चिमणा राजा

गृहराज्यावर गाजवि सत्ता राजा चिमणा एक
जन्मजात हा! नको कराया यास कुणीं अभिषेक! ।।१।।

कटि आईची मृदुल आपुलें सिंहासन बनवून
मधुर बोबड्या अस्फुट वचनीं सोडि हुकूम तिथून ।।२।।

बसावयाला सुंदर घोडा त्यास असे काठीचा
परि आवडता अधिक त्याहुनी ताईच्या पाठीचा! ।।३।।

त्या घोड्यावर डौलें बैसे, चाबुक नाजुक हातीं
सहल करोनी देखरेखही ठेवी राज्यावरतीं ।।४।।

राजदंड जड राजे दुसरे वागविती स्वकरांत
मनें दुज्यांची मुठींत परि हा ठेवितसे दिनरात! ।।५।।

मृदुल करांची मिठी सोडवूं येइ न मल्लांनाही
अमोघ याची शक्ति यापरी, उपमा कसली नाहीं ।।६।।

पराभवाचें लक्षण दिसतां रुदनास्त्रा सोडीत
प्रबल शत्रुही मग त्यायोगें सहजचि होई चीत!।। ७।।


कवी - दामोदर अच्युत कारे

६ टिप्पण्या:

  1. फार गोड कविता आहे. माझ्या मामाने माझ्या नातवासाठी म्हणुन दाखवली होती. तेव्हापासून मला ही संपूर्ण कविता हवी होती. धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. कवी श्री दामोदर कारे यांच्या एका उत्तम कवितेवर comment टाकून त्यांच्या इतर साहित्याची मीच चौकशी केली आहे.
      माझे नाव सुधांशु वझे असून माझा email id smvaze@gmail.com आहे.

      हटवा
  2. अप्रतिम कविता आहे. काळ बदलला तरी, ही कविता आणि त्यात केलेले वर्णन आणि भाव नक्की कायम राहील.
    कवी श्री.दामोदर कारे यांचे अभिनंदन.त्यांच्या इतर साहित्याची माहिती कृपया शेअर करा.

    उत्तर द्याहटवा
  3. दा. अ. कारे यांचा नंदादीप हा कवितासंग्रह १९३४ साली प्रसिद्ध झाला. प्रख्यात समीक्षक वा. म. जोशी यांनी या संग्रहाला विवेचक प्रस्तावना लिहिली आहे. नंदादीप मधील कवितेतील सात्त्विक भावना, कल्पनाविलास, अकृत्रिम निसर्गभक्ती आणि अंत:करण पुर्वकता या गुणांचा त्यांनी गौरव केलेला आहे. वि. स. खांडेकर आणि वा. रा. ढवळे यांच्यासारख्या विचक्षण वाङ्मयोपासकांनी या काव्यसंग्रहाचा सहृदयतेने परामर्श घेतला आहे. या संग्रहातील ‘नंदादीप’ या कवितेत कविमनाची ऋजुता आणि उत्कटता नेमकेपणाने आणि नीटसपणे व्यक्त झाली आहे. यातील बहुतांश कविता निसर्गवर्णनपर आहेत. यासंदर्भात ‘उष:काल’, ‘सागरास’, ‘पावसाळ्यातील दृश्य’, ‘शिखरावरून’, ‘चांदणे’, ‘हिमालय’, ‘प्रभात-पूजा’, ‘सृष्टीच्या अंगणात’, ‘बिजेची कोर’, ‘दुपार’ आणि ‘चंद्रकिरण’ या कविता उल्लेखनीय आहेत. ‘गोमन्त देवी’ या कवितेत गोमंतकाचे निसर्गवैभव तन्मयतेने वर्णिलेले आहे. ‘उष:काल’ या कवितेत निसर्गलय आणि मानवी भावभावनांची लय यांची समतानता साधली आहे. ‘सागरास’ या कवितेत कवीला असीम, अथांग सागर पाहून मानवी हृदयाची क्षुद्रता जाणवते. ‘चांदणे’ या कवितेत इंदू उदयाला येताना चारुता घेऊन आलेला आहे असे कवी म्हणतो. या कवितेतील भावनाशय अत्यंत आल्हाददायी आहे. ‘हिमालयास’ या कवितेत केवळ निसर्गवर्णन नाही. त्याच्या बाह्यसौंदर्याबरोबर तो भारतीय संस्कृतिसंचिताचा मानदंड आहे असे त्याला वाटते. कवीने प्रेमभावना व्यक्त करणाऱ्या मोजक्याच कविता लिहिल्या आहेत. ‘अलक्षित प्रेम’, ‘मधुर तृप्ति’, ‘लाजरी’, ‘संगीत परिणती’, ‘यौवनजागृती’ आणि ‘सख्या रे, ये आता धावून’ या कवितांत प्रीतिविश्वातील मुग्ध भावनांचा संयत स्वरात कवीने आविष्कार केलेला आहे. ‘आत्मयज्ञ’ या कवितेत स्वातंत्र्याविषयीची आकांक्षा कवी उत्कटतेने व्यक्त करतो. ‘महात्म्यास’ या कवितेत गांधीजींच्या जीवितकार्याचा मुक्तपणे गौरव केला आहे.

    दा. अ. कारे यांच्या कविता लोकशिक्षण, प्रतिभा, ज्योत्स्ना, वागीश्वरी, पारिजात आणि रत्नाकर या नावाजलेल्या नियतकालिकांतून प्रसिद्ध झाल्या. कवितेशीवाय काही लघुनिबंध त्यांनी लिहिले. थोडेफार समीक्षात्मक आणि संशोधनात्मक लेखनही त्यांनी केले. ‘घन:श्याम सुंदरा’ ही भूपाळी होनाजी बाळा यांची नसून गोमंतकीय कवी विठ्ठल केरीकर यांची आहे हे त्यांनी सप्रमाण सिद्ध केले आहे. दा. अ. कारे जुन्या पिढीतील कवी असले तरी कवितेतील नव्या प्रवाहांकडे स्वागतशील दृष्टिकोनातून ते पाहत होते. दा. अ. कारे यांच्या सदभिरुचीसंपन्न व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक पैलू म्हणजे त्यांची सामाजिक बांधिलकी आणि शिक्षणविषयक आस्था होय. त्यामुळेच गोव्यातील मडगावच्या समाज सेवा संघाच्या महिला आणि नूतन मराठी विद्यालयाच्या व्यवस्थापनाशी अनेक वर्षे ते निगडीत होते. गोमंत विद्या निकेतन या नामवंत संस्थेशी त्यांचा अत्यंत निकटचा संबंध होता. गोवामुक्तीनंतर १९६२ साली पणजी येथे भरलेल्या ११ व्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्षपद त्यांनी भूषविले. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी या संमेलनाचे अध्यक्ष होते.

    गोव्यातील मडगावला त्यांचे निधन झाले.

    संदर्भ : कामत, श्रीराम, पांडुरंग (संपा.), मराठी विश्वचरित्र कोश, विश्वचरित्र संशोधन केंद्र, पणजी (गोवा), २०००.

    उत्तर द्याहटवा