प्रेमासाठी वेचलेले

प्रेमासाठी वेचलेले मी,या ओंजळीत चांदण्यांना
व्यक्तच केले नाही कधी अंतरीच्या अबोल भावनांना .

उडाली पाखरे घरट्यातुनि , साद घालती भविष्याला
मनी सतत तिच्याच आठवणी,दोष का वेड्या मनाला ?
ओढ कसली तरी अनामिक,आठवणींच्या रेशमी धाग्यांना ……….. १

भेटली अशीच ती पर्वानंतर,वाचा फुटली नजरेला
वेचला होता मकरंद आपण एकाच प्रेम-फुलातला
चोरुनी नजरा तिने दिली कबुली, हवास तूच या डोळ्यांना !! ……..२

शब्दही सुचले सूरही जुळले, गावे कसे या गीताला ?
व्यक्त करावे प्रेम कसे ? उत्तर नसते या कोड्याला
अडखळली परत ही वाचा म्हणून, कवितेत उतरविले शब्दांना ………..३

प्रेमासाठी वेचलेले मी , या ओंजळीत चांदण्यांना
व्यक्तच केले नाही कधी अंतरीच्या अबोल भावनांना .


- ऋषिकेश पाटील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा