सेवेकरी मुद्रा असों नये बाशी
पहाटेस नेमें कातरावी मिशी

फाइलीची फीत रक्ताहून लाल
बाइलेची प्रीत सेकंदांशीं तोल

नको उमटाया स्तनावर वळ
सलामांचे हात असावे निर्मळ

कानाच्या भोकाशीं फक्त लाव फोन
इमानी ठेवावी धडावर मान

अश्रूंनाही म्हण वाळणार घाम
घाल आंतडीचा उरास लगाम

हृदयास म्हण हालणारा पंप
लाळेच्या तारेशी सदा असो कंप

गळ्यांतली वांती गळ्यांत ठेवून
पिंकदाणीतले शब्द घे वेचून

थोरांनी टाकिल्या श्वासां लाव नाक
कण्यासही हवे किंचीतसे पोक

सहीस जाताना मालवावी छाती
भ्रांतींत ठेवाव्या डोळ्यांतल्या वाती

नको पाहूं दूर भ्रमातला प्रांत
तुझ्या पायांसाठी कचेरीची वाट


कवी - आरती प्रभू
- ०७ - ०६ - ६० 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा