संध्याकाळ

संध्याकाळ असे : रवी उतरतो आहे समुद्रावरी,
त्याचें बिम्ब सुरेख चुम्बिल पहा लाटांस या लौकरी;
मातीला मिळूनी गळूनि पडलें तें पुष्प जाई जसें,
लोपाला लहरींत मंडलहि हें आईल आतां तसें.

आकाशीं ढग हे पहा विखुरले, त्यांच्यावरी सुन्दर
रंगाच्या खुलती छटा, बघुनि त्या येतें स्वचित्तावरः---
हा मृत्युंगत होतसे दिवस, तन्मस्तिष्कपिंडांवरी
येतो अक्षयमोक्षसिन्धुलहरी तेजोयुता यापरी !

पक्षी हे घरटयांकडे परतुनी जातात कीं आपुलें;
त्यांलागीं किलबील शब्द करुनी आनंद देतीं पिलें;
गाई या कुरणांतुनी परततां हंबारवा फोडितो,
त्यांचे उत्सुक वत्स त्यांस अपुल्या दीनस्वरें बाहती.

आनन्दी दिसती युवे, फिरकतो जे या किनार्‍यावरी,
घ्याती ते निज सुन्दरीस, गमतें उल्हासुनी अन्तरी;
जी ही मन्दिरर जि पैल दिसते, तीच्या गवाक्षांतुनी
झाल्या त्या असतील ह्रष्ट युवतीं चित्तीं असें आणुनीः---
“ अस्तालागुनि जातसे दिनमणी; रात्री अहा येतसे !

रात्री !  जादु किती विलक्षण तुझे नामामधें गे वसे !
प्रेमाचें ह्र्दयीं उषीं कुमुद जें संकोच गे पावलें
देसीं त्यास विकास ! - चित्त म्हणुनी नाथाकडे लागलें ! ”

संध्येला प्रणयी तुम्ही जन सुखें द्या हो दुवा; मी करीं
हेवा तो न मुळीं; नसे प्रणय तो माझ्याहि का अन्तरीं ?
आहें मी घर सोडुनी पण दुरी; चित्तीं म्हणूनी असें
मी संध्यासमयीं उदास; अथवा व्हावें तरी मीं कसें !


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- शार्दूलविक्रीडित 
- सावंतवाडी, जानेवारी १८९३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा