एक दृश्य

विदर्भात डोंगरात आहे गाव नाव बुलठाणे

वनलक्ष्मीच्या शृंगाराचे एक अमोलिक लेणे !

गावाच्या उत्तरेस आहे जवळचि डोंगर मोठा

द्वारपाळ हा कडा पहारा देउनि रक्षी वाटा !

तिकडे वस्तीपासुनि लागे उतरण काही थोडी

चढत लागते पुढे जराशी जाया उंच पहाडी.

त्या उंचावर आहे मोठा एक कडा तुटलेला

दृष्टि देखणी एकवटे ती शोभा निरखायाला

पायाखाली उंच कड्याच्या गोलाकार दरी ती

पश्चिमेस मुख करुनि दूरवर घसरत गेली होती.

सायंकाळी एके दिवशी नित्याच्या परिपाठी.

सहज निघालो व्यवसायाच्या श्रमपरिहारासाठी.

त्या रमणीय स्थळी पातलो, जाउनि वरती बसलो

सृष्टीचे ते दृश्य पाहता विसरुनि मज मी गेलो !

सूर्यबिंब सारखे धावते अस्तगिरीच्या संगा

निजैश्वर्यरंगे अभिषेकी ज्योतिर्मय महिलिंगा !

रविबिंबाचे रूप घेउनी वाटे की, अनुरागे

नील नभाची, धवल घनांची रंजित केली अंगे !

रक्तवर्ण पर्वती रंगि त्या वस्तुजात रंगे

शुचिर्भूतही तसाच होई त्यांच्या अनुषंगे.

दृष्टिपथी ये एकाएकी दरीवरिल आकाशी

ताम्रछटामिश्रित रंगाचा एक कृष्ण पक्षी.

आला कोठुनि कळले नाही निज गति कुंठित करुनी

पक्षद्वय निज पसरुनि सुस्थिर राहे निश्चल गगनी !

दृष्टि करुनि एकाग्र नेहटुनि पाहे रविबिंबासी

व्रताचरण करितसे उग्रतर काय विहग वनवासी ?

चलित स्थिति होता त्याची तो एक घेउनी गिरकी

तीव्र चिरत्कारे स्थिर होउनि बिंब पुन्हा अवलोकी.

नवलाचे ते दृश्य पाहता वेध लागला चित्ता

चाहुल नसता एकाएकी प्राप्त होय तन्मयता !

तन्मयता ती चिंत्य वस्तुच्या खोल अंतरी शिरते

बहिरंगाच्या वरते नुसते फेर घालित नसते !

मला वाटले, झेप घेउनी उंच नभाच्या भागी

पक्षी लोपुनि खरोखर स्थिर झालो त्याचे जागी !

पृथ्वीवर जड शरीर सोडुनि झालो गगनविहारी

त्या पक्षासम करू लागलो त्याची अनुकृति सारी.

व्हावे स्थिर मग गिरकी घ्यावी, रक्तबिंब लक्षावे,

असे चालले किती वेळ ते नाही मजला ठावे !

अज्ञानातुनि पक्षी आला, गेला; मीहि निघालो

पद न लागता भूमीला मी वरवर चालत आलो !

शरीरात असती तत्त्वे का जी जाणिव घेवोनी

अंतराळमार्गाने जाती त्वरित इच्छिल्या स्थानी ?

विचार करिता प्रश्न सुटेना, हुरहुर चित्ती लागे

झोपेतही तेजाळ दृश्य ते लागे माझ्या मागे !


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा