कोणीकडून ? कोणीकडे ?

कोणीकडून ? कोणीकडे ?
इकडूनि तिकडे, म्हणती गडे;
येथूनि तेथें, मागुनि पुढें,
हें तर नित्यच कानीं पडे;

पण समाधान का कधीं तयानें घडे ?

जिवलगे ?

कोणीकडे ग ?--- कोणीकडून ?
तिमिरामधेच तिमिरामधून;
घडीभर पडे मध्यें उडून,

ह्रदय हें उलें त्यामुळें निराशा जडून !

जिवलगे !

भोगांचीं अवशिष्टें तुसें
घशांत खुपती, लाणे पिसें;
मागें पुढें न कांहीं दिसे;
संशयडोहीं नौका फसे;

मग वदे---हरे राम ! रे, करावें कसें ?

जिवलगे !

गोत्यांत अशा आलों कुठून ?
कोठें जमइन कैसा सुटुन ?---
असें विचारी जेव्हां झटून,
भ्रमबुद‍बुद्‍ तो जातो फुटून;

मग अह ! विभिन्नच दिसे दृष्टि पालटून !

जिवलगे !

शून्य म्हणूं जें मागें पुढें,
त्यांतुनि दीप्ती दृष्टी पडे,
मधला उजेड तिमिरीं दडे;
निजधामाहुनि आलों, गडे,

तर, ऋणें फेड, चल सुखे स्वधामाकडे !

जिवलगे !


कवी - केशवसुत
कवितासंग्रहहरपलें श्रेय
- भडगांव, १७ ऑक्टोबर १९००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा