याल्गार

नशीबास ’कर हवे तेवढे वार’ म्हणालो
’मानणार ना तरी कधी मी हार’ म्हणालो

केला सौदा संकटांसवे आणि व्यथेला
’खुशाल यावे उघडे आहे दार’ म्हणालो

खेळवून मज अखेर जेव्हा नियती दमली
डाव नवा मांडून तिला ’तैयार’ म्हणालो

रिचवून सारे तुडंब प्याले अपमानाचे
दगाबाज दु:खालाही ’आभार’ म्हणालो

कुबेर आला दारी म्हणाला माग हवे ते...
हसून त्याला ’केवळ खांदे चार’ म्हणालो

रडलो नाही... लढलो, भिडलो आयुष्याला
राखेतुनही उठलो अन्‌ ’याल्गार’ म्हणालो

-गुरु ठाकूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा