sheel लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
sheel लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गरगरा फिरे भिंगरी

गरगरा फिरे भिंगरी – जशी – गरगरा फिरे भिंगरी !

लय गोड सखूचा गळा :
मैनाच म्हणू का तिला?
अंगावर नवती कळा
उरावर उडवीत आली सरी.

सारखी करी हुरहुरा
हाणते सखू पाखरा
सावरून पदरा जरा
मळाभर फिरते ही साजरी

ये पिसाटवारा पुरा !
अन् घाबरली सुंदरा
ये माघारी झरझरा
मिळाली संगत मोटेवरी

‘ये जवळ हरिण-पाडसा!’
लावला सूर मी असा;
अन साथ करित राजसा
सरकली जवळ जरा नाचरी

घेतला सखूचा मुका
(हं – कुणास सांगू नका!)
हलताच जराशी मका
उडाली वाऱ्यावर बावरी

गरगरा फिरे भिंगरी – जशी – गरगरा फिरे भिंगरी !


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

अपमृत्यू

होते चढते जीवन : झाली पण माती
आता ममतेच्या तुटल्या कोमल ताती
आता मरणाचा पडला निर्दय फासा
अतृप्तच गेली नवसंसारपिपासा

डोळे मिटलेले, पडली मान पहा ही
आहे उघडे तोंड, तरी बोलत नाही
छाती फुगलेली दिसते उंच जराशी
निर्जीव तरी हे धरले हात उराशी

अद्याप गताशाच जणू झाकत आहे
अद्याप उसासाच जणू टाकत आहे


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

रानराणी

तू पूस डोळ्यातले पूरपाणी
रानराणी !

निमिषभर रहा तू
त्वरित परत जा तू
राहील चित्तातल्या गूढ पानी
ही कहाणी

करुण हृदयगाने
भर नंतर राने
दुरात येतील ते सूर कानी
दीनवाणी


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

सुंदरता

सुंदरतेचे मोहक दारुण
घडले दर्शन ओझरतेही
तर मग पुढते हे जग बुडते
एकच उरते ओढ अशी ही

क्षण बघतो जो कुणी बिचारा
चिन्मय तारा त्या गगनाची
तो वा-यागत जातो वाहत
छेडत छेडत तार मनाची

नभमुकुरांवर दुरांत दिसते
बिंबच नुसते हिचे जुगारी
उठतातच तर मग सिंधूवर
व्यथित अनावर लहरी लहरी

तिमिरामध्ये नीलारुण घन
मुकेच नर्तन ही करताना
मलय निरंतर करतो हुरहुर
सोडत वरवर श्वास पहा ना!

हे श्रावणघन-गर्जित सारे
वादळवारे, विद्युतरेषा -
ती मिळण्याची विश्वमनाची
कैक दिनांची व्यथित दुराशा


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

मनोगत

चंद्र बुडत असताना ये तू
वर असताना मोहक तारे
जग निजले असताना ये तू
दाट धुके पडल्यावर सारे

नाजुक वाहत, ही तरुराजी
विचलित करतो कोमल वारा
स्पर्शित कर हनु तशीच माझी
पुलकित कर हा देहच सारा

मग लगबग हे उघडत लोचन
थरकत थोडी स्पर्शसुखाने
मी पाहिनच नीट तुला पण
किंचित लाजत चकित मुखाने

शांत निरामय जग असताना
तरुपर्णांची कुजबुज ऐकत
त्याहूनहि पण हळूच, साजणा,
सांग तुझे तू मधुर मनोगत!

चंद्र बुडत असताना ये तू
वर असताना मोहक तारे
जग निजले असताना ये तू
दाट धुके पडल्यावर सारे


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

फुला रे

उघड उघड पाकळी, फुला रे
उघड उघड पाकळी

आंतल्या आंत कोवळे
मधुजीवन कां कोंडले?
बाहेर हवा मोकळी, फुला रे

तमसंकुल सरली निशा
नीलारुण हंसली उषा:
चौफेर विभा फांकली, फुला रे

मलयानिल उदयांतला
बघ शोधत फिरतो तुला
कां मृदुल तनू झांकली, फुला रे

कीं रहस्य हृदयांतले
आंतल्या आंत ठेवले?
ही तुझी कल्पना खुळी, फुला रे


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

कदाचित

फिरेल चंचलतेने जेव्हा
ती सगळे विस्मरुन चिंतन,
स्वैरपणाच्या सुखांत माझी
नाही सय व्हायची तिला पण

ती फिरताना चाफ्याखाली
पटपट त्याचा फुलेल सुमगुण
माझ्या अंतर्गत प्रेमाची
नाही सय व्हायची तिला पण

ती फिरताना चाफ्याखाली
दवबिंदूचे घडेल सिंचन
माझ्या अविरत अश्रुजलाची
नाही सय व्हायची तिला पण

बघेल ती मुख इंद्रधनुचे
सुरेल ऐकत कोकिलकूजन
त्या माझ्या गत मधुगीताची
नाही सय व्हायची तिला पण

विशाल विस्मित नयनांनी ती
बघेल आकाशाचे अंगण
असीम माझ्या गत आशेची
नाही सय व्हायची तिला पण

अमेल ती घनतमांत एकटी
स्वैरपणाने फिरत वनोवन
तिच्या नि माझ्या एकांताची
नाही सय व्हायची तिला पण

तमांतल्या तरुशाखांमध्ये
ती असतांना उभी न्यहाळत
तिला, उसाशागत वा-याने
सय माझी होईल कदाचित


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

पिसाट मन

मन पिसाट माझे अडले रे,
थांब जरासा !

वनगान रान गुणगुणले;
दूरात दिवे मिणमिणले;
मधुजाल तमाने विणले रे,
थांब जरासा !

ही खाली हिरवळ ओली;
कुजबुजून बोलू बोली;
तिमिराची मोजू खोली रे,
थांब जरासा !

नुसतेच असे हे फिरणे
नुसतेच दिवस हे भरणे
नुसतेच नको हुरहुरणे रे,
थांब जरासा !


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

समाधि


या दूरच्या दूर ओसाड जागी
किडे पाखरांवीण नाही कुणी
हा भूमिकाभाग आहे अभागी
इथे एक आहे समाधी जुनी

विध्वंसली काळहस्तांमुळे ही
हिला या, पहा, जागजागी फटा
माती, खडे आणि आहेत काही
हिच्याभोवती भंगलेल्या विटा!

आहे जरी लेख हा, छेद गेला -
जुन्या अक्षरांतील रेघांमधून
दुर्वांकुरे अन तरु खुंटलेला
निघाला थरांतील भेगामधून

कोठून ताजी फुले, बाभळींनी -
हिला वाहिले फक्त काटेकुटे
ही भंगलेली शलाका पुराणी
कुणाचे तरी नाव आहे इथे

रानांतला, ऊन, मंदावलेला,
उदासीन वारा इथे वाहतो
फांदीतला कावळा कावलेला
भुकेलाच येथे-तिथे पाहतो!


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

अजून

घरदिव्यांत मंद तरी
बघ, अजून जळते वात
उजाळल्या दिशा, सजणा
न कळताच सरली रात!

झडता झडेना या
लोचनातली पण धुंद
सर्व रात्र भर निजला
जिवलगा, कळीत सुगंधी!

निवळले, तरी दिसतो
पुसट एक हा तारा
बघ, पहाटचा सुटला
मधुर उल्हसित वारा!

फुगवते पिसारा अन
फिरफिरुन डोकावते -
वळचणीतली चिमणी
बघ, हळूच चिवचिवते!

जवळपास वाटेने
सुभग चालली कोणी
वाजते तिच्या भरल्या
घागरीतले पाणी

उगिच हासते माझे
ललित अंतरंग, सख्या!
उमलत्या फुलांमधले
हालले पराग, सख्या!

झोप तू, मिठीमधला
अलग हा करु दे हात
उलगडू कशी पण ही
तलम रेशमाची गाठ?


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

आता सुटला धीर!

आता सुटला धीर,
सख्या बघ
आता सुटला धीर!

कुठवर लपवू
ह्र्दयामधला
हा रुतलेला तीर ?

हासत वरवर
रोधू कुठवर
हे नयनांचे नीर ?

भ्रामक, अपुरे
शब्द दुहेरी
वाढवतात फिकीर

जीवन अथवा
मरण मिळू दे :
शिणले ह्र्दयशरीर

काय खरे ते
नीट कळू दे
तू केलास उशीर


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

म्हणूं दे, ह्रदया

म्हणू दे, ह्र्दया,
अदय नीतीचे
नियम रीतीचे
विषम प्रीतीचे गीत;

गहन मनिषेने
जतन केलेल्या
पण न घडलेल्या
मधुर मिलनाचे गीत;

बिभव-दैन्याच्या
अशुभ कलहाचे,
व्यथित ह्र्दयाचे,
विकल विरहाचे गीत;

करुण तपलेल्या
नयनसलिलाने,
ह्र्दयरुधिराने
सतत भिजणारे गीत;

विगत आशेच्या
विकट भासांनी
कढत श्वासांनी
सतत सुकणारे गीत

म्हणूं दे, ह्रदया
म्हणूं दे, ह्रदया


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

माझी गाणी

-१-
ओळख, रे जीवा, आता देव-देवा
मग देह-भावा-संगे नाचू

माझा देव सखा सर्वत्र सारखा
कोणाला पारखा नाही नाही

बाहेर अंतरी उभा खाली-वरी
आहे घरीदारी खरोखर

विश्वाचे मंदिर, विश्वच ईश्वर,
सगुण सुंदर निर्गुणही

आता ओळखले : विश्वच हासले
नाग म्हणे, झाले समाधान

-२-
एकाचाच सूर एकतारीवर
मधुर मधुर वाजवावा

माझा योगा-याग आळवावा राग
डोलवावा नादरंगी

मंद मंद चाली वागीश्वरी आली
आता दुणावली कोवळीक

तन्मात्रांचे पांच नानाविध नाच
झाला सर्वांचाच एकमेळ

मन हळुवार झाले एककार
विविध विकार दुरावले


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

रंकाची राणी

आनंदी, स्वच्छंदी गंधर्ववाणी
प्रीतीच्या दोघांनी नांदावे रानी;
लंघावे मोठाले नाले;
झेलावे झाडांचे पाले;
हौशीने गुंफाव्या पुष्पांच्या माळा:
आता, गऽ, लोकांचा कंटाळा आला!

हौशीने सोसावे दोघांनी धोके
हौशीने घ्यावे, गऽ, वेलींचे झोके!
दोघेही दोघांचे चाकर
वेळेला लाभावी भाकर
प्रीतीने प्राशावे ओढ्याचे पाणी
हसावी आनंदी रंकाची राणी

दुर्वांचे गालिचे विश्रांतीसाठी
भोताली रानाची चंदेरी शांती;
देवाची विश्वासू माया:
कोठेही टेकावी काया;
निद्रेने झाकावा जिवात्म सारा;
अंगाला लागावा रानाचा वारा


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

आता

अंतरीच्या गूढ गर्भी एकदा जे वाटले गऽ!
एकदा जे वाटले ते, प्रेम आता आटले गऽ!

दूर सोनेरी सुखाचे पाहिले आभास मी तू :
रंगले आभाळ पूर्वी : तेच आता फाटले गऽ!

चांदण्या रात्रीत मागे हिंडलो एकत्र दोघे :
चंद्रिकेने थाटले जे ते तमाने दाटले गऽ!

एकदा जी दो थडीने वाहिली होती, सखे त्या
जान्हवीचे शुद्ध पाणी संशयाने बाटले गऽ!

एकदा ज्यांतून मागे सूर संवादी निघाले
वंचनेने तोडले ते, स्नेहतंतू आतले गऽ!

शेवटी मंदावलेल्या वादळी वा-याप्रमाणे
राहणे झाले दिवाणे, गीत गाणे कोठले गऽ!

यातना दुःखांतली अन चेतना गेली सुखाची
झाकल्या नेत्रात आता अश्रुबिंदू गोठले गऽ!


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

जीवनकथा

चुकीच ही झाली
नको पण रागवू आता:
अनेक ठिगळांनी
पुरी कर ही जीवनकथा

नको दोष लावू:
मनोदौर्बल्यच हे माझे
नको अंत पाहू :
माझे झाक दैन्य जे जे

उप-या जगताला
करु दे विचार समतेचा
विकलित ह्र्दयाला
भरवसा तुझ्याच ममतेचा

खडतर वाट अती:
काटे फार दाटले, रे!
जागोजाग किती
माझे वस्त्र फाटले, रे!

हताश हाताने
कसे या छिद्रांना लपवू?
उघड्या लाजेने
कसे या जगामधे मिरवू?

चुकी जरी झाली
नको पण रागावू आता:
अनेक ठिगळांनी
पुरी कर ही जीवनकथा


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

नदीकिनारी

नदीकिनारी, नदीकिनारी, नदीकिनारी, ग !

अवतीभवती नव्हते कोणी
नाचत होत्या राजसवाणी
निळ्या जळावर सोनसळीच्या नवथर लहरी, ग

दुसरे तिसरे नव्हते कोणी;
तुझेच हसले डोळे दोन्ही:
अवखळ बिजली भरली माझ्या उरात सारी, ग !

जरा निळ्या अन्‌ जरा काजळी
ढगात होती सांज पांगली:
ढवळी ढवळी वर बगळ्यांची संथ भरारी, ग !

सळसळली ग, हिरवी साडी;
तिनेच केली तुझी चहाडी:
फडफडल्या पदराच्या पिवळ्या लाल किनारी, ग !

वहात होते पिसाट वारे;
तशात मी उडविले फवारे:
खुलून दिसली तुझ्या उराची नवी थरारी, ग !

कुजबुजली भवताली राने;
रात्र म्हणाली चंचल गाणे:
गुडघाभर पाण्यात दिवाणे दोन फरारी, ग !

नदीकिनारी, नदीकिनारी, नदीकिनारी, ग !


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

आज जाऊ दूर रानी

प्रीत ही आली भराला : वेळ ही सौंदर्यशाली
आज जाऊ दूर रांनी : साजणा रे, सांज झाली!

आजपावेतो जगाचे पाश होते प्राक्तनी हे :
स्वैरता घेतील आता अंतरे संकोचलेली

मी अशी माळीन भोळी : सारखी घालीन माळा :
लाघवाने पुष्पमाळा गुंफणारा तूच माळी

ये, उभ्या विश्वास निंदू : प्रीतितालानेच हिंडू
ही निशा गुंफिल आता चांदण्यांची शुभ्र जाळी

गालिचे आहेत जेथे कोवळ्या दुर्वांकुरांचे ,
ये तिथे, लाजून वाचू अंतरांचे लेख गाली

वित्त, विद्या, मान सारे तुच्छतेने, ये, झुगारु :
व्यवहारी या जगाचा कायदा हा जीव जाळी.

कायदा येथील : ये, करू वेडाच सौदा :
प्रेम दे, अन प्रेम घे अन यौवनाची ही नव्हाळी.


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

एक वेळी

एकटा मी, अन होती एकली तू
का गळ्याची आण होती घेतली तू
फार वर्षांनी तुझ्या भेटीस आलो
का कपाळाला अढी ही घातली तू?

कालमानानेच आता लोपले का
मागचे सारे जुने आतुर हेतू
संपला सारा जरी आता जिव्हाळा
यापुढे साधेसुधे सौजन्य दे तू

एक वेळी वाटली होती जिवाला
चांदणी विस्तीर्ण अंधारातली तू


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

ये शेवटी तरी तूं

हे भागलेत डोळे, नाही उसंत जीवा
वेडा अमीर माझा, बाई कुठे बघावा!

चिंतून लौकिकाशी
संकोचले जराशी
होऊनी तो उदासी गेला उडून रावा

सारेच हासले गऽ
आला असेल राग
हा धुंद फुंद नाग डोलून का फिरावा ?

भारी अधीर तूही
केली कशास घाई ?
नाही तुला मनाई येते तुझ्याच गावा

माझी झुरे नवाई,
माया तुला न काही
वेडीपिशी कशीही घेते तुझ्याच नावा

का रे मनांत किंतू
आता, सख्या परंतू
–ये शेवटी तरी तू सोडून भेदभावा


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ