माणूस

घरांनीं आपलीं दारें बंद केलेलीं असतात, 
डोळ्यांना वेढून बसलेल्या अस्तित्वांच्या 
रांगाही निवून जातात.

वैराण आणि एकाकी आकाशाच्या 
पार्श्वभूमीवर संथपणानें हा जात असतो.... 
त्याच्या चेहऱ्यावर कदाचित् कमळांचीं 
सरोवरें उगवली असतील....

परंतु इतक्या लांबून तीं दिसत नाहींत. 
त्याच्या पावलागणिक माझ्या गीतांचीं 
शक्लें होऊन रस्तोरस्तीं सुरांचीं

कारंजी उडतात, आणि तुझ्या-माझ्यापासून 
निघालेला हा दुःखाचा काळोख, केवळ 
त्याच्या निसटत्या स्पर्शानंहि पैंजणासारखा 
रुणझुणत वाहूं लागतो....

इन्ग्रिड बर्गमन्

आषाढांतील भर्जरी मेघांसारखे पूर्ण ऐहिक डोळे 
घेऊन तूं आलीस; नेस्तनाबूत झालेल्या या साथीच्या गांवांत.
विश्वरचनेंतील बर्फाचा शुभ्र पहाडी अहंकार 
या गांवांत आणून सोडलेला....
जशा अनेक बाबी किंवा अरण्यांतील निर्मनुष्यतेच्या
पारावर पडलेलीं हजारों फुलें...
हजारों फुलें तशीं हजारों घरें या अनामिकांच्या प्रदेशांत 
तुझा घोडा तूं मोकळा सोडलास
शिशिराच्या निर्विघ्न कुरणांत....
तो मध्येच दिपून पाहतो, एका नसलेल्या ध्रुवाच्या
दिशेत झिजणाऱ्या तुझ्या देहास.
तुला वाटतात तितके सोपे नसतात तुझे अश्रू
पाण्याच्या सलील संभ्रमांत हलतात जखमी 
ख्रिस्ताच्या घंटा रात्रंदिवस....
गांवावर सांचलेल्या बर्फातून अज्ञात निनादांची 
महापर्वणी जाऊं लागते.
तसें माझ्या झोळींत कांही नाही; जाण्यायेण्याच्या
चित्रलिपित झाडांचा एखादा संगमरवरी सांगाडा, 
तोही चांदण्यांनी शोषून घेतलेला....
फक्त एवढेंच : निःशब्द भासांच्या कांठाला लटकलेलें 
हें स्टेशन आणि संवेदनांच्या आवर्तना झुगारून 
कोण्या मावळत्या संताला तूं दिलेलें
एकाकी आलिंगन.

अंगाईपण

मी अशांत सावलीनें चालणारा
भावसंमोहन जळत आहे माझें 
मावळतीच्या निवान्त क्षितिजावर....
दुःखाचें अभिजात शिल्प उभारशील का
पारदर्शक मरणांत....

सायंकाळ येते तुझ्या उदास
दुःखासारखी
दोन देहांचा एक आकार घेऊन आपण 
चालूं लागतों.... भयाण इमारतींच्या 
भावगर्भांत....

उगीचच वाटत असते तुलाहि आणि मलाहि, 
पाय ठेवूं तेवढी भूमि घसरून पडेल.... 
तरीहि वाट हात जोडून उभी असते. 
हवी असते वाऱ्यालाहि इतक्यांत अंगाई
म्हणून मांडतों मीही ; कमळांच्या पानांवर 
टिंबांचा खेळ....
तुला निजविण्यासाठीं सांगितलेली एक कथा....

गांव

आभाळ जिथें घन 
गर्जे तें गांव मनाशीं निजलें 
अंधार भिजे धारांनी
घर एक शिवेवर पडलें....

अन् पाणवठ्याच्या पाशीं 
खचलेला एकट वाडा 
मोकाट कुणाचा तेथें
कधिं हिंडत असतो घोडा....

झाडांतुन दाट वडाच्या
कावळा कधींतरि उडतो
पारावर पडला साधू 
हलकेच कुशीवर वळतो....

गावांतिल लोक शहाणे 
कौलांवर जीव पसरती 
पाऊस परतण्याआधीं
क्षितिजेंच धुळीनें मळती....

चांदणें

दिशांनी मला आज रंगांध केलें 
कुण्या मंद तंद्रीत रे साजणा 
फिरे हात मेघांवरी सारखा अन् 
तुटे शुभ्र संवेदनेचा कणा...

निळ्या अंतराळांतुनी खोल येतात 
संज्ञेत वाळूतलीं अक्षरें
जशीं दूरचा खंड सोडून आलीं 
इथें दाट शोकांतलीं पाखरें.....

कुशीला फुटाव्या कधीं चंद्रवेली 
पुढें पृथ्विबिंबांतले आरसे 
तुझ्या स्पर्शगांधार शैलींतलें शिल्प 
स्वप्नांत माझ्या हंसावें जसें .....

पायांतल्या शुष्क पानांतुनी 
जीर्ण पारावरी शब्द एकांतले 
घरे बांधण्याला कुठें झाड नाही 
तसे पक्षि सोडूनिया चालले....

घुमावी मुक्की हांक यावी पुन्हा 
भव्य घुमटांत अंधारलीं स्पंदनें 
तुटे एक तारा तसा अस्त माझा 
सुखाला तुझ्या ने कुठें चांदणें....

आठवण

या व्याकुळ संध्यासमयीं 
शब्दांचा जीव वितळतो 
डोळ्यांत कुणाच्या क्षितिजें.... 
मी अपुले हात उजळतों.

तूं आठवणींतून माझ्या 
कधिं रंगित वाट पसरशी 
अंधार - व्रताची समई
कधिं असते माझ्यापाशीं....

पदराला बांधुन स्वप्ने 
एकट संध्यासमयीं 
तुकयाच्या हातांमधला 
मी अभंग उचलुन घेईं...

तूं मला कुशीला घ्यावें
अंधार हळू ढवळावा.....
संन्यस्त सुखाच्या कांठीं
वळिवाचा पाऊस यावा.....

स्वप्न

शापच आहे मला संगमरवरांत स्वप्न 
लपवून ठेवण्याचा.
पांडुरंगाच्या चरणाला प्रक्षाळण करणारी 
चंद्रभागा मी पाहिली नाहीं, आत्मसंवादाची
हीच प्रचीति आली माऊलीच्या उरावर 
पाय ठेवतांना.
शापच आहे मला संगमरवरांत स्वप्न
लपवून ठेवण्याचा.
प्राणांचें मोल देऊन मुक्ति विकत घेत
असतों मी ; देहूच्या बाजारांत अभंग 
विकणाऱ्या तुकारामाप्रमाणें - शापच आहे 
मला संगमरवरांत स्वप्न लपवून ठेवण्याचा. 
चाहुलवेड्या वाटुलीच्या प्रतीक्षेत चरणगंधाच्या 
स्मृतीचें फूल उमलतांना पाहिलें नाहीं मी, 
वाचली नाहीं सांद्र तमगारांत काजव्यानें
रचलेली प्रकाशगाथा ; पण फुटलेल्या
डोळ्यांच्या नीरांजनांत तुला ओवाळणारी शिळा
पाहिली आहे रे....
शापच आहे मला संगमरवरांत स्वप्न
लपवून ठेवण्याचा.