशवसुत
१५-११-१८९०

कविता आणि प्रीति

( भुजंगप्रयात )

फिरावयास मी मित्र घेवोनि गेलों;
बघोनी सुरम्य स्थळा एक ठेलों;
किती हारिनें वृक्ष ते दाट होते,
जलाचे तळीं पाट होते वहाते;

तृणाच्या मधीं, राखिल्या गार जागा
कडेनें तयांच्या, लतांच्याहि रांगा---
फुलांच्या बहारांत त्या शोभताती;
अलींचे थवे त्यांवरी धांव घेती;

मधूनी किती पक्षि ते गोड गाती.
मृगेंही मघें स्वैर तीं क्रीडताती;
मयूरें अहा ! दाखवीती पिसारे;
बघूनी मना तोष होई अहा रे !

मधें अंगना स्पृष्ट ज्या यौवनानें
नजाऽव्याजरूपास साध्या मदानें
इथूनी तिथें चंचला नाचवीती,
पदालंकृति झंकृति तैं करीती;

मुलें खेळती नाचतीही मजेनें,
तयांचा अहो कोण उल्हास वाने ?
फुलें, तारका, ते दंवाचे तुषार,
तशीं मुग्ध हीं बालकें दिव्य फार !

अशी तेथली पाहुनी रम्य लीला,
मुखीं घालूनी ठाकलों अंगुलीला;
वदे मित्र मातें---“ पुढें चालणें ना ? ”
परी पाय तेथूनियां काढवेना !

( वसंततिलका )

बोले सखा “ गढुनि कां इतुका मनीं तूं ? ”
मी बोललों “ बघ मनांत विचारुनी तूं ”
तेव्हां पुसे “ अडविते कतिता ? ”---“ नव्हे रे,
प्रीती मला भूलविते-नच हालवे रे ! ”


कवी - केशवसुत
- मुंबई, ७ जानेवारी १८९०

प्रत

सिद्ध झालों मी दूर जावयाला,
कण्ठ तेव्हां तो फार भरुनि आला;
मला म्हटलें तूं गद‍गद स्वरानें
” खुशालीचें तें वृत्त लिहित जाणें ! ”

” लिहिन ” म्हटलें मी तुला आश्वसाया
पुढिल केला मीं मुळी नच विचार
करीं घेतां परि पत्र हें लिहाया
खुशालीचें क्षीणत्व दिसे फार !

लोचनांला या होसि तुं प्रकाश
मदीयात्म्याचा तूंच गे विकास
नाडि माझी तव करीं वाहताहे
ह्रदय माझें तव उरीं हालताहे !

करा अपुल्या तूं पहा चाचपून
उरा आपुलिया पहा तपासून.
प्रकृति माझीही तिथें तुज कळेल
विकृति माझी तुज तिथें आढळेल !


कवी - केशवसुत
- दिंडी
- १८८९

विकसन

( वसंततिलका )

कंपायमान कलिका सुकुमार झाली,
स्वेदें तदीय तनु चिंब भिजोनि गेली,
भेणें तिनें मुरकुनी शिर नम्र केलें,
बाष्पीय बिंदुहि अहा ! सहसा गळाले !

( शार्दूलविक्रीडित )

“ हा वेडे ! फुलण्यास लाज इतुकी कां अंतरीं पावसी ?
हास्या दावुनि, सिद्ध ही रसिक तो जिंकावया हो कशी ! ”
ऐसें पालक देव एक तिजला आश्वासुनी बोलला;
तेव्हां ती फुलली; रसज्ञ जनही सौख्यांत हा पोहला !


कवी - केशवसुत
- २८ जानेवारी १८८९

समृद्धि आणि प्रीति

एक दुसर्‍यास म्हणतोः---

आहे द्वीप सुरेख एक सखया त्या दक्षिणेच्या दिशे,
लंकेचें अजुनी भलें शकल तें राहूनि तेथें असे;
शोभे तें दिवसां सरित्पतिवरी, तेव्हां गमे इंदिरा
वैकुंठाहुनि पातली अपुलिया ताताचिया ही घरा !

तेथें कांचनमन्दिरें तळपती सम्पत्तिनें कोंदलीं,
उद्यानें जणुं काय नन्दनवनें स्वर्गाहूनी आणिलीं,
सारे भोग सदैव सिद्ध असती संगीतवाद्यादि ते ;
तेथें जाइल आयु साच मजला स्वप्नापरी वाटतें !

येतें का तूझिया मनांत वसुनी भोगां तिथें भोगणें ?
आधीं हें चुकलों परंतु तुजला सांगावया सांगणें ---
कीं येथें न शके कुणी पुरुण तो स्त्री आणण्याला कदा,
सीताशाप असे अलंघ्य असला द्वीपावरी त्या सदा !

दुसरा पहिल्यासः---

सीताशाप जरी मुळीच नसता त्या द्वीपखण्डावरी,
न्यायाला मजला जरी गवसती तेथें सखी अंतुरी,
ये तों मी न तरीहि तेथिल सुखें तीं भोगण्या आयतीं,
जीं प्रीतीस मला गमे ढकलती शाब्दावशेषाप्रति.

सीताशाप परन्तु त्यावरी असे दुर्लघ्य आतां तर;
तेव्हां पौरुषपूर्ण कोण असला राहील तेथें नर ?
आम्हांला रुचती न तीं श्रमफलें कान्ते दिल्यावांचूनी,
तेथें सेविल कोण अश्रमफलें ती एकला राहुनी ?

तूं माझ्याकरितां तरी हुडकुनी तें द्वीप रे काढणें,
जेथें रान भयाण फार असती कांटे कडे वांकणें,
जेथें वन्य पशू सदा डिरकती हिंसा जयांना प्रिया;
तेथें घेउनियां प्रिया मग मला आज्ञा करीं जावया !

कांटे झाडिन मी, पशू वधिन मी, किल्ला तिला बांधिन,
मी तीतें सुख व्हावयास अपुले हे प्राणही टाकीन;
बांधूं आम्हि परस्परांप्रत लताजालीं सुखानें गळीं;
स्वर्गाला निरयामधूनि पहिल्या काढूं अम्ही त्या स्थळीं !


कवी - केशवसुत
- शार्दूलविक्रीडित
- १८८९

काल आणि प्रियेचें सौंदर्य

( शार्दूलविक्रीडित )

धातू दाढर्यविशिष्ट, अश्म धरणी, विस्तीर्ण हा अंबुधि,
मर्त्यत्वा चुकवावयास शकती हें तों घडेना कधीं;
पुष्पाहूनिहि फार पेलव जिची शक्ती अशी चारुता,
या हो मर्त्यपणापुढें तगुनियां कैशी रहावी अतां ?

मोठे उच्च शिलासमुच्चय, चढूं कोणा न ये ज्यांवरी,---
लोहाचे प्रतिहार थोर अथवा,--- हा काल त्यांतें चुरी;
त्याअर्थीं दिवसांचिया कठिण या धक्काबुकीच्या पुढें,
ही वासन्तिक गन्धवीचि टिकणें हें कोठुनी हो घडे ?

कालाचें अति रम्य रत्न लपुनी, कालाचिया थोरल्या,---
पेटीपासुनि दूर, राहिल कसें स्थानीं बरें कोणत्या ?
त्याचा पाय चलाख बांधुनि कुणी ठेवील का हो कर ?
सौन्दर्या लुटितां तयांस अडवी आहे असा का नर ?

कोणीही न ! परंतु एक सुचते आहे मला योजना
( होवो ती सफला म्हणुनि करितों ईशास मी प्रार्थना ):---
काळया शाइमधें प्रियेस अपुल्या मी कागदीं ठेवितों;
तेथें अक्षयरूपिणी सतत ती राहो असें इच्छितों !


कवी - केशवसुत
- डिसेंबर १८८८

जायाचें जग का असेंच ?

( शार्दूलविक्रीडित )

जायाचें जग का असेंच ? सगळें ऐसेंच का चालणें ?
ऐसा न्यायच का जगामधिं अम्हांलागीं सदा लाभणें ?
सर्वांला नियमीतसे दृढ असें तें हेंच का शासन !
देवांनो, असलेंच काय तुमचें सामर्थ्य द्या सांगुन ?

जे आत्मे अपनीतिच्या निबिड त्या धुंदीमुळें आंधळे
त्यांशीं अन्ध विधी सदैव करितो सख्यत्व कीं आपुलें ;
जे कीं, आणिक हे सुनीति  ! धरिती भक्ती तुझीयावरी
जाती लोटत वादळामधिं अहा ! ते जीर्ण पर्णांपरी !

सर्वांचा अवघ्या नियामक असे का हो कुठें ईश्वर ?---
तो आहे, मग सन्मनें हळळती दुःखांमधें कां तर ?
नम्रत्वावरि हाय ! उद्धटपणा वर्चस्व कां तें करी ?
कां हो हाल तुटूनि हंत ! पडती निदोंषितेच्यावरी ?

( उपजाति )

चा धांव देवा ! तर ये त्वरेनें !
ही दुर्दशा थांबिव रे दयेनें ;
वा, साधु आणीक असाधु यांचें
समप्रकर्षी युग आण साचें ! )


कवी - केशवसुत
- डिसेंबर १८८८