आज जाऊ दूर रानी

प्रीत ही आली भराला : वेळ ही सौंदर्यशाली
आज जाऊ दूर रांनी : साजणा रे, सांज झाली!

आजपावेतो जगाचे पाश होते प्राक्तनी हे :
स्वैरता घेतील आता अंतरे संकोचलेली

मी अशी माळीन भोळी : सारखी घालीन माळा :
लाघवाने पुष्पमाळा गुंफणारा तूच माळी

ये, उभ्या विश्वास निंदू : प्रीतितालानेच हिंडू
ही निशा गुंफिल आता चांदण्यांची शुभ्र जाळी

गालिचे आहेत जेथे कोवळ्या दुर्वांकुरांचे ,
ये तिथे, लाजून वाचू अंतरांचे लेख गाली

वित्त, विद्या, मान सारे तुच्छतेने, ये, झुगारु :
व्यवहारी या जगाचा कायदा हा जीव जाळी.

कायदा येथील : ये, करू वेडाच सौदा :
प्रेम दे, अन प्रेम घे अन यौवनाची ही नव्हाळी.


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा