पत्नी : (रागाने) मी आपल्या ड्रायव्हरला नोकरीवरुन काढून टाकणार आहे. आज तिस-यांदा मी मरता-मरता वाचलेय.

पती : अं...मला वाटतं आपण त्याला आणखी एक चान्स द्यायला हवा.
वडील : तुला यंदा ९५ टक्के मिळाले पाहिजेत.
मुलगा : ९५ काय, १०५ टक्के मिळवून दाखवतो.
वडील : मस्करी करतोस काय?
मुलगा : सुरुवात कोणी केली!!
शिक्षक : शहामृगाची मान लांब का असते?

विद्यार्थी : कारण त्याचं डोकं आणि शरीर याच्यामध्ये खूप अंतर असतं. त्यामुळे त्यांना जोडण्यासाठी त्याची मान पण लांब असते.
एक खाष्ट सासू आपल्या दोन जावयांची परीक्षा घेण्यासाठी शक्कल लढवते. पहिल्या जावयाला घेऊन नदीकाठी फिरायला जाते आणि पाय घसरून नदीत पडल्याचे नाटक करत.
जावई चटकन पाण्यात सूर मारून तिला वाचवतो. दुसऱ्या दिवशी त्याच्या दारात एक नवीकोरी गाडी उभी असते. त्यावर लिहिलेलं असतं- 'तुझ्या प्रेमळ सासूबाईंकडून सप्रेम भेट!'
नंतर दुसऱ्या जावयाला घेऊन नदीकाठी जाते, पुन्हा पाय घसरून पडल्याचे नाटक करते. जावई ढिम्म हलत नाही... बिच्चारी सासू वाहून जाते. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या जावयाच्या दारात नवीकोरी गाडी उभी असते. त्यावर लिहिलेलं असतं- 'तुझ्या प्रेमळ सासरेबुवांकडून सप्रेम भेट!'
शेअर रिक्षावाला : १०० रुपये झाले साहेब.
गंपू फक्त ५० रुपये देतो.
रिक्षावाला : ही काय दादागिरी आहे? अधेर्च पैसे?
गंपू : मग? तू पण बसून आलास ना? तुझे पैसे पण मीच भरू?

चिकटपणाचा कळस

चंचुमल : बाबा...मी आज तुम्हाला अभिमान वाटेल असं काम केलंय.
कवडीमल : हो का...काय केलंस तरी काय?
चुंचूमल : मी दादरपासून वांद्यापर्यंत बसच्या मागे धावत गेलो आणि दहा रुपये वाचवले चक्क.
कवडीमल : अरे मूर्खा...पण बसच्या ऐवजी जर कूलकॅबच्या मागे धावला असतास तर शंभर रुपये नसते का वाचले.
गंपू : पापाचं प्रायश्चित्त करण्यासाठी काय करावे लागेल?
.
.
.
.
.
झंपू : पाप!
मी कवी असतो... तर तू माझी कविता असतीस
मी लेखक असतो... तर तू माझी कथा असतीस!

मी चित्रकार असतो... तर तू माझं चित्र असतीस!

... पण काय करू मी कार्टूनिस्ट आहे!!!
गंपू : अरे, डिझेलचे दर किती वाढलेत ना..
झंपू : वाढू देत. मला काय फरक पडतो? मी आधीपण शंभर रुपयांचं भरायचो आणि आता पण शंभर रुपयांचं भरतो.
मनोहररावांना बरेच दिवसांनी रजा मिळाल्याने ते फार आनंदात होते. त्यामुळे सक्काळी सक्काळी उठुन बाहेर फिरुन आले. घरी आल्यावर बायकोला उठवल व मस्त चहा केला दोघांसाठी. बाहेरच्या खोलीत आल्यावर सोफ्यावर बसुन मोठ्ठ्या आवाजात आपल्या आवडिची गाणी लावली. गाणी इतक्या जोरात लावली होती कि शेजार्यां्नाही स्पष्ट ऎकू जावी ! थोड्या वेळाने शेजारचे रामराव आले व
मनोहररावांना म्हणाले, “मनोहरराव तुम्हाला माझ्या TV चा आवाज ऎकू येतोय ?
मनोहरराव -”नाही.”
रामराव-मला पण नाही. तुमची गाणी जरा हळू वाजवाल काय ...

नसते चाळे

पहिला मुलगा : माझे बाबा एवढे उंच आहेत कि हात वर करून छताला लावतात
दुसरा मुलगा: माझे बाबा तर एवढे उंच आहेत कि हात वर करून विमानाला लावतात
तिसरा मुलगा : माझे बाबा पण खूप उंच आहेत पण ते असले चाळे करत नाहीत..

सर्वात लहान

बाई चिंटूला:तुमच्या घरात सगळ्यात लहान कोण आहे?
चिंटू: माझे बाबा ...!
बाई : का?
.
.
.
चिंटू : कारण ते अजुनही आई जवळ झोपतात ...!

होम वर्क

सर - homework का नाही केला?
मुलगा - सर लाईट गेले होते.
सर - मेणबत्ती लावायची मग..
मुलगा - काडेपेटी नव्हती.
सर - का?
मुलगा - देवघरात होती.
सर - घ्यायची मग.
मुलगा - अंघोळ नव्हती केली.
सर - का?
मुलगा - पाणी नव्हत.
सर - का?
मुलगा - मोटार चालू होत नव्हती.
सर - का?
मुलगा - आधीच सांगितलं ना लाईट गेलेली म्हणून....

सांग सांग भोलानाथ - आधुनिक


सांग सांग भोलानाथ... मार्केट चढेल काय?
स्टॉक्सच्या दरात वाढ होऊन पैसा मिळेल काय?
सांग सांग भोलानाथ...

भोलानाथ Reliance रिझल्ट सांगेल काय?
Investors ना बख्खळ divident देईल काय?
भोलानाथ... भोलानाथ...
भोलानाथ Reliance मार्केट चढेल काय?
Investors ना बख्खळ Divident देईल काय?
भोलानाथ... भोलानाथ...

सांग सांग भोलानाथ... मार्केट चढेल काय?
स्टॉक्सच्या दरात वाढ होऊन पैसा मिळेल काय?
सांग सांग भोलानाथ...

भोलानाथ उदया आहे महत्त्वाचे Chapter...
ONGC म्हणेल का रे "उत्तम होते Quarter"?
भोलानाथ... भोलानाथ...
भोलानाथ उदया आहे महत्त्वाचे Chapter...
ONGC म्हणेल का रे "उत्तम होते Quarter"?
भोलानाथ... भोलानाथ...

सांग सांग भोलानाथ... मार्केट चढेल काय?
स्टॉक्सच्या दरात वाढ होऊन पैसा मिळेल काय?
सांग सांग भोलानाथ...

भोलानाथ, भोलानाथ खरं सांग एकदा...
IT आणि BPO चा वाढेल काय रे धंदा?
भोलानाथ... भोलानाथ...
IT आणि BPO चा वाढेल काय रे धंदा?
भोलानाथ... भोलानाथ...

सांग सांग भोलानाथ... मार्केट चढेल काय?
स्टॉक्सच्या दरात वाढ होऊन पैसा मिळेल काय?
सांग सांग भोलानाथ...

सांग सांग भोलानाथ...
सांग सांग भोलानाथ...
सांग सांग भोलानाथ...
चंद्रजीत

क्रम

बाबा : पोरी, मोठी झाल्यावर तू काय करणार आहेस?
मुलगी : काही नाही. आई बनेन, शिक्षण घेईन, लग्न करीन. आणखी काय करणार?
बाबा : योजना चांगल्या आहेत तुझ्या बेटा. फक्त जे काही करशील ते योग्य क्रमाने कर, म्हणजे झालं!!!

रेबिज

डॉक्टर : सांगायला वाईट वाटते कि तुम्हाला पिसाळलेला कुत्रा चावल्यामुळे रेबिज हा रोग झाला आहे. तुम्ही यातुन बरे व्हायची शक्यता फार कमी आहे.

पेशंट : डॉक्टर मला एक कागद व पेन देता का ?

डॉक्टर : कागद व पेन कशासाठी ?

पेशंट : यादी तयार करतो. कुणा कुणाला चावायच आहे अशा लोकांची.

हाय जॅक

विमानात एकजण अचानक उठून उभा राहिला आणि ओरडला, ''हाय जॅक!''

... तत्क्षणी हवाई संुदरीच्या हातातला ट्रे खाली पडला आणि ती थरथरू लागली, पर्सरसह निम्म्याहून अधिक प्रवाशांनी हात वर केले आणि उरलेले भयव्याकुळ होऊन रडू लागले...

... तेवढ्यात समोरून एक प्रवासी उठून उभा राहिला आणि पहिल्या प्रवाशाला पाहून ओरडला, ''हाय टॉम!!!!!''

मरून पडलेला पांडुरंग

वक्तशीर मुलगा
पाठीवर दप्तर घेऊन
शाळेत वेळेवर पोहोचतो
तसा येऊन पोहोचला पाऊस,
एखादं आदिम तत्त्वज्ञान रूजवावं
तसं शेतकऱ्यानं बी पेरून दिलं
जमिनीच्या पोटात

मग भुरभुर वारा सुटला...
छोट्या स्टेशनवर न थांबता
एक्सप्रेस गाडी
धाड धाड निघून गेल्याप्रमाणे
काळे ढग नुस्तेच तरंगत गेले,
वाटचुकल्या भ्रमिष्ट माणसासारखा
अचानक पाऊस बेपत्ता झाला

बियाच्या पोपटी अंकुरानं
जमिनीला धडका मारून
वर येण्यासाठी रचलेले मनसुभे
दिवसागणिक वाळून गेले,
जन्मताच दगावलेल्या पोराचा बाप
दवाखान्यातल्या व्हरांड्यात
विमनस्क फेऱ्या मारतो
तसा शेतकरी धुऱ्यावर उभा

लांबवर टाळ मृदंगाच्या गजरात
पंढरपुराकडे निघालेली दिंडी
आणि इथं काळ्या शेतात
मरून पडलेला हिरवा पांडुरंग!

कवी - दासू वैद्य
कवितासंग्रह - तूर्तास

किती देऊ किती घेऊ

किती देऊ किती घेऊ
गेले आभाळ संपून
चंद्र ओंजळीत आला
डोळे हळुच मिटून

धुके कातर बोटांचे
फिरे पापण्यांवरून
झुले काजव्यांची रात्र
ओथंबल्या केसातून

श्वास तेव्हा शब्द होते
अर्थ मिटलेले डोळे
होय मातीचे आभाळ
रक्त जुई जुई झाले

वीज नग्न क्षणांत त्या
बुडे दिशांचेही माप
सर्वस्वाची गाढ कळ
बुडे पुण्य बुडे पाप

किती देऊ किती घेऊ
गेले आभाळ संपून
रात्र ओसरली तरी
चंद्र उरला अजून

कवी - मंगेश पाडगावकर
संग्रह - ओंजळीत स्वर तुझेच

पृथ्वीचे प्रेमगीत

युगामागुनी चालली रे युगे ही, करावी किती भास्करा वंचना
किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी, कितीदा करू प्रीतीची याचना

नव्हाळीतले ना उमाळे उसासे, न ती आग अंगात आता उरे
विझुनी अता यौवनाच्या मशाली, उरी राहिले काजळी कोपरे

परी अंतरी प्रीतीची ज्योत जागे, अविश्रांत राहील अन् जागती
न जाणे न नेणे कुठे चालले मी, कळे तू पुढे आणि मी मागुती

दिमाखात तारे नटोनी थटोनी शिरी टाकती दिव्य उल्काफुले
परंतु तुझ्या मूर्तिवाचून देवा, मला वाटले विश्व अंधारले

तुवा सांडलेले कुठे अंतराळात वेचुनिया दिव्य तेज:कण
मला मोहवाया बघे हा सुधांशु, तपाचार स्वीकारुनि दारूण

पिसारा प्रभेचा उभारून दारी पहाटे उभा शुक्र हा प्रेमळ
करी याचना प्रीतीची लाजुनि लाल होऊनिया लाजरा मंगळ

निराशेत संन्यस्त होऊनी बैसे ऋषींच्या कुळी उत्तरेला ध्रुव
पिसाटापरी केस पिंजारुनि हा, करी धूमकेतू कधी आर्जव

परी भव्य ते तेज पाहुन पूजुन घेऊ गळ्याशी कसे काजवे
नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा तुझी दूरता त्याहुनि साहवे

तळी जागणारा निखारा उफाळून येतो कधी आठवाने वर
शहारून येते कधी अंग तुझ्या स्मृतीने उले अन् सले अंतर

गमे की तुझ्या रूद्र रूपात जावे, मिळोनी गळा घालोनिया गळा
तुझ्या लाल ओठांतली आग प्यावी, मिठीने तुझ्या तीव्र व्हाव्या कळा

अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन् मला ज्ञात मी एक धूलिकण
अलंकारण्या परी पाय तुझे धुळीचेच आहे मला भूषण


कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - विशाखा

कोलंबसाचे गर्वगीत

हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे, प्रतिध्वनीने त्या समुद्रा, डळमळु दे तारे
विराट वादळ हेलकावु दे पर्वत पाण्याचे ढळु दे दिशाकोन सारे

ताम्रसुरा प्राशुन मातु दे दैत्य नभामधले, दडु द्या पाताळी सविता
आणि तयांची अधिराणी ही दुभंग धरणीला, कराया पाजळु दे पलिता

की स्वर्गातून कोसळलेला, सूड समाधान मिळाया प्रमत्त सैतान
जमवुनि मेळा वेताळांचा या दरियावरती करी हे तांडव थैमान

पदच्युता, तव भीषण नर्तन असेच चालु दे फुटु दे नभ माथ्यावरती
आणि तुटु दे अखंड उल्का वर्षावत अग्नी नाविका ना कुठली भीती

सहकाऱ्यांनो, का ही खंत जन्म खलाशांचा झुंजण्या अखंड संग्राम
नक्षत्रांपरी असीम नीलामध्ये संचरावे, दिशांचे आम्हांला धाम

काय सागरी तारु लोटले परताया मागे, असे का हा आपुला बाणा
त्याहुन घेऊ जळी समाधी सुखे कशासाठी, जपावे पराभूत प्राणा?

कोट्यवधी जगतात जीवाणू, जगती अन् मरती जशी ती गवताची पाती
नाविक आम्ही परंतु फिरतो सात नभांखाली निर्मितो नव क्षितिजे पुढती

मार्ग आमुचा रोधू न शकती ना धन ना दारा घराची वा वीतभर कारा
मानवतेचे निशाण मिरवू महासागरात, जिंकुनी खंड खंड सारा

चला उभारा शुभ्र शिडे ती गर्वाने वरती, कथा या खुळ्या सागराला
"अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला!"


कवी - कुसुमाग्रज
कवितासंग्रह - विशाखा

पसायदान

आता विश्वात्मके देवे| येणे वाग्यज्ञे तोषावें|
तोषोनी मज द्यावे| पसायदान हे।|

जे खळांची व्यंकटी सांडो| तयां सत्कर्मी रती वाढो|
भूतां परस्परे जडों| मैत्र जीवांचे।|

दुरितांचे तिमीर जाओ| विश्वस्वधर्मसूर्ये पाहो|
जो जे वांछिल तो ते लाहो| प्राणिजात।|

वर्षत सकळ्मंगळी| ईश्वरनिष्ठांची मांदियाळी|
अनवरत भूमंडळी| भेटतु भूतां।|

चला कल्पतरूंचे आरव| चेतना चिंतामणीचे गाव|
बोलते जे अर्णव| पीयुषाचे।|

चंद्रमे जे अलांछन| मार्तंड जे तापहीन|
ते सर्वांही सदा सज्जन| सोयरे होतु।|

किंबहुना सर्व सुखी| पूर्ण होवोनी तिन्ही लोकी|
भजि जो आदिपुरुषी| अखंडित।|

आणि ग्रंथोपजीविये| विशेषीं लोकी इये|
दृष्टादृष्टविजयें| होआवें जी।|

येथ म्हणे श्री ज्ञानेश्वराओ| आ होईल दान पसाओ|
येणे वरें ज्ञानदेओ| सुखिया जाला।|

कणा

ओळखलंत का सर मला, पावसात आला कोणी
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी

क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून
गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून

माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतींत नाचली
मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली

भिंत खचली, चूल विझली होते नव्हते गेले
प्रसाद म्हणुन पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले

कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे
चिखलगाळ काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे

खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
पैसे नकोत सर जरा एकटेपणा वाटला

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा!

प्रेम नावाचा "टाईमपास"

त्याची अन तिची पहिली भॆट दोघांची होणाऱी "नजऱभेट" काळजाला जाऊन भिडणारी थेट दोघांचं एकमेकांना पाहून हसणं अन नाजुकशा जाळ्यात अलगद फसणं... या हसण्या या फसण्याची सवय झालीय सगळयांना... नजऱभेटीचं रूपांतर चोरून भॆटीत भेटीचं रूपांतर हळुवार मिठीत अन त्याहीपुढे कित्येक पटीत नात्यातल्या या वेगाची सवय झालीय सगळयांना... मग रंगू लागतात स्वप्नं एक त्याचं,एक तिचं फक्त दोन मनं त्याचं हसणं तेव्हा तिचं हसणं तिचं रडणं तेव्हा त्याचं रडणं या हसण्या या रडण्याची सवय झालीय सगळयांना... दिल्या जातात वेळा,पाळल्याही जातात वेळा घेतल्या जातात शपथा दिल्या जातात उपमा त्याला ती वाटते "रांझ्याची हीर" तिलाही तो वाटतो "कपूरांचा रणबीर" या शपथा या उपमांची सवय झालीय सगळयांना... मग येतो असाही एक दिवस पूनवेची रात्र वाटू लागते अवस दोघांनाही येऊ लागतो एकमेकांचा कंटाळा हीर वाटू लागते "बधीर" अन रणबीर वाटू लागतो चक्क "काळा" या अवसेची या पूनवेची सवय झालीय सगळयांना... पहिल्या भेटीच्या चौकातच फूटतात "नव्या वाटा" दोघंही करतात एकमेकांना "टाटा" अहो तु्म्ही कशाला होताय डिस्टर्ब दुःख वैगरे विसरा त्याला भॆटते दूसरी तिलाही भॆटतो दूसरा पुन्हा होते देवाणघेवाण,पुन्हा होते "दिलफेक" पुन्हा जुन्या कहानीचा नव्याने "रिटेक" बदलत्या प्रेमाच्या रंगाची सवय झालीय सगळयांना... खरं सांगायचं अगदी मनापासून तर प्रेम नावाचा "टाईमपास" करण्याची सवय झालीय सगळयांना.....
परवा पुराण-प्रसिद्ध पखवाज पंडित पुरोहित पंतांची पिवळी पगडी पुरंदरच्या पंधराशेव्या
पायरीवरून पुण्यात पर्वतीच्या पाचव्या पायरीपाशी पर्णकुटीपासून पंधरा पावलांवर पहुडलेल्या
पंकजच्या पोटावर पटकन पडली. पगडी पडलेली पाहताच पंत पुरंदरच्या पायथ्याशी पोलिसठाण्यात
पळाले. पुरंदरच्या पोलिसांनी पंतांना पुण्याच्या पोलिसांकडे पाठवले.

पंत पुण्यात पोहोचताच पोलिसांवर पेटले. पंत पेटल्यामुळे पोलिस पटकन पर्वतीकडे पळाले. पांढर्‍या
पोषाखातल्या पोलिसांना पाहून पंकज पर्वतीच्या पलिकडे पळाला. पोलिसांनी पंकजचा पिच्छा
पुरवला.

पळता पळता पंकज पाण्याच्या पाँडमध्ये पडला. पंतांनीच पाण्यात पोहून पंकजला पकडले. पिवळी
पगडी पण पकडली. पोलिसांनी पंकजला पोलिसठाण्याकडे पिटाळले. पकडणारा पोलिस पदपथावर
पाय पसरून पडला. पोलिस पडलेला पाहून पंकज पाठीवर पांघरूण पांघरून पळाला.

पंतांनी पुरंदरला पोहोचताच पगडीत पंकजचे पैशांचे पाकिट पाहिले. पाकिटातले पुष्कळ पैसे पंतांनी
पनवेलला पुत्राला पोस्टाने पाठवले. पंतांच्या पाजी पुत्राने पैशांच्या प्राप्तीतून पोटात पंजाबी
पदार्थ पचवले.

पंतांना परमेश्वरच पावला!
पंकजला पकडण्यासाठी पंतांसोबत पुण्यात पोहोचलेली पंतांची पोरगी प्राची पंकजला पहिल्यांदा
पाहताच पंकजच्या प्रेमात पडली. प्राचीने पंकज, पोलिसांची पकडा पकडी पाहिली. पंकजचा
पदपथावरून पोबाराही पाहिला. पानशेतच्या पुराच्या पाण्यामुळे पुनर्वसित पंकज परत पर्णकुटीत
पोहोचला.

पित्यासमवेत प्राची पुरंदरला परतली, पण पंतांनी पंकजच्या पाकिटातल्या पैशांबाबत पंक्ति-प्रपंच
पाळला. पुष्कळ पैसे पुत्राला पाठवले. पंतांच्या पुन्हा पुन्हा पिडणार्‍या पुराणांच्या पोपटपंचीमुळे
प्राची पेटली.

पंकजच्या प्रेमाखातर प्राची पुण्यास परतली. प्राचीनेच पंकजवरच्या पोलिसांच्या पंचनाम्याला
पाने पुसली. पंकजला पहायला प्राची परत पर्णकुटीपाशी पोहोचली. पण पर्णकुटीत पहुडलेल्या
पंकजचे पाय पळून पळून पांढरे पडलेले! प्राचीने पंकजच्या पायावर पिवळे पुरळही पाहिले.

पंकजची परिस्थिती पाहून प्राण पिळवटलेल्या प्राचीने पदर पाण्यात पिळून पंकजचे पाय पुसले.
प्राचीचा प्रथमोपचार पाहून पंकजला पोरगी पसंत पडली. पंकजने प्राचीला पर्णकुटीतच पटवले.

पर्णकुटीतील प्रेम-प्रकरण पाहून पर्णकुटीच्या पायर्‍यांवर पत्ते पिसणारी पोरे पूर्व-पश्चिमेला
पांगली. प्राचीने पंकजचे पाकिट पैशांविनाच परतवले. परंतू प्रेमात पारंगत पंकजने प्राचीस पाच
पाप्या परतवल्या.

पंतांना परमेश्वर पावला, पण पंकजला पंतांची पायाळू पोर पावली.
केव्हातरी कोल्हापूरच्या कर्तव्यतत्पर केळकर काकांबद्दल काकांच्याच कचेरीतल्या केशवने काकूंसमोर
कागाळी केली. काकू कावल्या. काकूंनी कपाटातून कात्री काढून काकांच्या कामाचे कोरे करकरीत
कागद कचाकचा कापले. काकांचे कापलेले कागद केशवानेच कचऱ्यात कोंबून काकांच्याच किचनमध्ये '
कजरारे-कजरारे' कवितेवर कोळीनृत्य केले.
काकूंनी कागद कापल्याचे कळताच काका कळवळले. काकांनीही कमालच केली. काकांनी काकूंचे काळे
कुळकुळीत केस कात्रीने कराकरा कापले. काका काय करताहेत काकूंना कळेनाच! काकूंनी कर्कश्श
किंचाळून कलकलाट केला.
काका काकूंची कसली काळजी करणार! काकांना कामाची काळजी. काकूंच्या कर्णकर्कश्श
कोलाहलातही, केशवाने कचऱ्यात कोंबलेले कागदाचे कपटेन कपटे काढून काकांनी कचेरीकडे कूच केले.
कचेरीच्या कामासाठी काकांनी कंबर कसली. कागदाच्या कापलेल्या कपट्यांचे काकांनी 'कोलाज'
करून कामकाज कार्यान्वयित केले. केशवाचे कारनामे कळताच काकांनी काट्यानेच काटा काढला.
काकांनी केशवालाच कोलाजचे काम करण्यासाठी कुथवला. कपटी केशवने काकांवरच कामचुकारपणाचा
कांगावा करून कामाचा कंटाळा केला. काकांनी कठोरपणे केशवाला कामावरून काढले.
कासावीस काकूंनी कालच्या कडू कारल्याची कोशिंबीर कटाप करून काकांसाठी कच्च्या कैरीचे कोय
काढून कालवण केले. काकांनीही करुणेने काकूंचे कृत्रिम केस कुरवाळले.
केळकरांच्या कोकणस्थ कुटुंबात कर्तव्यापुढे कर्मकांड केव्हाही कनिष्ठच. कर्तव्यदक्ष काकांच्या
कार्यकाळात कचेरीने कर्मरूपी किल्ल्याचे कीर्तिशिखर काबीज केले.
कामावरून काढलेल्या केशवाने कितीतरी काबाडकष्ट काढल्यावर कोल्हापूरच्या कॉम्रेड कणेकर
कॉलेजने केशवाला कबड्डीचा कर्णधार केला. क्रिडापटू केशवाने कबड्डीतच करियर केले. कालच्या
कागाळीखोर केशवाला काळानेच केला 'कबड्डीतल्या किचकट कसरतींचा कर्ता'!

कथासार:-
क्रियेविण करिता कथन, किंवा कोरडेची कीर्तन,
कितीक किताब कष्टाविण, काय कामाचे

साले हे मित्र असतात बाकी मस्त

"काय आयटम चाललीय बघ....जर कोणी म्हटले?" "तर लगेच म्हणणार : वहीनी आहे तुझी साल्या, दुसरीकडे बघ!" हजार पोरी बघून पण यांचे मन काही भरत नसतं. पण काहीही म्हणा, साले हे मित्र असतात बाकी मस्त! "नडला कि फोडला" असे ह्यांचे ब्रीदवाक्य असतं! पण काहीही म्हणा, साले हे मित्र असतात बाकी मस्त! पास झाल्यावर पार्टीचे निमंत्रण त्यांना द्यायचं नसतं! निर्लज्ज असतात ते, त्यांनी ते आधीच ग्राह्य धरलं असतं! पण काहीही म्हणा, साले हे मित्र असतात बाकी मस्त! शाळेचा result असो या प्रेमाचा, ह्यांचाच धिंगाणा जास्त! तुमचे प्रेमप्रकरण अख्या कॉलेजमध्ये ह्यांच्यामुळेच गाजतं! पण काहीही म्हणा, साले हे मित्र असतात बाकी मस्त! प्रत्तेक दु:खात त्याचं तुम्हाला पाठबळ असतं! उन्हात उभे तुम्ही,तरी ह्यांच्याच पायाला भाजतं! पण काहीही म्हणा, साले हे मित्र असतात बाकी मस्त! शेवटच्या बेन्चवरच्या कमेंटला दाद देणे हे त्यांच्या हक्काचं काम असतं! Break-up नंतर "अशाच असतात रे पोरी......"हे ठरलेले वाक्य असतं, पण काहीही म्हणा, साले हे मित्र असतात बाकी मस्त! प्रेमाचे नाही वाजले तरी मैत्रीच नाणं नक्की वाजतं, तोंडावर नाही केली स्तुती त्यांनी तरी, दुसर्यासमोर त्यांच्या तोंडून तुमचच नाव गाजतं! पण काहीही म्हणा, साले हे मित्र असतात बाकी मस्त!
राम आणि रावणाचं घमासान युद्ध सुरू असतं.
राम रावणावर ब्रह्मास्त्र सोडणार एवढ्यात रावणाला रामाच्या शेजारी एक व्यक्ती दिसते.
ते पाहून रावण आपली सश्त्र खाली ठेवतो
आणि तिथून निघून जायला लागतो.
राम: काय झालं?
रावण: काही नाही... मी निघतो.
राम: ए पण काय झालं सांग ना. ...
रावण: काही नाही यार बास झालं.
राम: अरे असं काय करतोस? काय झालं ते तर सांग. . . .
रावण: काय राव तू पण... एवढ्या लहान सहान गोष्टींसाठी रजनीकांतला बरोबर आणायची काय आवश्यकता होती?.
एक लिंबु झेलू बाई, दोन लिंबं झेलूं ।
दोन लिंब झेलूं बाई, तीन लिंबं झेलूं ।
तीन लिंबं झेलूं बाई, चार लिंबं झेलू ।
चार लिंब झेलू बाई, पाच लिंबं झेलूं ।
पाचा लिंबांचा पानवडा , माळ घाली हनुमंताला ।
हनुमंताची निळी घोडी. येतां जातां कमळं तोडी ।
कमळ्याच्या पाठीमागं होती राणी ॥
अगं अगं राणी इथं कुठं पाणी ?
पाणी नव्हे यमुना जमुना,
यमुना जमुनेची बारिक वाळू, तिथं खेळे चिलारि बाळू ।
चिलारि बाळाला भूक लागली ।
सोन्याच्या शिंपेनं दूध पाजीलं पाटावरच्या घडीवर निजवलं ।
नीज रे चिलारि बाळा , मी तर जाते सोनारवाड्‍या ।
सोनारदादा सोनारभाई । गौरीचे मोती झले कां नाहीं ?
गौरीच्या घरीं तांब्याच्या चुली , मांडव घातला मखमख पुरी ।
लगीन लागलं सूर्योंदयीं , भोजन झालं आवळीखालीं ।
उष्ट्या पत्रावळी चिंचेखालीं , शेणगोळा आंब्याखालीं ।
पानसुपारी तुळशीवरी , वरात निघाली हत्तीवरी ।

खिरापत(हादगा)

खिरापत(हादगा)

कोल्हापूर अंबा माय गं
खिरापतीला काय गं ?

वंदिन तुझे पाय गं
खिरापतीला काय गं ?

लेक आली हाय गं
खिरापतीला काय गं ?

गुणाची माझी बाय गं
खिरापतीला काय गं ?

साखर जश्शी साय गं
खिरापतीला काय गं ?

लाडू चिवडा खाय गं
खिरापतीला काय गं ?

दारी बांधली गाय गं
खिरापतीला काय गं ?

प्रेमळ जश्शी माय गं
खिरापतीला काय गं ?

दुधाला वाण नाय गं
खिरापतीला काय गं ?

लोणी तूप खाय गं
खिरापतीला काय गं ?

तिखट्ट हाय हाय नाय गं
खिरापतीला काय गं ?

ओळखणार तुम्ही हाय गं
खिरापतीला काय गं ?

सांगणार मी नाय गं
खिरापतीला काय गं ?

हारलात म्हणू काय गं ?
खिरापतीला काय गं ?

सरदार=> प्रश्न-उत्तरे

प्रश्न - सरदारजीला जर एखाद्या मासळीला मारायचे असेल तर तो तीला कसे मारेल?
उत्तर - पाण्यात डूबवून डूबवून...


प्रश्न - सरदारजीला जर तासन तास व्यस्त ठेवायचे असेल तर तुम्ही काय कराल?
उत्तर - एका कागदावर दोन्हीकडून ' प्लीज टर्न ओव्हर' असं लिहून त्याला वाचायला द्या...

स्वर्गात क्रिकेट आहे का?

दोन म्हातारे बऱ्याच वर्षापासून अगदी जिवलग मित्र होते. दोघांचही वय आता जवळपास 90च्या दरम्यान असेल जेव्हा त्यातील एक जण खुप आजारी पडला. त्याचा दुसरा मित्र त्याला रोज भेटायला येत असे आणि ते रोज आपल्या मैत्रीच्या गप्पा करीत असत. त्यांना आता जवळपास कल्पना आली होती की जो बिमार पडला आहे तो थोड्याच दिवसांचा साथीदार आहे. एक दिवस त्याच्या मित्राने मृत्यूशय्येवर पडलेल्या मित्राला म्हटले, '' बघ जेव्हा तू मरशील माझ्यासाठी एक काम करशील का?''

"कोणतं?" मृत्यूशय्येवर पडलेल्या मित्राने विचारले.

"तू मेल्यानंतर मला स्वर्गात क्रिकेट आहे का ते सांगशिल का?" दुसऱ्याने विचारले.

दोघंही क्रिकेट वेडे होते.

"का नाही जरुर सांगेन की" मृत्यूशय्येवर पडलेला मित्र म्हणाला.

आणि एकदोन दिवसातच तो बिमार पडलेला मित्र मरण पावला.

काही दिवसानंतर जो जिवंत म्हातारा मित्र होता त्याला झोपेत त्याच्या मेलेल्या मित्राचा आवाज एकू आला-

"तुझ्यासाठी माझ्याकडे दोन बातम्या आहेत... एक वाईट आणि एक चांगली... चांगली बातमी ही आहे की स्वर्गात क्रिकेट आहे ..."

"आणि वाईट बातमी?"

"आणि वाईट बातमी ही आहे की तुला येत्या बुधवारच्या मॅचमधे बॉलींग करायची आहे"

करोडपती....

निलेश- अरे मला जी मुलगी आवडत होती तिने माझ्याशी लग्न नाही केल रे ...
गौरव - अस का झालं ? पण तू सांगायचं ना कि तुझे काका करोडपती आहेत ते ...
निलेश - सांगितलं ना ... चालू निघाली रे ती, तिने काकाशीच लग्न केलं..

श्रीमंत योगी

निश्र्चयाचा महामेरू, बहुतजनांसी आधारू, अखंडस्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी ।। 
नरपती, हयपती, गजपती। गडपती, भूपती, जळपती। पुरंदर आणि शक्ति पृष्ठभागी।। 
यशवंत, कीर्तीवंत, सामर्थ्यवंत। वरदवंत, पुण्यवंत, नीतीवंत। जाणता राजा ।। 
आचरशील, विचारशील, दानशील। धर्मशील सर्वज्ञपणे सुशील। सकळाठाई ।। 
धीर उदार गंभीर। शूर क्रियेसी तत्पर । सावधपणे नृपवर तुच्छ केले।। 
देवधर्म गोब्राह्मण, करावया संरक्षण।। 
हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केली या भूमंडळाचे ठाई, धर्मरक्षी ऐसा नाही। महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा कारणी।। 
कित्येक दृष्ट संहारली। कित्येकासी धाक सुटला । कित्येकाला आश्रयो जाहला । शिवकल्याण राजा। शिवकल्याण राजा।।शिवकल्याण राजा।।।

नदीच्या पलिकडे

संताला नदीच्या पलीकडे जायचं होतं पण कसं जावं त्याला काही कळत नव्हतं. तेवढ्यात त्याला नदीच्या पलिकडे बंता दिसला. संताने बंताला जोरात ओरडून विचारले, '' ए बंता... मी नदीच्या पलिकडे कसा येवू?''

बंताने नदीच्या आजुबाजुला चौफेर आपली नजर फिरवली आणि म्हणाला, ''अबे तु तर पलिकडेच आहेस ''

बदमाश वकील

प्रश्न - एका बदमाश वकिलात आणि घाणीने भरलेल्या बादलीत काय फरक आहे?

उत्तर - बादलीचा

पगारी नोकर

पगारी नोकराच्या महिनाभरातील वेगवेगळ्या अवस्था

तारीख 1 ते तारीख 10 - गरम

तारीख 11 ते तारीख 20 - नरम

तारीख 21 ते तारीख 30 - बेशरम

पगारी नोकराच्या बायकोच्या महिनाभरातील वेगवेगळ्या अवस्था

तारीख 1 ते तारीख 10 - चंद्रमुखी

तारीख 11 ते तारीख 20 - सुर्यमुखी

तारीख 21 ते तारीख 30 - ज्वालामुखी

कस्टमची चोरी

एका सुंदर युवतीने प्लेनमध्ये प्रवास करतांना तिच्या शेजारी बसलेल्या स्वामीजीला विचारले,

'' स्वामीजी तुम्ही मला एक मदत कराल का ?''

'' जरुर... तुम्ही सांगा तर मी आपली काय मदत करु शकतो ?''

'' मी एक किमती इलेक्ट्रॉनीक हेअर ड्रायर विकत घेतलेला आहे... पण तो कस्टम लिमीटच्या वर जातो आहे... आणि मला काळजी वाटते की कस्टमवाले त्याला नक्कीच जब्त करणार ... तुम्ही त्या हेअर ड्रायरला आपल्या चोंग्यात लपवून नेवू शकता का?'' युवतीने विचारले.

'' मला तुम्हाला मदत करण्यात नक्कीच आनंद होईल... पण मी आधीच सांगुन ठेवतो की मी खोटं बोलणार नाही '' स्वामीजीने म्हटले.

'' स्वामीजी तुमच्या भोळ्या चेहऱ्यामुळे तुमच्यावर कुणीच शंका घेवू शकणार नाही... त्यामुळे खोटं बोलण्याचा प्रश्नच कुठे उदभवतो. '' युवतीने म्हटले.

''ठिक आहे... जसी तुमची इच्छा. '' स्वामीजी तयार झाले.

जेव्हा प्लेन लॅंड झालं आणि सगळेजण कस्टममधून जावू लागले तेव्हा त्या युवतीने स्वामीजीला आपल्या आधी समोर जावू दिलं.

कस्टम ऑफीसरने प्रत्येक प्रवाशाला विचारतात तसं स्वामीजीला विचारलं,

'' स्वामीजी तुम्ही गैरकानुनी काही लपवून तर नेत नाही ना ?''

'' माझ्या डोक्यापासून कमरेपर्यंत मी गैरकानुनी काहीही लपविलेलं नाही आहे. '' स्वामीजीने म्हटले.

ऑफीसरला हे स्वामीजीचे उत्तर जरा विचित्रच वाटलं. म्हणून त्याने विचारले, '' आणि कमरेच्या खाली जमिनीपर्यंत आपण गैरकानुनी काही लपविलेलं तर नाही?''

'' हो एक छोटीसी सुंदर गोष्ट लपविलेली आहे... जिचा वापर स्त्रीया करतात... पण माझ्याजवळ जे आहे त्याचा वापर अजुनपर्यंत झालेला नाही आहे... '' स्वामीजींनी म्हटले.

ऑफीसर जोरात खळखळून हसायला लागला आणि म्हणाला, '' ठिक आहे स्वामीजी तुम्ही जावू शकता ... नेक्ट!''
जाहिरातीमुळे काही समस्या फार लवकर सोडविल्या जावू शकतात... 

एका सरदारजीने कुठेतरी वाचले आणि पेपरमध्ये नाईट वॉचमनसाठी जाहिरात दिली .
 .
 .
 .
 .
 .
 .
 .
 .
 त्याच रात्री त्याच्या घरी चोरी झाली.

हिप्नोटीझम

एका मोठ्या हॉलमध्ये हिप्नोटीझमचा प्रयोग चालला होता. प्रयोग बघण्यास आणि अनुभवण्यास लोकांनी हॉलमध्ये एकच गर्दी केली होती. हिप्नोटीस्टने स्टेजवर उभं राहून आता हिप्नोटीजमच्या प्रयोगास सुरवात केली. त्याने खिशातून एक चेन असलेलं घड्याळ काढलं आणि ते घड्याळ पेंडूलमप्रमाणे हलवित लोकांना म्हटलं, '' आता तुम्ही या घड्याळीकडे पहा''

जसं घड्याळ उजवीकडे - डावीकडे हलू लागलं त्या घड्याळीकडे पाहतांना लोकांची बुबुळं सुध्दा तशी उजवीकडे - डावीकडे हलू लागली. आणि थोड्याच वेळात लोकांना तंद्री लागुन लोक हिप्नोटाईझ झाले. आता हिप्नोटीस्ट जसा आदेश देत असे तसे लोक वागू लागले. त्याने 'नाचा' म्हटलं की लोक नाचू लागत. 'तुमच्या हातात सफरचंद आहे आणि ते तूम्ही खात आहे' म्हटलं की लोक त्यांच्या हातातलं काल्पनीक सफरचंद खाऊ लागत.

हे सगळे आदेश देता देता गडबडीत त्या हिप्नोटीस्ट च्या हातातून ते घड्याळ खाली पडून फुटलं आणि त्याच्या तोंडून निघालं, '' शिट''

तो हॉल पुर्णपणे साफ करण्यासाठी पुढचे पाच दिवस लागले.

बाप

दोन मनांतील अंतर

एकदा एका साधुने त्याच्या शिष्यांना विचारले, ” आपण रागात असताना जोरात ओरडतो किंवा कोणाशी भांडण झाले असल्यास आपोआप आपला आवाज वाढतो, असेका?”. सर्व शिष्य विचार करु लागले. एक शिष्याने उत्तर दीले, “रागावलेले असताना आपण स्वतःवरचे नियंत्रण हरवुन बसतो, आणि म्हणुनच कदाचीत ओरडून बोलतो.”
यावर साधुमहाराज म्हणाले, ” पण ज्या व्यक्तीवर आपण रागावलेले असतो ती समोरच असते तरी सुध्दा आपण ओरडतो।जरी सौम्य आणि मृदु आवाजात बोलणे शक्य असले तरी देखील रागात आपण चढ्या आवाजातच बोलतो”. यावर सर्व शिष्यांनी विचार केला आणि आपापल्या परीने उत्तर देण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणत्याच उत्तराने साधुचे समाधान झाले नाही. शेवटी साधुमहाराजांनी स्वतःच उत्तर दीले. ते म्हणाले, ” जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांवर रागावलेल्या असतात तेव्हा त्यांच्या मनांमध्ये अंतर वाढलेले असते आणि हेच अंतर भरुन काढण्याकरीता ते चढया आवाजात बोलतात.”

“आता मला सांगा की जेव्हा दोन व्यक्ती परस्परांच्या प्रेमात असतात तेव्हा अतीशय हळू आणि शांतपणे बोलतात, असे का?” असा प्रश्न विचारुन मग स्वतःच उत्तर देत ते म्हणाले,” कारण त्यांची मनं जवळ आलेली असतात. दोन मनांतील अंतर कमी झालेले असते.
आणि जसजसे दोन व्यक्ती मधील प्रेम वाढु लागते तसतसे त्यांच्यातील संवाद इतका सुलभ होउन जातो की सर्वच गोष्टी बोलण्याची देखील आवश्यकताच भासत नाही. फक्त नजरेतुनच किंवा देहबोलीतुनच ते आपल्या साथीदाराला काय म्हणायचे आहे ते ओळखतात.शिकवण- परस्परांत वाद विवाद आणि भांडण तंटे होतच राहतात मात्र कीतीही वादविवाद असला तरी मनामनातील अंतर वाढु देउ नका।तसे होउ दील्यास दोन व्यक्तींमधील दरी इतकी मोठी होइल की पुन्हा ती मिटवणे कधीच शक्य होणार नाही…..

माननीय चोर

अवचित अश्या कातरवेळी कल्लोळ कानी आला
वलुनी पाहता मागे चोर लोकांच्या हाती लागला
"पाकिट चोरले पाकिट चोरले " एक माणुस ओरडत होता
जमावातिल प्रत्येकजन त्या चोराला बडवत होता
यछेद बडवून पोलिसांच्या ताब्यात देवून जो तो आपापल्या घरी परतला
मी ही मग घरी जावुन सारा प्रसंग वर्णिला
दिवस उलटले सारे प्रसंग धूसर झाले
सिग्नल वर आज मला पुन्हा "तोच" हो हो तोच "तो" दिसला
नकळत माझा हात पर्स सवारन्यास सरसावला
नजर मात्र वेगालेच दृश्य दाखवित होती
शुन्यात नजर लावून त्याची निरर्थक बडबड चालू होती
" बाळ गेला माझा बाळ गेला " पैशाअभावी औषधाला मुकला
प्रत्येक शब्द ह्रदय चिरत होता त्या बिचारयाच्या बडबडीला खुप कठोर अर्थ होता
काही क्षणासाठी त्याच्यात शिरलेला चोर सर्वाना दिसला
पण त्याच्यातील गरजवंत असा हतबल बाप मात्र कोणीच नाही पाहिला
खरच नियति नशीब यालाच का म्हणतात ?
एक पाकिट मारणारा चोर संबोधिला जातो
आणि लाखोंचे घोटाले करणारा मात्र माननीय संबोधिला जातो

अंधारात कसा चढणार डोंगर?

तरुण शेतकरी डोंगरावरच्या देवाच्या दर्शनासाठी निघाला होता. डोंगर त्याच्या खेडय़ापासून तसा फार लांब नव्हता. पण शेतीच्या कामांमुळे अनेक दिवस जाऊजाऊ म्हणत जाणं काही झालं नव्हतं. दिवसभराचं काम संपलं. त्यानं भाकरीचं गाठोडं बांधून घेतलं. एका मित्राकडून कंदील उसना घेऊन निघाला डोंगराच्या दिशेने. रात्रीच गावाची सीमा ओलांडली. अमावास्येची रात्र, अगदी गडद अंधार होता. तो डोंगराच्या पायथ्याशी जाऊन थांबला. हातात कंदील होता खरा, पण त्याचा प्रकाश तो किती?

जेमतेम दहा पावले जाता येईल एवढाच! अशा परिस्थितीत तो मोठा डोंगर कसा बरं चढायचा? किऽर्रऽऽर्र अंधारात एवढासा कंदील घेऊन चढणे वेडेपणाचे होईल, असा विचार त्याने केला आणि मिणमिणणारा कंदील घेऊन उजाडायची वाट पाहात तो पायथ्याला बसून राहिला. बसून कंटाळा आला तसा उशाला एक दगड घेऊन मुंडासं पांघरून आभाळातल्या चांदण्या पाहात तो पडून राहिला. तांबडं फुटायची वाट पाहू लागला. कुणाच्या तरी पावलांची चाहूल लागली तसा शेतकरी चट्शिरी उठून बसला आणि अंधाराकडे डोळे ताणून पाहू लागला. इतक्या अवेळी या आडवाटेला कोण बरं आलं? तेवढय़ात कानावर आवाज आला.

‘राम राम पाव्हनं का असं निजलात?’ म्हातारा आवाज होता. शेतकऱ्याने पाहिलं तो एक म्हातारा त्याच्याच दिशेने येत होता. त्याच्या हातात लहानसा कंदील होता.

शेतकरी म्हणाला, ‘‘राम राम बाबा, उजाडायची वाट पाहतोय. म्हणजे डोंगर चढून दर्शनाला देवळात जाईन.’’

म्हातारा हसला. म्हणाला, ‘‘अरे जर डोंगर चढायचं ठरवलं आहेस तर मग उजाडायची वाट का पाहतोस. कंदील तर आहे की तुझ्यापाशी. मग कशासाठी इथं पायथ्यालाच आडून बसला आहेस?’’ ‘‘एवढय़ा अंधारात कसा चढायचा डोंगर. काय वेड लागलंय का तुम्हाला आणि हा कंदील केवढासा! अहो, कसंबसं आठदहा पावलं पुढचं फक्त
दिसतंय याच्या प्रकाशात.’’ तरुण शेतकरी म्हणाला. म्हातारा हसायला लागला आणि म्हणाला, ‘‘अरे तू पहिली दहा पावलं तरी टाक. जितकं तुला दिसेल तेवढा तरी पुढे जा. जसा चालायला लागशील तसे तुला पुढचे पुढचे दिसायला लागेल. फक्त एक पाऊल टाकण्याएवढा जरी प्रकाश असला तरी त्या एकेका पावलाने पृथ्वीला प्रदक्षिणा घालता येते.’’

म्हाताऱ्याचं बोलणं तरुण शेतकऱ्याला पटलं. तो उठला आणि चालायला लागला आणि कंदिलाच्या प्रकाशात सूर्योदयापूर्वी देवळात जाऊन पोहोचलासुद्धा! वाट पाहात बसून कशाला राहायचं? जो थांबतो तो संपतो. जो चालतो तो ध्येय गाठतो, कारण चालणाऱ्यालाच पुढचा रस्ता दिसतो. लक्षात असूद्या की किमान दहा पावले चालण्याइतके शहाणपण आणि प्रकाश प्रत्येकाजवळ असतो आणि तो पुरेसा असतो.

आजचा संकल्प : निमित्त सांगून, कारण काढून मी करायची गोष्ट पुढे ढकलणार नाही.

माझी मायं

हंबरून वासराले
चाटती जवा गाय
तवा मले तिच्यामंदी
दिसती माझी माय

आयाबाया सांगत व्हत्या
व्हतो जवा तान्हा
दुस्काळात मायेच्या माजे
आटला व्हता पान्हा
पिठामंदी पानी टाकून
पाजत जाय
तवा मले पिठामंदी
दिसती माझी माय

कन्या-काट्या येचायाला
माय जाई रानी
पायात नसे वहान तिच्या
फिरे अनवानी
काट्याकुट्यालाही तिचं
नसे पाय
तवा मले काट्यामंदी
दिसती माझी माय

बाप माझा रोज लावी
मायच्या मागं टुमनं
बास झालं शिक्षान आता
घेऊ दे हाती काम
शिकुनश्‍यानं कुठं मोठ्ठा
मास्तर हुनार हायं
तवा मले मास्तरमंदी
दिसतो माझी माय

दारु पिऊन मायेले मारी
जवा माझा बाप
थरथर कापे आन
लागे तिले धाप
कसायाच्या दावनीला
बांधली जशी गाय
तवा मले गायीमंदी
दिसती माझी माय

बोलता बोलता येकदा
तिच्या डोळा आलं पानी
सांग म्हने राजा तुझी
कवा दिसंल रानी
भरल्या डोल्यान कवा पाहील
दुधावरची साय
तवा मले सायीमंदी
दिसती माझी माय

म्हनून म्हंतो आनंदानं
भरावी तुझी वटी
पुना येकदा जलम घ्यावा
तुजे पोटी
तुझ्या चरनी ठेवून माया
धरावं तुझं पाय
तवा मले पायामंदी
दिसती माझी माय




कवी - स. द. पाचपोळ, हिंगोली

आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

इन्द्र्धनुष्याचे रंग आहेत आणि पारिजातकाचा वास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

मी म्हणजे जीवन आणि तु म्हणजे श्वास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

संकटांची नाही भिती, तुझ्या मैत्रीचा विश्वास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

कधी वाटते फक्त तुझी मैत्री सच्ची, बाकी दुनिया नुसता आभास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

हवे काय अजुनी त्याला, मित्र तुझ्यासम ज्यास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

ओढ तुझ्या सावलीची माझिया रस्त्यास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

असो वा नसो कुणी आपल्या संगे, पर्वा त्याची कुणास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

माझ्या चुकांवरही मित्रा पांघरूण तुझे हमखास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

तुझ्याबरोबर ऐन उन्हाळा ही मजला मधुमास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

आयुष्याच्या पटलावरती तुझ्या मैत्रीची आरास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

कधी निखळ चर्चा, आणि कधीतरी उपहास आहे
आपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहे
संताने घराचा दरवाजा तोडला आणि तो खांद्यावर घेऊन बाजारात निघाला .

रस्त्यात त्याला एका माणसाने विचारले, दरवाजा विकायला निघालास का?

संता- नाही, मित्रा कुलूप उघडायचे आहे.

हल्ली कविताच सुचत नाही....!!!

शब्दांच्या या दुनियेत, मन माझे रमत नाही
कविता करायला, हल्ली कविताच सुचत नाही....!!!

शब्दांच्या प्रवासात
ओळ काही मिळत नाही,
वेचली अनेक शब्द फुले
पण शब्द शब्दाला जुळत नाही

खेळ हा शब्दांचा, मनाला कळत नाही,
कविता करायला, हल्ली कविताच सुचत नाही....!!!

रचल्या शब्दांच्या ओळी,
पण यमक काही जुळत नाही,
लिहिलेल्या कवितांना मग
अर्थ काही उरत नाही,

कशी आहे हि वेळ, सरता सरत नाही,
कविता करायला, हल्ली कविताच सुचत नाही....!!!

आई मला लवकर लवकर मोठ्ठ मोठ्ठ व्हायचय ....

आई मला लवकर लवकर मोठ्ठ मोठ्ठ व्हायचय...
आई मला लवकर लवकर मोठ्ठ मोठ्ठ व्हायचय...
मस्त पैकी बॅग घेउन ऑफिसला जायचय

नसतो कुठला होमवर्क न असतो कुठला त्रास
ऑफिस मधुन आल्यावर नसतो कुठला क्लास
घरी येउन आरामात टी . व्ही . पहात रहायचय
मस्त पैकी बॅग घेउन ऑफिसला जायचय ...

सगळे असतात फ़्रेंड आणि टिचर कुणीच नसतात
चॉकलेट देणार् या काकानां बाबा बॉस म्हणतात
छान छान बॉस कडुन रोज चॉकलेट खायचय
मस्त पैकी बॅग घेउन ऑफिसला जायचय ...

कॉमप्यूटरवर बसुन कसल काम करतात ?
कॉमप्यूटरवर तर नुसतेच गेम असतात
रोज रोज गेम खेळुन टॉप स्कोरर व्हायचय
मस्त पैकी बॅग घेउन ऑफिसला जायचय ...

ऑफिसमध्ये जाउन भरपूर मज्जा करतात
तरीच बरं नसल तरी ऑफिसला जातात
ऑफिसला जाउन मला पण खेळायचय
मस्त पैकी बॅग घेउन ऑफिसला जायचय ...

ऑफिसच्या रिसेस मध्ये हॉटेल मध्ये जातात
हॉटेल मध्ये जाउन मस्त चमचमीत खातात
बरगर , पिज्झा , फ़्राईस आणि आईसफ्रूट खायचय
मस्त पैकी बॅग घेउन ऑफिसला जायचय ...

महिन्याच्या शेवटी ह्यांना केवढे पैसे मिळतात !
देव जाणो येवढ्या पैशांच हे काय करतात ?
मला तर महिन्याला फक्त एकच खेळण घ्यायचय
मस्त पैकी बॅग घेउन ऑफिसला जायचय ...

आई मला लवकर लवकर मोठ्ठ मोठ्ठ व्हायचय ....

आई मला लवकर लवकर मोठ्ठ मोठ्ठ व्हायचय ....