हे गंधित वारे फिरणारे
घन झरझर उत्कट झरणारे . . .
हे परिचित सारे पूर्वीचे . . .
तरी आता त्याही पलिकडचे . . .
बघ मनात काही गजबजते . . .
क्षणाक्षणाच्या दिव्यादिव्यातून अत्तर जळते रे
उमजत नाही ओढ कुणाची सुखवित सलते रे . . .
हे गंधित वारे फिरणारे घन झरझर उत्कट झरणारे . . .
कुठल्या देशी नकळत माझे पाऊल पडले रे
सूर रोजचे कसे नव्याने मनास भिडले रे
हे गीत जयाला पंखसुध्दा . . .
अन हवाहवासा डंखसुध्दा . . .
कधि शंकित अन नि:शंकसुध्दा . . .
क्षणाक्षणाच्या दिव्यादिव्यातून अत्तर जळते रे
उमजत नाही ओढ कुणाची सुखवित सलते रे . . .
हे गंधित वारे फिरणारे घन झरझर उत्कट झरणारे . . .
मनात जे जे दडून होते नकळत आकळते
कसे दुज्याच्या स्पर्शाने ‘मीपण’ झगमगते
ही जाणीव अवघी जरतारी . . .
हर श्वासातुन परिमळणारी . . .
हर गात्रातुन तगमगणारी . . .
क्षणाक्षणाच्या दिव्यादिव्यातून अत्तर जळते रे
उमजत नाही ओढ कुणाची सुखवित सलते रे . . .
हे गंधित वारे फिरणारे घन झरझर उत्कट झरणारे . . .
नाव न उरले, गाव न उरले, अवघे ओसरले
बेभानाचे भान जिण्याला बिलगुन बसलेले
हा स्पर्श विजेच्या तारांचा . . .
हा उत्सव बघ अस्वस्थाचा . . .
हा जीव न उरला मोलाचा . . .
क्षणाक्षणाच्या दिव्यादिव्यातून अत्तर जळते रे
उमजत नाही ओढ कुणाची सुखवित सलते रे . . .
हे गंधित वारे फिरणारे घन झरझर उत्कट झरणारे . . .
- संदिप खरे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा