नवरात्रीतले_नऊ_रंग_धार्मिक_नाहीत, #हा_तर_होता_मार्केटिंग_फंडा!

नवरात्र आली की सगळीकडे नऊ दिवस नऊ रंगांची उधळण दिसून येते. ट्रेन, रस्ते, ऑफिस, सगळं एकेका दिवशी एकाएका रंगात दिसतं. बघायला छान वाटतं. बऱ्याच ऑफिसमधे तर एचआर असे नवरंग व त्यानुसार स्पर्धा व बक्षिसे ठेवतात. एकूण वातावरण उत्साही दिसत असतं.


पण याची सुरुवात झाली कशी, हे रंग कोण ठरवतं, याबाबत सर्वांनाच माहीत असतं असं नाही. छान वाटतं, छान दिसतं, टीम स्पिरीट, ते देवीचं असतं, आमच्यात करतात इथपर्यंत काहीही कारणं असतात. पण खरं काय ते बऱ्याच लोकांना माहीत नाही.


महाराष्ट्र टाईम्स वाले पानपानभर फोटो छापतात या दिवसांत. लोक खास फोटो काढून या पेपरकडे पाठवतात व तो छापून आला का पाहायला दुसऱ्या दिवशी पेपर खरेदी करतात. अगदी याच साठी महाराष्ट्र टाईम्स ने ही खेळी खेळली होती. पण असं कां केल्या गेलं? २००३ साली मटाचे संपादक असलेल्या भरतकुमार राऊतांचं या प्रश्नाचं उत्तर जाम खडबडायला लावणारं होतं. ते म्हणतात, यात धार्मिकता वगैरे काही नाही, तर लोकसत्तेच्या तुलनेनं घसरत चाललेला मटाचा खप वाढवण्यासाठी त्यांनी केलेली ही मार्केटिंग स्ट्रॅटेजी होती. राऊतांनी हेरला रोज ऑफिसला जाणार्‍या मध्यमवयीन बायकांचा वाचकवर्ग. स्त्रियांना टार्गेट करुन तो वाचकवर्ग वाढवायचा. झालं, रंग ठरले. ते जास्त आपलेसे, नवरात्रीत समरसणारे म्हणून वाटावे म्हणून दिवसाशी निगडीत देवी घेऊन तिचा रंग त्या दिवसासाठी निश्चित करण्यात आला. प्रत्येक दिवस एका देवीचा असे नऊ देव्यांमध्ये नऊ दिवस वाटून टाकले. आणि मग प्रत्येक देवीला एक रंग दिला. म्हणजे असं पाहा, दुर्गेची दुर्गाष्टमी, म्हणून तिचा एक रंग.  असा रंगोत्सवाला मस्त धार्मिकतेचा रंग चढत गेला. मग काय, महिलांना आकर्षित करण्यासाठी मग फोटोज, छान छान साडीतल्या मॉडेल्स हे सगळं रोजच्या मटाच्या पुरवणीत येऊ लागलं....पसरले नवरंग मुंबईवर. 


२००३च्या सुमारास  महाराष्ट्र टाईम्सने श्रावणक्वीन आणि नवरात्रीचे नऊ रंग हा प्रकार चालू केला. पहिले दोन-तीन दिवस मटा पुरवणीमध्ये त्या दिवसाच्या रंगाच्या सुंदरशा साडीमधल्या मॉडेलचे फोटो हे आकर्षण होतं. मग आलं तुमचेही असे ऑफिसमध्ये सगळ्यांनी एकाच रंगाचे कपडे घातल्याचे फोटो पाठवा म्हणून आवाहन. मग काय, बॅंका, शाळा , ऑफिसेस मधल्या ग्रुप फोटोजनी मटा पुरवणीची मधली दोन आणि कधी कधी शेवटचं पानही खाऊन टाकलं. 


२००३-०४ साली फक्त जाहिरातींतूनच नाही, तर अशा फोटोजमधूनही बातम्या हुडकून हुडकून वाचाव्या लागत होत्या. बघा, केवढं दिव्य होतं ते!!


ही त्यांची ट्रिक मात्र कमालीची यशस्वी ठरली. आजच्या घडीला ऑफिसमध्ये जाणार्‍या मध्यमवयीन बायकाच काय, घरी येणारी कामवाली आणि कॉलेजला जाणारी मुलं-मुली देखील हे कलर कोड्स पाळतात. सहज म्हणून सुचलेला हा मार्केटिंगचा उपाय आज १७ वर्षांनंतरही तितक्याच यशस्वीपणे चालू राहिलाय. 


आता तर हे लोण इतके पसरले की, मटाशिवाय इतरांनाही त्यात भाग घ्यावा लागला. मुंबई बरोबरच राज्यात इतर ठिकाणीही हे लोण पसरलं. 


मार्केटिंग गिमिक असो का काही असो, रंगीत शहरं बघायला छान वाटतात हे नक्की.


.....आणि हो रूढी व परंपरा सांगिवांगी कशा निर्माण होतात याचं हे उत्कृष्ट उदाहरण. काही वर्षांनी ही परंपरा संपूर्ण भारतात बघायला मिळाली तरी आश्चर्य वाटायला नको. नंतर नंतर तर ही परंपरा कधी व कशी सुरू झाली हे सुद्धा कुणाला कळणार नाही.


https://www.maayboli.com/node/63962


https://www.bobhata.com/lifestyle/secret-behind-navratri-colors-551?amp

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा