कालाय तस्मै नमः...


परवा कुठल्यातरी स्पोर्ट्स चॅनलवर 100 मीटर ची पळण्याची शर्यत पहात होतो. त्यातील विजेता हार्डली काही सेकंदाच्या फरकाने ती शर्यत जिंकला. मी माझ्या धाकट्या मुलाला विचारलं की तो किती फरकानं जिंकला रे, तर तो म्हणाला 3.2 मिली सेकंदानं जिंकला. मी त्याला विचारलं की अजून कुणी त्यापेक्षा कमी फरकानं जिंकलाय का ? तो म्हणाला त्याला माहित नाही पण एखादा जिंकला असेल, तर तो फरक काही मायक्रो सेकंदाचा असेल. मी त्याला परत विचारलं त्याहूनही कमी फरकाने कोणी जिंकलं असेल का, ह्यावर मात्र त्यानं मला एक टिपिकल लुक दिला आणि म्हणाला बाबा तुम्हाला काय म्हणायचंय? मी त्याच्या लूक कडे पूर्णपणे दुर्लक्ष करून म्हणालो, की सेकंदाच्या कितव्या भागापर्यंत टाईम मोजता येतो किंवा टाईम मोजू शकतो? ह्या साठी मी विचारतोय ह्यावर मात्र त्यानं ताबडतोब "अलेक्साला" हाक मारून मला डिटेल्स दिली. ती म्हणजे मिली, मायक्रो, नॅनो, पिको, फेमटो, अटो, झेप्टो आणि योक्टो सेकंद. ते पाहून मी त्याला म्हणालो, अरे लेका ही तर डेसिमल युनिट्स आहेत. त्या सेकंदाच्या प्रत्येक भागाला काय म्हणतात ? त्यावर तो म्हणाला बाबा, आत्ताच्या जमान्यात आपण हे इथपर्यंत मोजू शकतोय ते बघा ना उगाच काहीही काय विचारताय ? सेकंदाच्या पलीकडं तुम्हाला देखील माहितीय का ? त्यानं आव्हानात्मक सुरात मला विचारलं. मी पण कॉन्फिडेंटली त्याला म्हणालो येस, मला माहितीय, रादर मी परवाच वाचलं, तुला माहीत करून घ्यायचंय की आपल्या पूर्वजांना 'टाईम' किंवा 'कालाची' सुक्ष्मता किंवा महानता किती माहिती होती ? ती सुद्धा 5000 वर्षांपूर्वी! हे ऐकल्यावर त्याच्या डोळ्यांत मला अविश्वास दिसला, पण मी कॉन्फिडेंटली सांगतोय म्हंटल्यावर त्यानं होकारार्थी मान डोलावली.


मी म्हणालो, हल्ली पुराणातली वानगी (वांगी ?)पुरणातच राहू दे असंच म्हणायची फॅशन झालीय. पण वेदांमध्ये, महाभारतात किंवा श्रींमद्भागवतात अगदी व्यवस्थित माहिती दिलीय, फक्त ती अंधश्रद्धेचा चष्मा बाजूला ठेऊन नीटपणे बघायला हवी. असो, अनायासे आलेली संधी मी थोडाच सोडणार होतो, शिवाय आपल्या वैदिक (हिंदू नव्हे) परंपरेबद्दल अधिक माहिती करून देण्यासाठी ची ही सुवर्ण संधीच होती. मग मी त्याला म्हटलं हे बघ, आपण एक दिवस म्हणजे 24 तासा पासून सुरु करू.


तर 24 तास म्हणजे 8 प्रहर म्हणजे 1 अहोरात्र

1 अह म्हणजे 1 रात्र म्हणजे 12 तास किंवा 4 प्रहर

1 प्रहर म्हणजे 3 तास किंवा 6 नाडीका

2 नाडीका म्हणजे 1 तास किंवा 60 मिनिटे किंवा 1 मुहूर्त

1 नाडीका म्हणजे 30 मिनिटे किंवा 15 लघु

1 लघु म्हणजे 2 मिनिटे किंवा 120 सेकंद म्हणजे 15 काष्ठा

1 काष्ठा म्हणजे 5 क्षण म्हणजे 8 सेकंद

1 क्षण म्हणजे 3 निमेष म्हणजे 1.6 सेकंद

1 निमेष म्हणजे 3 लव म्हणजे 0.53 सेकंद

1 लव म्हणजे 3 वेध म्हणजे 0.17 सेकंद

1 वेध म्हणजे 100 त्रुटी म्हणजे 0.056 सेकंद

1 त्रुटी म्हणजे 3 त्रसरेणू किंवा 0.00057 सेकंद

1 त्रसरेणु म्हणजे 3 अणु म्हणजे 0.00019 सेकंद

1 अणु म्हणजे 2 परमाणू म्हणजे 0.000063 सेकंद

1 परमाणु म्हणजे 0.000032 सेकंद अर्थात सेकंदाचा बत्तीस दशलक्षांवा भाग.


महाशय अतिशय लक्षपूर्वक ऐकत होते त्यामुळे त्यांची विस्फारित नजर आणि वासलेला आ s  बघून मीच म्हणालो, हा सेकंदाचा इतका छोटासा भाग आपल्या पूर्वजांनी का बरं शोधला असावा? म्हणजे एकतर त्यांनी त्या काळी म्हणजे हजारोंवर्षांपूर्वी अतिवेग धारण केलेला असावा किंवा पेशी विभाजन किंवा अणु विभाजन यांसारख्या अतिसूक्ष्म हालचाली ते निरीक्षित असावेत नाही का ?

त्याला तश्या संभ्रमावस्थेत सोडूनच मी फ्रेश होण्यासाठी उठलो.


अपेक्षेप्रमाणे प्रमाणे चिरंजीव माझ्या मागे आले आणि म्हणाले आपण कालाची सुक्ष्मता बघितली आता मला कालाची महानता पण नक्कीच ऐकायचीय ते सुद्धा जेवायच्या आधी. मला समाधान वाटलं. किचन मध्ये डोकावून जरा अंदाज घेतला आणि त्याला सांगायला  सुरुवात केली.


आपण बघितले की 

24 तास म्हणजे 8 प्रहर म्हणजे 1 अहोरात्र

अश्या 15 अहोरात्री म्हणजे 1 पक्ष (कृष्ण आणि शुक्ल)

अश्या दोन पक्षांचा 1 मास (चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन)

असे 2 मास मिळून 1 ऋतु (वसंत, ग्रीष्म, वर्षा, हेमंत, शरद आणि शिशिर)

3 ऋतूंचे 6 मास म्हणजे 1 अयन (उत्तरायण आणि दक्षिणायन)

असे 6 ऋतु मिळून 12 मास म्हणजे 1 संवत्सर

अशी 100 संवस्तरे म्हणजे सामान्य मनुष्याच्या आयुष्याची परम मर्यादा !

मी असे म्हंटल्यावर तो म्हणाला हा, म्हणजे 100 च्या पुढे त्यांना मोजता येत नव्हते. पण आत्ता आपल्याला तर किलो, मेगा, गिगा, टेरा, पेटा, एक्सा,झेटा आणि योट्टा पर्यन्त मोजता येतंय. त्यावर मी त्याला हसून म्हटले अरे ही डेसिमल्स युनिट्स आहेत, त्यांना स्पेसिफिक नावं आहेत का ? मी असं विचारल्यावर परत एकदा त्यानं मला आव्हानात्मक सुरात मला विचारलं मग पूर्वीच्या लोकांना तरी नावं ठाऊक होती का ? मी हसलो आणि म्हणालो तेच तर सांगत होतो मी पण तूच मध्ये थांबवलेस. जरासं वरमून तो म्हणाला बरं बरं सांगा.


तर मानवाचं 1 वर्ष किंवा संवत्सर म्हणजे देवाचा 1 दिवस

असे 360 देव दिवस म्हणजे देवाचे1 वर्ष

देवाचं1 वर्ष म्हणजे मानवाची 360 वर्षं

अशी देवांची 1200 वर्ष म्हणजे 1 कलियुग अर्थात मानवाची 4,32,000 वर्ष

देवांची 2400 वर्षं म्हणजे 1 द्वापारयुग म्हणजे मानवाची 8,64,000 वर्ष

देवांची 3600 वर्ष म्हणजे 1 त्रेतायुग म्हणजे मानवाची 12,96,000 वर्ष

देवांची 4800 वर्ष म्हणजे 1 कृतयुग किंवा सत्ययुग म्हणजे मानवाची 17,28,000 वर्ष

देवांची 12000 वर्ष म्हणजे 1 चौकडी अर्थात मानवाची 43,20,000 वर्ष

अश्या 1000 चौकड्या म्हणजे ब्रह्माचा 1 दिवस म्हणजे मानवाची 4,32,00,00,000 वर्ष

अश्याच 1000चौकड्या म्हणजे ब्रह्माची 1 रात्र म्हणजे मानवाची 4,32,00,00,000 वर्ष

अश्या 2000 चौकड्या म्हणजे ब्रह्माची 1 अहोरात्र म्हणजे मानवाची 8,64,00,00,000 वर्ष (8 अब्ज, 64 कोटी वर्ष)

थोडक्यात म्हणजे मानवाची 8.64 अब्ज वर्ष. समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा त्यांच्या दासबोधात (दा.६.४.१ ते ४) पण हेच सविस्तर सांगितलंय. चिरंजीवांची अवाSक झालेली अवस्था बघून त्याला म्हटलं आज आपण इथंच थांबू, बाकीचं नंतर कधीतरी सांगीन काय ? त्यानंही मुकाटपणे मन हलविली.


आपल्या पृथ्वी निर्माणाची वर्ष एव्हढीच असावीत का आणि त्याची पूर्ण जाणीव आपल्या पूर्वजांना होती का? त्या मुळेच त्यांनी इतकं कालमापन आपल्या वेदां मध्ये, पुराणात विस्तृतपणे पुढील पिढ्यांसाठी लिहून ठेवलंय का असा विचार करून मी पण जेवायला उठलो. 


ऋण निर्देश : १) श्रीमद्भागावतातील विज्ञान दर्शन (रामकृष्ण गोविंद जानकर आणि डॉ. विजय भटकर)

                  २) वैदिक विज्ञान आणि वेदकालनिर्णय (डॉ. प. वि. वर्तक)


महेश मंडलीक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा