सुखाचिया लागीं करितों । तो अवघेंचि वाव येतें ॥१॥

करितां तळमळ मन हें राहिना । अनावर जाणा वासना हे ॥२॥

अवघेचि सांकडें दिसोनियां आलें । न बोलावें तें भलें कोणा पुढें ॥३॥

चोखा म्हणे मी पडिलों गुर्‍हाडीं । सोडवी तातडी यांतूनीयां ॥४॥


  - संत चोखामेळा

 माया मोहोजाळे गुंतलोंसे बळें । यांतोनी वेगळें करीं गा देवा ॥१॥

न कळेचि स्वार्थ अथवा परमार्थ । बुडालोंसे निभ्रांत याचमाजी ॥२॥

न घडे देवार्चन संतांचें पूजन । मन समाधान कधीं नव्हे ॥३॥

नसतेचि छंद लागती अंगासी । तेणें कासावीस जीव होय ॥४॥

चोखा म्हणे याही चोरें नागविलों । माझा मीचि झालो शत्रु देवा ॥५॥


  - संत चोखामेळा

 यातीहीन मज म्हणती देवा । न कळे करूं तुमची सेवा ॥१॥

आम्हां नीचांचे तें काम । वाचें गावें सदां नाम ॥२॥

उच्छिष्टाची आस । संत दासाचा मी दास ॥३॥

चोखा म्हणे नारायण । पदरीं घेतलें मज दीना ॥४॥


  - संत चोखामेळा

धीर माझे मना । नाहीं नाहीं नारायण ॥१॥

बहुचि जाचलों संसारें । झालों दु:खाचे पाझरे ॥२॥

भोग भोगणें हें सुख । परि शेवटीं आहे दु:ख ॥३॥

भारवाही झालों । वाउग्या छंदा नागवलों ॥४॥

दया करा पंढरीराया । चोखा लागतसे पायां ॥५॥


  - संत चोखामेळा

 माझा मी विचार केला असे मना । चाळवण नारायणा पुरें तुमचें ॥१॥

तुम्हांवरी भार घातिलेंसें वोझें । हेंचि मी माझें जाणतसें ॥२॥

वाउगें बोलावें दिसे फलकट । नाहीं बळकट वर्म आंगीं ॥३॥

चोखा म्हणे सुखें बैसेन धरणा । तुमच्या थोरपणा येईल लाज ॥४॥


  - संत चोखामेळा

 आला नरदेहीं पाहीं । शुद्धी नेणें ठायींचे ठायीं ॥१॥

करी प्रपंच काबाड । भार वाही खर द्वाड ॥२॥

न ये राम नाम मुखीं । नाहीं कधीं संत ओळखी ॥३॥

करी वाद अपवाद । नाही अंत:करण शुद्ध ॥४॥

मळ नासोनि निर्मळ । चोखा म्हणे गंगाजळ ॥५॥


 - संत चोखामेळा

 आपुला विचार न कळे जयांसी । ते या संसाराशी पशू आले ॥१॥

पशूचा उपयोग बहुतांपरी आहे । हा तो वायां जाय नरदेह ॥२॥

परि भ्रांति भुली पडलीसे जीवा । आवडी केशवा नाठविती ॥३॥

चोखा म्हणे नाम जपतां फुकाचें । काय याचें वेचे धन वित्त ॥४॥

 
  - संत चोखामेळा