कुब्जा

अजुन नाही जागी राधा
अजुन नाही जागे गोकुळ
अशा अवेळी पैलतिरावर
आज घुमे का पावा मंजुळ ॥ १ ॥

मावळतीवर चंद्र केशरी,
पहाटवारा भवती भणभण
अर्ध्या पाण्यामधे उभी ती
तिथेच टाकून आपुले तनमन ॥ २ ॥

विश्वच अवघे ओठा लावुन
कुब्जा प्याली तो मुरलीरव
डॊळ्यामधले थेंब सुखाचे
हे माझ्यास्तव, हे माझ्यास्तव ॥ ३ ॥


कवियत्री : इंदिरा संत (१९७५)
गायिका: सुमन कल्याणपूर
संगीतकार: दशरथ पुजारी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा