तें कोण या ठायिं ?

मी चालतां वाट, या येइं दारास,
घोटाळुनी पाय लागें स्वमार्गास. ध्रु०

पुरला निधी काय माझा कुठे येथ ?
हरपे इथे रत्‍न आधार जीवास ? १

ज्या जन्मजन्मांत शोधीं कुठे येथ
चिंतामणी काय लोपे जवळपास ? २

संदिग्ध मनिं लीन पूर्वस्मृती काय
जागूनि या ठायिं पिळतात ह्रदयास ? ३

जळल्या इथे काय आशा कधीं काळिं
ज्यांच्या मुळांतून नव पालवे आस ? ४

कां संचितीं गूढ सळसळ इथे होइ ?
किंवा फुटे वाट माझ्या भविष्यास ? ५

कां पापण्या येथ भिजती न कळतांहि ?
पोटांतुनी खोल कां येइ निश्वास ? ६

कां हें असें होइ ? कां कालवे जीव ?
तें कोण या ठायिं ज्याची धरूं कास ? ७


कवी - भा. रा. तांबे
जाति - किंकिणी
राग - खंबावती
ठिकाण - लष्कर ग्वाल्हेर
दिनांक - ६ जानेवारी १९३६

संगीत कलेप्रत

अतां राहु देइं नाम
भजनिं कळाहीन राम ! ध्रु०

रागरागिणीमधून
ऐश्वर्ये नटुन सजुन
येइ ह्रदयपट उघडुन
राम परमसौख्यधाम ! १

नृत्य करिति तुझे सूर,
भरुनि भरुनि येइ ऊर,
तान-लय-निकुंजिं चूर
राम इंद्रनील शाम ! २

नलगे मज पुजापाठ,
दंभाचा थाटमाट,
गायनि तव ह्या विराट
राम मुनिमनोभिराम ! ३

ऐकतांच तुझी टीप
उजळति जणुं रत्‍नदीप
स्वर्ग येइ का समीप ?
राम दिसे पूर्णकाम ! ४

ऐकतांच तुझी तान
घेई मन हें विमान.
तमःपटावरि उडाण !
विमल तेजिं घे विराम ५

मनचक्षुच्या भवती
थय थय थय नृत्य करिति
स्वर्ललना ज्योतिष्मति
ही पुजा खरी अकाम ! ६


कवी - भा. रा. तांबे
जाति - जीवनलहरी
राग - तोडी
ठिकाण - लष्कर ग्वाल्हेर
दिनांक - १४ फेब्रुवारी १९३६

तरुणांस संदेश !

हातास ये जें, स्वनेत्रांपुढे जें, तया वर्तमाना करा साजिरें,

हेटाळुनी त्या अदृश्या भविष्यामधें बांधितां कां वृथा मंदिरें ?

जी 'आज' आली घरा माउली ती 'उद्यां'ची, स्वकर्मी झटा रंगुनी,

प्रासाद निर्मा स्वताच्या उद्यांचा इथे कर्मभूमीवरी जन्मुनी.

जो पाडि धोंडा अशक्ता, बली त्यावरी पाय रोवी, चढे तो वरी.

निःसत्त्व गाई करंटाच गाणीं स्वताच्या स्थितीचीं, बहाणे करी.

हातीं विटा त्या, चुना तोच, भव्य स्वयें ताज त्यांचा कुणी तो करी;

कोणा न साधे कुटीही; भविष्या रचाया हवें सत्त्व, कारागिरी.


कवी - भा. रा. तांबे
वृत्त - मंदारमाला
राग - भूप

कोठें मुली जासि ?

उगवे निशाकांत झाल्या दिशा शांत
न्हालें जगत्‌ काय क्षीराब्धि फेनांत ? ||ध्रु०||

या काळवेळेस निघतात वेताळ
नाचोन खिदळोन बेताल गातात ! ||१||

बाई, शरीरास उन्मादकर वास
तो आवडे यांस येतील अंगांत ! ||२||

गुंडाळुनी काम- धंदे मुली लोक
मातींत राबोन स्वगृहा परततात. ||३||

तरुवेलिच्या खालिं हे अंगणीं अंग
टाकूनिया स्वैर रमतात निभ्रांत ! ||४||

घालोनि चटयांस हे अल्पसंतुष्ट
स्वच्छंद तंबाखु पीतात खातात. ||५||

हीं पांखरें पाहिं येतात घरट्यांस
चंचूपुटीं भक्ष्य पिल्लांस नेतात. ||६||

तूं एकली मात्र कोठें मुली जासि ?
या राक्षसी वेळिं छाया विचरतात. ||७||


कवी - भा. रा. तांबे
ठिकाण - लष्कर ग्वाल्हेर
दिनांक - ११ नोव्हेंबर १९४१

पुनः पुनः यावें

धन्य झालों देवा केलें आगमन

जाहलें पावन घर माझें

भजनपूजन नामाचा गजर

लाजले निर्जर देखोनिया

दाही दिशां भरे आनंदीआनंद

आनंदाचा कंद घरीं आला

आणखी याहून स्वर्ग दुजा काय ?

जेथें तुझे पाय तोची स्वर्ग !

भाबड्या भावाची अज्ञानाची सेवा

गोड केली देवा दयावंता

आतां गमनाची वेळ ये जवळ

जीवा तळमळ लागलीसे

पुनः पुनः यावें घ्यावा समाचार

हेंच वारंवार विनवीं देवा !


कवी - भा. रा. तांबे

तुझे चरण पाहिले

भाग्य उजळलें तुझे चरण पाहिले, ध्रु०

लागुनिया तुझे चरण
घर झालें हें पावन
इडापिडा जाति पळुन
ह्रदय विकसलें. १

नामाचा तुझ्या गजर
लाजति मुनिवर निर्जर
आनंदें भरलें घर
नयन-फळ मिळे. २

घडलें करिं तव पूजन
मुखें नामसंकीर्तन
दर्शनसुख घेति नयन
अंग हर्षलें. ३

करुणेचा तूं ठेवा
केली कशितरि सेवा
गोड करुनि परि देवा
सकळ घेतलें. ४

आतां परि करिसि गमन
पुनः पुनः दे दर्शन
हेंचि विनविं शिर नमवुन
हात जोडिले. ५


कवी - भा. रा. तांबे
ठिकाण - लष्कर ग्वाल्हेर
दिनांक - ११ नोव्हेंबर १९४१

राजद्रोह कीं देशद्रोह ?

या पाप्याच्या पायांसाठी
अपराध्याच्या पायांसाठी
अपराध्याच्या कार्यासाठी
जोगि होइन !
झोळी घेइन
वरवासी वनिं रानीं राहिन !॥ध्रु०॥

तुम्ही शाहाणे थोर, यां म्हणतां राजद्रोहि;
यासाठिच मी बावळी पडलें याच्या मोहिं !
या कलिजाच्या देवासाठी
या जीवाच्या जीवासाठी - जोगिण इ. १

शिरार्थ याच्या लाविलें बक्षिस तुम्हिं हजार;
खडा पहारा करिन मी ! होइन आधीं ठार !
राज्यशासना मुकल्यासाठी
पतित, वध्य ह्या चुकल्यासाठी - जोगिण इ. २

राजद्रोहा कापतां दुखविन जननीद्रोह;
पोट जाळण्या टीचभर तुम्हा पडे व्यामोह !
या जननीच्या भक्तासाठी
मातृपदीं अनुरक्तासाठी -जोगिण इ. ३

व्यवहारीं डोळस तुम्ही, स्वप्न सुखीं व्हा अंध;
स्वप्न सुखास्तव याचिया झालें मी मतिमंद
जनांमधुनि या उठल्यासाठी
भविष्यामधे रतल्यासाठी-जोगिण इ. ४

लालुच लावुनिया मला करुं नका मतिभेद
खटाटोप तुमचा वृथा ! वज्रिंपडे कां छेद ?
या पृथ्वीच्या मोलासाठी
याच्या एकच बोलासाठी -जोगिण इ. ५

मातेच्या अश्रुंमधे शिजवुनि सेवा अन्न !
कंदमुळें बरवीं वनीं, जननी जरी प्रसन्न.
या माझ्या उपवाशासाठी-जोगिण इ. ६

जननीरक्तें रंगले तुमचे लाल महाल !
प्रीतिजळें धुतल्या बर्‍या यासह दर्‍या विशाल !
गृहविहीन या पांथासाठी
भणंग माझ्या कांतासाठी-जोगिण इ. ७

तुमच्या त्या देवालयीं वृत्तींचा बाजार,
दर्‍या, झरे, रायांतुनी राम करी संचार !
या माझ्या श्रीरामासाठी
तुम्ही टाकिल्या नामासाठी-जोगिण इ. ८

'हां जी, जी हां' करुनिया मिळवा स्वर्ग तुम्हीच !
जननि हितास्तव भांडतो देवाशीं हा नीच !
या पाप्याच्या पायांसाठी
अपराध्याच्या कार्यासाठी
जोगिण होइन झोळी घेइन - वनवासी वनिं रानीं राहिन ! ९


कवी - भा.रा.तांबे