मौनातच अर्थ सारे

नजरा नजर होताच आमुची
चाफेकळी सम ती फुलली होती
ओठांवरती स्मित हास्य पसरले
लाजून नजर अन तिने चोरली होती ….

केतकी चेहरा तिचा
गुलाबापरी रंगला होता
गजरयातल्या जाईचा सुगंध
माझ्यापर्यंत पोचला होता ……

नजर झुकलेली अन
चालीचा वेग मंदावला होता
मोगरा लावण्याचा
नखशिखांत बहरला होता …..

इच्छा असली मनात जरी
नजर तिने उचलली नव्हती
कसलीही रीत लाजण्याची,
कुणाची तरी का भीती होती ?…..

हिरावू नकोस प्रिये तू,
भाग्यातला हा क्षण एकदाचा
तुझ्या डोळ्यात पाहू दे ग मला,
तरल भाव तो प्रेमाचा ……

हलकीच उमलली पापणी हिमतीने शेवटी
बांध तुटले संयमाचे
शब्दात कसे तरी सांगू मित्रहो,
अबोल भाव ते प्रीतीचे ……

नजरेचा कट्यार तिच्या
काळजात हळुवार घुसला होता
गुलाबाचा काटा मनात
कुठेतरी खोलवर रुतला होता……..

स्तब्द्ध होते विश्व भोवतीचे
धुंद होते भाव सारे
नजरेचीच फक्त भाषा
अन मौनातच अर्थ सारे …….


ऋषिकेश पाटील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा