रेशमाच्या रेघांनी

(चाल - रेशमाच्या रेघांनी)

रेशमियाच्या गाण्यांनी
भुंकणाऱ्या प्राण्यांनी
कर्ण माझा कसा की हो फोडीला
हात नका लावू त्याच्या सीडीला.

नवी कोरी कॉपी सुफ़ी साजाची
'टोपी' चढवली रिमिक्स बाजाची
बाजाची हो बाजाची
माईक आडवा ऐटीमध्ये, तोंडाजवळ ओढीला
हात नका लावू त्याच्या सीडीला.

गात जाई प्रत्येक गाणे नाकात
रसिकांच्या उठते तिडिक डोक्यात
डोक्यात हो डोक्यात
चुंबनखोर इम्रानहाश्मी, आणिक असतो जोडीला
हात नका लावू त्याच्या सीडीला.

कृपा त्याच्यावर सल्लूमियाँची
बाजारात चलती आज कचऱ्याची
कचऱ्याची हो कचऱ्याची
काय म्हणू देवा देवा, जनतेच्या आवडीला
हात नका लावू त्याच्या सीडीला.

फायदा एक दिसतो त्याच्या गाण्यात
गाढवही गाते वाटे सुरात
सुरात हो सुरात
न्यूनगंड कित्येकांचा, दूरदेशी धाडीला
हात नका लावू त्याच्या सीडीला।


कवी - मिलिंद छत्रे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा