ये शेवटी तरी तूं

हे भागलेत डोळे, नाही उसंत जीवा
वेडा अमीर माझा, बाई कुठे बघावा!

चिंतून लौकिकाशी
संकोचले जराशी
होऊनी तो उदासी गेला उडून रावा

सारेच हासले गऽ
आला असेल राग
हा धुंद फुंद नाग डोलून का फिरावा ?

भारी अधीर तूही
केली कशास घाई ?
नाही तुला मनाई येते तुझ्याच गावा

माझी झुरे नवाई,
माया तुला न काही
वेडीपिशी कशीही घेते तुझ्याच नावा

का रे मनांत किंतू
आता, सख्या परंतू
–ये शेवटी तरी तू सोडून भेदभावा


कवी - ना. घ. देशपांडे
कवितासंग्रह - शीळ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा