माझ्या मना बघ दगड

(विंदांच्या माझ्या मना बन दगड़ ह्या कवितेचे विडंबन)

हा रस्ता अटळ आहे
पावसामधून - पाण्यामधून
ट्रॅफिकमधून - खड्ड्यांमधून
अंधेरी, व्हीटी किंवा शीव?
नको - नको! टाक लीव!
नाहीतर अडकून बसशील खास
ट्रॅफिकमध्ये तासनतास
तहान - भुकेने होईल त्रास
विसर ऑफिस किंवा रड
माझ्या मना बघ दगड

हा रस्ता अटळ आहे
बसमध्ये शिरलास तर
उभं राहायला जागा कर
दांड्यावरती हात धर
तरी होशील खाली - वर
म्हणून म्हणतो धर पक्का
संभाळ, संभाळ लागेल धक्का
पडणाऱ्या, पडशील किती?
झुलणाऱ्या, झुलशील किती?
धक्काबुक्की करशील किती?
जिरेल पुरती तुझी रग
माझ्या मना दगड बघ

हा रस्ता अटळ आहे
येथेच असतात सदा'चर'
जागोजाग रस्त्यावर
असतात फिरत गणवेषात
थांबवून करतात पुढे हात
आणि म्हणतात " ही हिंमत?
सिग्नल मोडलास - टाक किंमत! "
पावती महाग, लाच स्वस्त
हां - हां म्हणता करतात फस्त
कमावशील पुन्हा गाळून स्वेद
सरकव नोट, नको खेद

हा रस्ता अटळ आहे
सुट्टी घेणे हाच उपाय
काय अडेल तुझ्याशिवाय?
रस्त्यावरचे सारे पाणी
वाहून काय नेईल कोणी?
काय तुझी ही छत्री
न भिजण्याची देईल खात्री?
रुळावरून वाहतील ओढे
मध्य रेल्वेचे अडेल घोडे
चाल वर धरून विजार
जवळून जाईल मग मोटार
शर्टावरचे डाग रगड
माझ्या मना बघ दगड

हा रस्ता अटळ आहे
अटळ आहे घाण सारी
अटळ आहे ही शिसारी
एक सर अशी येईल,
घाणीचीच राड होईल
डास-माशा सगळे किडे
घोंगावतील मग चोहीकडे
रोगराईचा धुमाकूळ
रोगी होईल सारे कूळ
ऐका थापा! ऐका आवाज!
निवडणूक येते आज!
निवडणुकीतला उमेदवार
या रस्त्यावर घालिल टार
इतकी चंगळ तुला रगड
माझ्या मना बघ दगड



कवी - नचिकेत कुलकर्णी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा