श्रीगणेशास 'मंगलमूर्ती' का म्हणतात ?


पूर्वी अवंती नगरात भारद्वाज नावाचा वेदशास्त्रनिपुण ऋषी रहात होता. एके दिवशी क्षिप्रा नदीवर तो स्नानासाठी गेला असता जलक्रीडा करीत असलेल्या एका अप्सरेस पाहून तो कामातूर झाला आणि त्यांचे वीर्य पृथ्वीवर पडले. पृथ्वीने ते आपल्या उदरात धारण केले.
यथावकाश त्या रेतापासून पृथ्वीने एका जास्वंदी फुलाप्रमाणे तांबड्या त्याच्या पुत्रास जन्म दिला आणि त्याचे पालनपोषण केले. हा पुत्र कुमारवयात येताच त्याने आपल्या मातेस प्रश्न केला “माते, माझे शरीर इतर मानवांप्रमाणे असूनही माझ्या अंगाचा रंग इतका तांबडा कसा?” तेव्हा पृथ्वीने त्याला त्याचे जन्मवृत्त कथन केले. ते ऐकून त्याने पृथ्वीकडे पित्याजवळ राहण्याची इच्छा प्रकट केली. तेव्हा पृथ्वी त्याला भारद्वाजऋषीकडे घेऊन गेली. भारद्वाजऋषीने आपल्या या पुत्राचा (भूमीपुत्र) स्वीकार केला आणि त्याचे नाव, ‘भीम’ ठेवले. पुढे शुभदिवस पाहून त्याचे उपनयन करुन त्याला वेदशास्त्र शिकविले. तसेच श्रीगणेशाच्या मंत्राचा उपदेश करून जप करण्याची आज्ञा केली पित्याच्या आज्ञेवरून भीमाने नर्मदा नदीच्या काठी जाऊन तपश्चर्या सुरू केली.
नर्मदा नदीकाठी एक हजार वर्षे श्रीगणेशाच्या मंत्राचा जप केल्यावर गजानन माघ शुद्ध चतुर्थी दिवशी त्याला प्रसन्न झाला आणि भीमास गजाननाने साक्षात दर्शन देऊन वर मागण्यास सांगितले. तेव्हा भीमाने ‘मला स्वर्गामध्ये राहून अमृतप्राशन करण्याची इच्छा अहे. तसेच माझे नाव त्रिभुवनात प्रसिद्ध व्हावे आणि ज्या माघ शुद्ध चतुर्थीदिवशी तुम्ही मला प्रसन्न झालात. ती चतुर्थी सर्वांना कल्याणकारी होवो.’ असा वर मागितला.
भीमाचे हे बोलणे ऐकून गजाननाने ‘तुला देवांसह अमृतपान कराव्यास मिळेल. तुझे ‘मंगल’ असे नाव प्रसिद्ध होईल. तुझ्या नावावरूनच मला लोक ‘मंगलमूर्ती’ म्हणून ओळखतील. तुझा रंग अंगाराप्रमाणे लाल असल्याने चतुर्थीस ‘अंगारकी चतुर्थी’ असे म्हणतील. या चतुर्थीचे व्रत करणाऱ्यास एकवीस संकष्टीचे व्रत केल्याचे पुण्य मिळेल.’ असा वर भीमास दिला. अशा प्रकारचा वर देऊन गजानन गुप्त झाला असता मंगलाने त्या ठिकाणी उत्तम प्रकारचे देवालय बांधिले आणि त्यात सोंड व दहा हातांनी युक्त अशी गणपतीची सुंदर मूर्ती स्थापिली. त्या मूर्तीचे नाव मंगलमूर्ती असे ठेविले.
तेव्हापासून श्रीगणेशास लोक‘मंगलमूर्ती’ म्हणू लागले आणि मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीच्या दिवशी गणपती अंगारकास प्रसन्न झाले. म्हणून मंगळवारी येणाऱ्या ‘अंगारकी म्हणतात. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा