दीपज्योतीस

सोन्याची तनु जाळितेस अपुली पाषाणमूर्तीपुढे,

मुग्धे ! ते वद कोण पुण्य तुझिया हातास तेणे चढे ?

सारे विश्व बुडे तमात तिकडे भांबावुनी बापुडे,

गे ! निष्कंप, तुला परंतु इकडे, ही ध्यानमुद्रा जडे.

घ्याया कोंडुनि मंदिरात जगदुद्यानी न तू जन्मली,

वाया नासुनि जावया नुगवली बागेत चाफेकळी !

व्हाव्या वर्धित वस्तु ज्यात वसते सौंदर्य अत्युत्कट,

इच्छा केवळ की ! न वस्तुसह ते पावो जगी शेवट.

प्रत्यंगी अवघ्या प्रकर्षभर ये ज्यांच्या पुरा मोडुन

त्यांच्या पूर्णपणास सुस्थिरपणा येथे न अर्धक्षण,

पूर्णोत्थानपनकाल तोच पतनप्रारंभही होतसे,

ऐसा निष्ठुर कायदा सकल या सृष्टीत शासीतसे !

येथे नूतनजीर्ण, रूप अथवा विद्रूप, नीचोत्तम;

न्यायान्याय, अनीतिनीति, विषयी संभोग का संयम;

जाती ही भरडोनि एक घरटी, एकत्र आक्रंदत,

आशा भीतिवशा म्हणूनिच मृषा स्वर्ग स्रुजी शाश्वत.

हे विषम्य असह्य ’होतसमयी’ स्थापावया साम्यता,

तेजोवंत यदा यदा त्यजुनी ती प्रेतोपमा स्तब्धता;

अन्यायप्रतिकारकार्य करिती नाना प्रकारान्तरे,

दारी बंड ! घरात बंड ! अवघे ब्रह्मांड बंडे भरे !

हे लोकोत्तर रूप तेज तुजला आहे निसर्गे दिले,

की तू अन्य तशीच निर्मुनि जगा द्यावीस काही फले;

दाने दे न कुणा निसर्ग ! धन तो व्याजे तुम्हा देतसे,

ते त्याचे ऋण टाक फेडुनि गडे ! राजीखुशीने कसे !

होता वेल रसप्रसन्न फुटुनी येतो फुलोरा तिला,

ती आत्मप्रतिमास निर्मुनि हसे संहारकालानला;

’वाडा आणि जगा’ निसर्ग म्हणतो सृष्टीस भूतात्मिका,

डोळ्यांनी उघड्या पहात असता होशी गुन्हेगार का ?


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

वात्सल्य

पूर्वेला स्पर्शुनि शशि अस्तंगत झाला,

उदरस्थ बिंब तदनंतर ये उदयाला.

पाहता पुत्रमुख अश्रु तिचे ओघळले.

हिम होउनि होते ते सृष्टीवर पडले.

व्योमस्थ दृश्यसाम्य ते तदा महिवरले

पाहिले; नष्ट शैशवस्मरण टवटवले.

निष्कलंक मुख, विस्तीर्ण भाळ तेजाळ,

तनुवर्ण धवल, करुणालय नयन रसाळ.

ती मातृदेवता उंच समोर करात

शिशु धरूनि होती तन्मुखदृक्‌सुख पीत.

या निखळ सुखाचा सहकारी प्रेमाचा

तो होता तिजला अंतरला जन्माचा.

दामिनीदामसम दारुणतर ते स्मरण

हदरवी स्फुरुनिया तदीय अंतःकरण.

ह्रदयाच्या दिसला खोल कपारी आत

शून्याचा अंधुक देश अपार अनंत;

दुःखाचा अन्तःप्रवाह वाहत होता,

ओलावा त्याचा स्फोट मुखी हो करिता.

पूर्णस्थ बिंदु म्रुदु गंधवाह हलवोनी

दो बिंदूंचे करि एकजीव मिळवोनी;

या विश्वकदंबी तेवि मातृबिंदूते

शिशुबिंदु मिळे जगदंबदयामृतवाते

आरक्तरेणुरविहास्य उधळले तिकडे,

ते उदित बालसुमहास्यपरागहि इकडे.

ते बालभानुपदलास्य नभावर चाले,

ते मातृह्रदावर चंचल शिशुपदचाळे.

पाहता प्रभाती बालजगा वर खाली

कृष्णस्मृति संपुनि मातृमुखी ये लाली,

सद्‌गदित ह्रदय तद्‌गात्रांसह थरथरले,

नेत्रातुनि अविरत वात्सल्याश्रु गळाले;

वात्सल्य दिसे ते बहुविध विश्वविकासी,

ते विश्वात्म्याचे विमल हास्य अविनाशी,

ते स्वार्थसमर्पण धन्य परार्थासाठी

प्रत्यक्ष निर्मिते स्वर्ग धरेच्या पाठी.


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

चाफा

चाफा बोलेना, चाफा चालेना,
चाफा खंत करी काही केल्या फुलेना ॥ध्रु०॥

गेले आंब्याच्या वनी

म्हटली मैनासवे गाणी

आम्ही गळ्यात गळे मिळवून.

गेले केतकीच्या बनी

गंध दर्वळला वनी

नागासवे गळाले देहभान.

आले माळ सारा हिंडुन

हुंबर पशूंसवे घालुन

कोलाहलाने गलबले रान.

कडा धिप्पाड वेढी

घाली उड्यावर उडी

नदी गर्जुन करी विहरण.

मेघ धरू धावे

वीज चटकन लवे

गडगडाट करी दारुण.

लागुन कळिकेच्या अंगा

वायु घाली धांगडधिंगा

विसरुनी जगाचे जगपण.

सृष्टि सांगे खुणा

आम्हा मुखस्तंभ राणा

मुळी आवडेना ! रे आवडेना !!

चल ये रे ये रे गड्या !

नाचु उडु घालु फुगड्या

खेळु झिम्मा, झिम्‌ पोरी झिम्‍-पोरी झिम्‌ !

हे विश्वाचे आंगण

आम्हा दिले आहे आंदण

उणे करू आपण दोघेजण

जन विषयाचे किडे

यांची धाव बाह्याकडे

आपण करू शुद्ध रसपान.

दिठी दीठ जाता मिळुन

गात्रे गेली पांगळुन

अंगी रोमांच आले थरथरून

चाफा फुली आला फुलून

तेजी दिशा गेल्या आटुन

कोण मी-चाफा ? कोठे दोघे जण ?


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

निवेदन

रम्य संध्येसम बालपल्लवांनी

मधुस्यंदी माकंदमंजरीम्नी

गुंफिलेल्या एकान्त निकुंजात

कूजनप्रिय रमतात खगव्रात !

मंद विचरे मधुमत्त गंधवात,

शान्ति विश्रमली ज्या स्थली नितान्त,

चाल कुंजी त्या; गूढ इंगिताला

कथिन तुज मी अव्यंग शुभांगीला.

दिशा उत्कंठित अंबर प्रसन्न,

उदय पावे शशिबिंब रसक्लिन्न;

रूप पाहुनि हे सृष्टिसूंदरीचे

स्तब्ध झाले चांचल्य निसर्गाचे

दिव्यगंगातीरस्थ वल्लरीला

मुकुल आले त्या एक निर्मलेला;

वाहुनी ते मद्भाग्यगंधवाहे.

दिले येथे आणून वाटताहे.

अपार्थिव जे संगूढ भाव चित्ती

व्यक्त संज्ञेने मात्र करू येती;

स्पष्ट करिता ते बळे, सर्व जाते-

कान्ति, मार्दव, सौरस्य त्यातले ते !

ओढ तत्रापि स्तब्ध बसू दे ना,

समुत्सुक मन संकल्प करी नाना,

भ्रमति ऐक्या विशयीच ते क्रमाने

रत्‍नसानु-ग्रहमालिकांप्रमाणे !

होय खळबळ जी अंतरी मदीय,

भ्रमणवेगाची तीव्रता तदीय

स्पंद ह्रदयाचे स्तब्ध निकुंजात,

काहिबाही करितील तुला ज्ञात !

कुंज आधी सम्मोहनीय भारी,

वरी रमणीसहवास मनोहारी !

भ्रान्त होउनि बरळेन जरी काही

दोष माझा तिळमात्र त्यात नाही !

नभी दोषाकर हा पहा उदेला,

भ्रंश मनुजाच्या पाडितो मनाला;

गोड इंदूचा आणि पिसाटाचा

सिद्ध आहे संबंध अनादीचा !


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

आशादेवी

झाली पश्चिम लाल लाल सगळी रक्तामधे माखुन,

गेली माजुन मानदर्पमदिरा बेहद्द ती प्राशुन;

प्रेतांनी भरले नभातिल दरेकोरे तयांच्यावर

मांसाच्या चिखलात मुक्त फिरते ही भैरवी भेसुर.

होती पूर्व ! उषासखी, गुणवती, सत्वाढ्य, तेजोवती,

जीचे नित्य मृदुत्व लज्जित करी जाईजुईशेवती;

ती हा प्राणिविनाश घोर बघुनी उद्विग्न झाली पुरी

शिंतोडे पडले अशुद्ध उडुनी तन्मंगलश्रीवरी.

रक्ते रंजित भोग काय करणे प्रीत्यर्थ त्यांच्या रणे ?

येथे सात्त्विक संपदा न मिळती का रक्तपाताविणे ?

आहे मानवजाति आक्रमित का उत्क्रान्तिपंथाप्रती ?

शंका त्रासविता अशा, दिसुनि ये तो चित्राकृति.

"होते सर्व सभोवती पसरले संदिग्ध श्यामाम्बर,

काळ्याशार ढगात थेट शिरता भूगोल हो गोचर;

तारा लोपुनि सर्व एक सरसा अंधार हो वाढता

तेथे पश्चिम पूर्व कोण कुठल्या ? सार्‍या दिशा आटता.

विश्वातील समस्त वस्तुमधले सौंदर्य जे जे असे,

नेत्रींच्या पुतळीकडून जपुनी वेचूनि घ्या ते कसे !

चित्ताची बनवून मूस, तुमच्या सत्कल्पनेच्या करे

ओता मूर्ति तुम्हीच, कारण गिरा लाजोनि येथे सरे !

भूगोलावर त्या अधिष्ठित अशी कोणी कुमारी असे,

रुपा आत नव्या छटा उफळता ’न्यारी’ खुमारी दिसे !

अंगांगे गळली, तशीच मळली खेदे मुखश्री, किती,

स्कंधिचा सरला जरी पदर तो नाही तिला शुद्ध ती.

आकांक्षा, असहायता, अबलता, चर्येवरी रेखले

होते भाव, तयास पाहुनि झणी पाणी मुखीचे पळे;

स्नेहस्निग्ध नसे तिची नजर, ती शून्याकडे लागली,

वाटे स्वप्नदशेत चूर सगळी वृत्ती तिची जाहली !

वीणा एक जवाहिरे जडविली होती, जियेच्या वरी

तारा सर्व तुटोनि एक उरली बाकी, तियेला जरी

होती छेडित ती तशीच बसली काढीत तारेतुनी

नाना सुस्वर मालिका, मृत मना चैतन्य दे तो ध्वनि !

हे चेतोहर चारुचित्र विरले त्या चारुगात्रीसह,

झाला जीव विषादजन्य ह्रदयग्लानीमुळे दुस्सह;

आहे सर्वविनाश ’आ’ करुनिया आता समीपशित,

यत्‍नाच्या परमावधीविण टळेना, तो असे निश्चित.

होते कार्य न हो, तरीहि पडल्या काळात या कष्टद

गाणे पूर्वपरंपरादि महती हे शुद्ध हास्यास्पद;

तेणे काय फसेल धूर्त जग हे वाटे असे आपणा ?

हे तो केवळ आत्मवंचन ! पुरे आता जुन्या वल्गना !

विज्ञाने निगमागमात असती किंवा पुराणातली,

ती तेथेचि असोनि द्या ! गरज ना त्यांची कुणा राहिली

शान्तिप्रेम समत्व पाठ नसते गाऊची द्या आजला,

जे का मोहनमंत्रबद्ध असती माझे कवी त्यांजला.

आहे हा व्यवहाररूप अखिल व्यापार जो जो दिसे,

हे आहे जर मान्य, कायम ठसे त्याचे घडावे कसे ?

निर्मावे जग अन्यथा, त्यजुनिया वस्तुस्थितीला सदा

राष्ट्रात्मा अति पंगु पोकळ बने तेणे; नसे फायदा.

आहे बाल्यदशा दिसंदिस जरी वाढीस हा लागला

चालू मानववंश, हे न समजा की पूर्णता पावला,

हा तो नित्य चुके, प्रसंग पडती बाके, सदा काळजी !

खात्रीचा न उपाय एक म्हणुनी योजू नये काय जी ?

आयांचेच नसानसात उसळे ते रक्त जे दुर्धर.

ना बाहेर न आत खास जगती आम्हास जे दुष्कर;

देऊ तोंड नवीन काळ जर हा होऊन आम्ही नवे,

येते पालटता अम्हांसहि पुढे आल्या स्थितीच्या सवे.

आहे जोवरि एक तंतु उरला वीणेवरी शाबुत,

आशा अद्‍भु रम्य बोल असले राहील तो काढित;

ती होऊनि निराश, उज्ज्वल तिची स्वप्ने लया पावती

रक्षो एक तदा दया भगवती आम्हा प्रभूचीच ती !


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

मनोहारिणी

पदन्यास लावण्यप्रान्ती ही करिते रमणी;

तारामंडित निरभ्रांबरी जशी रम्य रजनी !

शुभ्र कृष्ण वर्णातिल सारी मोहकता आली

नेत्री, गात्री, एके पात्री, ह्रदयंगम मेळी.

सम्मीलित ती कान्ति दिसे अति शान्त सरस नयना,

शशिकरंजित रजनीसम, जी प्रखर दिना ये ना.

उषा किरण, की अधिक झाक, जर या रूपी पडती

अनिर्वाच्य ती संगमशोभा अर्धी तरि जाती !

कृष्णकेशपाशावरी येती श्याम श्याम लहरी,

शुभ्र तेज मुखसरसिरुहावरि सुरुचिर लास्य करी.

मृदुमंगल मधुभाव आननी जे मुद्रित होती-

किती शुद्ध, किती रुचिर, उगम निज ते प्रस्फुट करिती

मृदुल कपोली हास्य मनोहर जे क्रीडा करिते,

भास्वत्‌ भाली शान्त तेज जे संतत लखलखते.

मूकचि त्यांच्या वक्‍तृत्वाने हिजविषयी पटते

साक्ष मनोमय पवित्र चारित्र्याची ह्रदयाते.

निर्वैर भूतमात्राच्या ठायी हिची चित्तवृत्ति

निर्व्याज प्रेमलभावाची ही रमणी मूर्ति.


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

आम्ही

अस्ताव्यस्त इतस्तता पसरली हाडे, युगे लोअली,

होते कोण कसे न आठवण ही कोणा जरा राहिली;

गोळा होउनि ती पुनश्च उठती, शून्ये बसू लागती,

होते कोण, किती असे जगऋणी, प्रत्यक्ष ते सांगती.

हे फुंकीसरसे घडोनि आमुच्या एकाच ये अद्‌भुत,

सामर्थ्ये पुरवीत आजवरती आलो जगा शाश्वत;

अंगा फासुनि राख खंक बनलो आम्ही फिरस्ते जरी,

आज्ञा केवळ एकटीच अमुची राणीव विश्वी करी.

श्रीरामात पहा प्रताप अमुचा, ऐश्वर्य कृष्णी पहा,

रुद्री उग्र कठोरता, सदयता बुद्धात साक्षात पहा;

ते आम्हीच महंमदास दिधली खैरात पैगंबरी,

ते कारुण्यहि आमुचेच उठवी जे ख्रिस्त मेल्यावरी.

भावी सत्कवि, ते चिकित्सक पटु, प्रख्यात अध्यापक

मंत्री नाविक वीर दार्शनिक ते व्युत्पन्न वैज्ञानिक;

आहे ह्या घडवीत आज अमुची चिच्छक्ति या भारती

मत्तां मर्दुनि द्यावया अभयता संत्रस्त भूताप्रति.

हिंदूस्तान पहावयास अमुच्या नेत्रे शिका, या कसे,

रोखायास तुम्हांस शक्ति मग या जंजाल काला नसे !

होते सृष्टि नवी, कलेवर जुने टाका, तुम्ही व्हा तसे,

हे ना होय तरी मरा ! न तुमची कोणास पर्वा असे !


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ