स्वातंत्र्याचे अम्ही शिपाई!

स्वातंत्र्याचे अम्ही शिपाई। सुखवू प्रियतम भारतमायी।।

देशभक्तिचा सुदिव्य सोम
पिउन करु प्राणांचा होम
कष्ट, हाल हे अमुचे भाई।। स्वातंत्र्याचे....।।

धैर्याची ती अभंग ढाल
त्यागाची ती वस्त्रे लाल
निश्चयदंडा करांत राही।। स्वातंत्र्याचे....।।

समानतेची स्वतंत्रतेची
पताकेवरी चिन्हे साची
दिव्य पताका फडकत जाई।। स्वातंत्र्याचे....।।

ऐक्याचा झडतसे नगारा
कृतिरणशिंगे भरिति अंबरा
चला यार हो करु रणघाई।। स्वातंत्र्याचे....।।

कळिकाळाला धक्के देऊ
मरणालाही मारुन जाऊ
प्रताप अमुचा त्रिभुवन गाई।। स्वातंत्र्याचे....।।

विरोध आम्हां करील कोण
सूर्यहि आम्हांसमोर दीन
प्रतापे दिशा धवळू दाही।। स्वातंत्र्याचे....।।

विरोध आम्हां करील कोण
करु सर्वांची दाणादाण
जोर आमुचा कुणी न साही।। स्वातंत्र्याचे....।।

असत्य अन्यायांना तुडवू
दुष्ट रुढिंना दूरी उडवू
घाण अता ठेवणार नाही।। स्वातंत्र्याचे....।।

जशी पेटलेली ती चूड
तसेच आम्ही भैरव चंड
औषधास दास्यता न राही।। स्वातंत्र्याचे....।।

परकी अथवा स्वकीय झाला
जुलूम आम्हां असह्य झाला
जुलूम जाळू ठायी ठायी।। स्वातंत्र्याचे....।।

जाच काच गरिबांना नुरवू
झोपड्यांतुनी मोदा फुलवू
मक्त तयांना करु लवलाही।। स्वातंत्र्याचे....।।

श्रेष्ठकनिष्ठत्वाचे बंड
मोडू करुन प्रयत्न चंड
अस्मादगण या शपथे घेई।। स्वातंत्र्याचे....।।

देश अमुचा करु स्वतंत्र
मनोबुद्धिला करु स्वतंत्र
स्थापन करणार लोकशाही।। स्वातंत्र्याचे....।।

अनंत यत्ने अखंड कृतिने
परमेशाच्या कृपाबलाने
सफल मनोरथ निश्चित होई।। स्वातंत्र्याचे....।।


कवी - साने गुरुजी
कवितासंग्रह - पत्री
- धुळे तुरुंग, मे १९३०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा