रूपमुग्धा

सौंदर्याचा लीलासागर लागे हालायाला

निज लावण्योदक देखावे-इच्छा झाली त्याला.

प्रतिबिंबित आपल्या पहावी सृष्टीची व्यभिशोभा

प्रबल ओढ ही रूपसागरा त्या चढवी प्रक्षोभा.

स्वयंप्रभा अवलोकायाची जरि आवड हो त्याला

'दुजे' करुनि लागते पहावे त्याही अप्रतिमाला !

पुढे आरसा ठेवुनि बसली नवबाला एकान्ती

प्रकाश पाडित होत्या तेथे उज्ज्वल दीपज्योति.

असामान्य सौंदर्य कसे ते ज्या जग हे वाखाणी

देखायाते इच्छित होती रूपगुणाची खाणी.

स्वच्छ आरशाच्या भूमीवर प्रतिमा बिंबित झाली

लावण्याच्या कोवळिकेवर पोरचि मोहुनि गेली !

मंत्रबळे मांत्रिके करावे मंत्रबद्ध इतराला

तो संमोहनमंत्र उलटला, स्वयं बांधला गेला !

मूर्ति मनी संकल्पे होती काय उभी, अभिरामे ?

ह्रदयाचे सिंहासन बघता दिसते शुद्ध रिकामे !

वस्तूच्या निरपेक्ष असे जे भावरूप सौंदर्य

काय चालले असे तयाचे हे तव चिंतनकार्य ?

करी कल्पना सौंदर्याची सुहास्य जे अव्याज

सुरम्यतेचा तेच चढविते त्या वस्तूवरि साज.

तिरस्कार कधि प्रेम, रुष्टता कधि आकुलता, कोप

उमटुनि ते अनुरूप चालती अंगाचे विक्षेप.

ओष्ठ, भ्रू, कर कधी मोडिशी, स्थिर कधि चंचल दृष्टि

क्षणोक्षणी निर्मिशी विलक्षण नूतन अभिनयसृष्टि !

रंगविकारांचे उमटुनि हो तव सुतनूवरि मेळ

संगे त्यांच्या खेळतेस का तू हा अद्‍भुत खेळ ?

नेत्रातिल तेजाची कलिका इकडे तिकडे नाचे

जीवभाव एकत्र होउनी त्या त्या ठायी साचे.

सभोवार तेजाची निर्मळ चादर पसरत जाते

जीव उडी घे त्या मृदु शय्येवरती लोळायाते.

प्रसन्नतेचा प्रशान्त शीतल तेजोनिधि कोंदाटे

जीव सारखा पोहत डुंबत राहो त्यांतचि वाटे !

सूक्ष्म नेत्रकिरणांते घेउनि विणले वस्त्र नवीन

"मोल काय ते सांग" - पुसाया सौदागर तरि कोण ?

सौंदर्याच्या या स्फुरणाते पाहुनि प्रत्यक्षाते

साहित्यातील रसभावांचे व्यर्थ प्रदर्शन होते !

फुटे आरसा, स्वप्न उडाले स्पष्ट वाजता 'खट्ट'

मुक्तांगावर स्खलित पदर घे सावरूनि ती घट्ट !

सभोवार भयचकित लोचने पहात उठली पटकन्‌

रागात्मक भावाचे तुटले नाजुक सूत्रह तट्‌कम्‌ !

जन्मा येउनि एकवेळ हा पर्वकाळ साधावा

पूर्णोदय 'नारीतत्वाचा' भाग्ये अवलोकावा !

रसास्वादनाचित विषयांचे केवळ करिता येते-

स्वसंवेद्य आस्वादन; तेथे वाचा स्तंभित होते !


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा