तिळ

तिथ गालाच्या बाजूला, नाकाच्या थोडं खाली..
ओठांच्या काठावर भेट 'तिळा'सवे झाली !

तिळ मनात भरला, तिळ डोळ्यात कोरला..
माझ्या ओठांनीही ध्यास सखे तिळाचा धरला !

भेट घेण्याला तिळाची जीव तिळ तिळ तुटे..
तिळ लपतो कुठेही त्याला शोधू कुठे कुठे ?

सांग शोधू कुठे कुठे आता तिळाला साजणी..
लपुनिया ओठामागे तिळ मिळाला साजणी !

नागिणीची धाव जशी तिच्या बिळावरी जाते..
माझी नजर साजणी तुझ्या तिळावरी जाते !

तिळ खुणावितो मला त्याच्या जवळ जावू दे..
माझ्या ओठांची साजणी भेट तिळाशी होवू दे !

माझ्यासाठी त्या तिळान असं कितीदा झुरावं ?
तुझ्या टपोर डोळ्यात माझं इवलसं गाव !


गीत : ज्ञानेश वाकुडकर
गायक/संगीत : मिलिंद इंगळे
अल्बम : 'तुझ्या टपोर डोळ्यात माझं इवलसं गाव'
कविता संग्रह :  'सखे साजणी'

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा