सांग तेव्हाही प्रेम करशील ना..

सुरकुतलेला चेहरा माझा  

पिकलेली असेल दाढी,

ओढून ताढून बांधलेली 

पैजाम्याची ढिल्ली होईल नाडी.. 


सांग कौतुक करून मनापासून   

तेव्हाही हँडसम म्हणशील ना ?

सांग तेव्हाही प्रेम करशील ना..


सैल झालेला झंपर 

अंगावर नावाला असेल साडी,

तुझाच नसेल भरवसा तुला 

आधाराला हाती येईल छडी...


लाजत मुरडत माझ्यासमोर 

ठुमकत ठुमकत तरी चालशील ना ?

सांग  तेव्हाही प्रेम करशील ना..


थकलेल्या खांद्यावरती माझ्या  

आयुष्य लादेल जेव्हा ओझं,

जिद्द वगैरे नावापुरतं  

जगणं होईल पुरतं खूज..


समाधान द्यायला माझ्या मनाला 

तेव्हाही मदत मागशील ना ?

सांग  तेव्हाही प्रेम करशील ना..


गोळ्या शोधत धडपडत असतील 

थरथरणारे तुझे हात,

आजोबा पडले पाय घसरून 

निरोप आणेल जेव्हा नात...


आधार शोधत भिंतीचा मग  

याच त्वेषाने उठशील ना ?

सांग  तेव्हाही प्रेम करशील ना..


तरुणपणाची सावली सरेल  

छळेल वार्धक्याचं ऊन,

केविलवाण्या चेहऱ्याने

पाहत राहील मुलगा सून...


गालात हसून आतासारखं

तेव्हाही सोबत चालशील ना ?

सांग तेव्हाही प्रेम करशील ना ?......💖

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा