कविता

 विदर्भ गीत – डा. निलेश हेडा


आलापल्ली एटापल्ली

नाही जंगलाची वाण

शेती पिकवते मोती

आहे समृद्धीची खाण.


काट्याकुट्यातुन वाहे

मायी काटेपुर्णा माय

वरदेच्या या पाण्याला

आहे अमृताची साय.


मेळघाटातुन वाहे

नवी नवरी सीपना

इथे मोरणेच्या काठी

पावा वाजवी किसना.


विपुल दर्भाच्या प्रदेशा

तूच “कठाणीला” पोसं

दुध दुभत्याची गंगा

कोणी राहु नये ओसं.


तुकड्याच्या प्रार्थनेत

वसे गावातली गिता

गाडगेबाबाची कहाणी

सांगे गावो गावी विठा.


ग्रेस, भट, उ.रा. गिरी

ना.घ., वाघ वाचे गाथा

शब्द खेळती अंगणी

इथे टेकवावा माथा.


आमचा “मुसळे” वाहतो

नव्या कथेची “पखाल”

कंचनीच्या महालात 

ना. घ. वसतो सताडं.


सातपुड्याच्या संगती

माहुराचा गड शोभे 

पाड्यापाड्यातुन येथे

कोरकुचा डफ वाजे.   


बाबासाहेबाने दिला 

इथे मानुसकीचा धर्म

दिक्षाभुमीच्या तिर्थाने

शिकवले आम्हा कर्म.


गोंड राजांचे मावळे

आम्ही सुराज्य उभारु

अन विदर्भाचा झेंडा

अटकेच्या पार रोऊ.


निलेश हेडा


नोट

कठाणी – गायीचं एक वाण

ना. घ. – सुप्रसिद्ध कवि ना.घ. देशपांडे

मुसळे – सुप्रसिद्ध कादंबरीकार बाबाराव मुसळे

पखाल - बाबाराव मुसळेंची एक कादंबरी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा