आखजी

आखजीचा आखजीचा
मोलाचा सन देखा जी
निंबावरी निंबावरी
बांधला छान झोका जी
माझा झोका माझा झोका

चालला भिरभिरी जी
माझा झोका माझा झोका
खेयतो वार्‍यावरी जी
गेला झोका गेला झोका

चालला माहेराले जी
आला झोका आला झोका
पलट सासराले जी
माझा झोका माझा झोका

जीवाची भूक सरे जी
भूक सरे भूक सरे
वार्‍यानं पोट भरे जी
आला वारा आला वारा

वार्‍यानं जीव झुले जी
जीव झुले जीव झुले
झाडाची डांग हाले जी
डांग हाले डांग हाले

नजर नहीं ठरे जी
झाली आता झाली आतां
धरती खालेवर्‍हे जी
आंगनांत आंगनांत

खेयती पोरीसोरी जी
झाल्या दंग झाल्या दंग
गाऊनी नानापरी जी
झाला सुरू झाला सुरू

पहिला माझा पिंगा जी
फुगड्यांचा फुगड्यांचा

चालला धांगडधिंगा जी
दारोदारीं दारोदारीं
खेयाची एक घाई जी
घरोघरी घरोघरीं

मांडल्या गवराई जी
गवराई गवराई
सजव सजवल्या जी
संगातीनी संगातीनी

बोलव बोलवल्या जी
बोलवल्या बोलवल्या
टिपर्‍या झाल्या सुरूं जी
टिपर्‍याचे टिपर्‍याचे

नादवले घुंगरू जी
कीती खेय कीती खेय
सांगूं मी काय काय जी
खेयीसनी खेयीसनी

आंबले हातपाय जी
चार दीस चार दीस
इसावल्या घरांत जी
आहे पुढें आहे पुढें

शेतीची मशागत जी
सन सरे आस उरे
आखजी गेली व्हय जी

सांग सई सांग सई,
आखजी आतां कही जी?


कवयित्री – बहिणाबाई चौधरी

1 टिप्पणी: