व पु काळे

 1. भावनाधीन होऊन चालत नाही. माणसानं विवेक धरावा, व्यवहारी बनावं. भावना फार काळ उपयोगी पडत नाहीत ह्या जगात.’


2. भावनेला विवेकाची पराणी हवीच. स्वप्नाला जाग हवी.

3. समाधान मानून घेण्याची वृत्ती असलेला माणूस कधीच दु:खी होत नाही आणि पुष्कळदा स्वत:ला सुखी समजणारी माणसं ही केवळ सवयीनं सुखी झालेली असतात. काही ठराविक गोष्टींचा लाभ होणारी, जशी शेकडा नव्वद टक्के माणसे असतात, त्यांचे संसार चालतात, त्यांच्यात व आपल्यात फरक नाही, ही जाणीव असणं, ह्यानंच कैक लोक स्वत: सुखी आहोत असं मानतात.

4. मानसिक अस्वास्थ्य हे प्रत्यक्ष भोगत असताना जाणवत नाही; तर त्याचा लोप झाल्यावरच, त्या औदासीन्याचा आपल्यावर केवढा पगडा बसला होता हे जाणवतं!

5. मुलं मोठी झाली की दुरावली. जोपर्यंत ती परावलंबी असतात तोवर ती आईवडिलांची असतात.

6. जी जागा आपल्याला खूप सुरक्षित वाटते तीच गोत्यात आणते.

7. उत्तरं मिळवायची असली की पाठ फिरवल्यानं ती मिळत नाहीत, परिस्थितीला तोंड देऊन ती मिळवायची असतात

8. असामान्य समस्या, असामान्य उपायांनी सुटतात.

9. एखाद्या गोष्टीचा काही विशिष्ट अर्थ आपल्या मनात असला की इतर सगळीजणं त्याच अर्थानं त्या गोष्टीकडे पाहात आहेत की काय असली शंका यायला लागते.

10. उत्तम स्मरणशक्ती असणं हा केव्हा केव्हा शापच! सगळं कसं वैशाखातल्या उन्हासारखं लख्ख आठवतं.

11. तुमच्या मनाप्रमाणे वागत नाही म्हणजे बिघडला

12. पुरुष ही परमेश्वराची शक्ती, तर स्त्री ही त्याची प्रत्यक्ष मूर्ती

13. स्वास्थ्यापेक्षा आपत्तीच माणसाला अंतर्मुख बनवते, क्रियाशील करते.

तू भ्रमत आहासी वाया - वपू काळे

1. रडणं म्हणजे दुबळेपणाचं लक्षण नव्हे. मोकळेपणी रडायला धैर्य लागतं.


2. हसता हसता माणूस एका क्षणात थांबू शकतो. दुःखातली व्यक्ती रडणं एका क्षणात विसरू शकत नाही

3. एकाकीपण वेगळं, एकांत वेगळा. परिसराचं मौन म्हणजे एकांत. आणि परिवारात असतानाही निराधार वाटणं हे एकाकीपण.

4. सोन्याप्रमाणे आगीतून तावून सुलाखून पार होण्याची संधी म्हणजे, असं एखादं दुःख.

5. प्रियकर परिपूर्ण असतो. नवऱ्याला मार्यादा असतात. कारण संसार हा व्यवहार आहे. प्रियकराच्या बाबतीत संपूर्ण समर्पण असतं. ‘मी’ उरत नाही म्हणून संघर्ष नसतो. संसारात तसं होत नाही.’ ‘मी’ हा शब्द प्रेमात आणि भक्तीत उरत नाही.

6. प्रचिती आली की ती तुमची तत्त्वं होतात आणि तुमची तत्त्वं इतरांची थेअरी होतात.

7. कबुतराला गरुडाचे पंख लावता येत नाहीत. कदाचित् लावता येतीलही, पण गगनभरारीचं वेड रक्तातच असावं लागतं. आकाशाची ओढही दत्तक घेता येत नाही.

8. रडताना कुणी फोटो काढत नाहीत. रडणं भोगायचं असतं. हसणं उपभोगायचं असतं. ह्याच कारणासाठी आनंदाला परिवार हवा, सगेसोयरे हवेत. आनंदाला सहल हवी, दुःखाला घर हवं.

9. एखाद्या गोष्टीच्या अज्ञानाचं जितकं शल्य नसतं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त त्या अज्ञानावर कुणी बोट ठेवलं तर होतं. हे बोट जर अधिकारी व्यक्तीनं ठेवलं तर जळजळ जरा कमी. निदान मग ती व्यक्ती किमान देखणी हवी.

10. ज्या गोष्टींवर प्रेम करण्यात रिस्क नाही अशा गोष्टींवर प्रेम करणारी माणसं खूप असतात. खरं तर ते प्रेमच नाही. त्याला मालकी म्हणतात. कारण ते प्रेम सुरक्षित असतं. तिथं समर्पणाचा प्रश्न उद्‌भवत नाही

11. स्वतःजवळ जे असतं तेच माणूस दुसऱ्याला देऊ शकतो

12. ज्ञानी माणूस हयात असतो, तोपर्यंत तो धोकादायकच असतो. तो ढोंगांवर प्रहार करत राहतो. तो गेल्यावर त्याच्यापासून कसलाच वैचारिक उपद्रव नाही. मग त्याच्या आरत्या गायच्या, अभंग म्हणायचे, शेवटी पुतळे उभे करायचे. ज्ञानी माणसांना त्यांच्या हयातीत आणि मेल्यावरही कावळ्यांच्याच सहवासात राहावं लागतं. जिवंतपणी चोचा मारणारी माणसं आणि पुतळ्यांच्या नशिबी...

13. अगदी क्षुल्लक कारणासाठी, वेळ निभावून नेण्यासाठी माणसं इतकं खोटं बोलतात की तो त्यांचा स्वभावधर्म बनतो. अशी माणसं सतत मग तणावाखाली वावरतात.

14. पागल झाल्याशिवाय प्रेम संभवतच नाही. जिथं हिशोब नसतो, विचार नसतो, संयम नसतो, तिथंच प्रेमाचा उगम होतो. प्रेम महापुरासारखं असतं. तिथं किनारे हरवतात. जिथं तर्क आहे, तिथं स्वतःचा बचाव आला.

15. वस्तुत्त्वानं असणं आणि अस्तित्त्वानं असणं ह्यात फरक आहे.

16. ऑफिस म्हणा, घर म्हणा, तिथं वास्तुपेक्षा आपण मोठे असतो. मालकीचा अहंकार तिथं बोलतो. आपण क्षुद्र आहोत ह्याची जाणीव स्वतःला करून देण्यासाठीच समुद्राजवळ बसायचं असतं. निसर्गाची प्रत्येक निर्मिती भव्यच असते.

17. कोणत्याही माणसाला फसवणारा दुसरा माणूस नसतो. कुणाची हिंमतच नसते. आपण गुलाम व्हायला तयार असतो, तिथं फसतो. कोणत्याही क्षणी आपण आपलं मालक असलो पाह्यजे.

18. वस्तू वापरण्यापेक्षा, ती आपल्यापाशी आहे, ह्याचाच आनंद.

19. सर्वात मोठा धर्म कोणता ? -तर ‘प्राण आहे तोपर्यंत जगणं’ हाच धर्म मोठा.

20. निसर्ग रोज बदलतोय आणि निसर्गाचीच एक निर्मिती असूनही माणसाला उबग येतो, ह्याचं कारण काय ? -तर कालचा दिवस तो आजही घट्ट धरून ठेवतो. भूतकाळावर अलोट प्रेम. पार केलेलं दु:खही आठवत बसायचं

21. जो तुमचा आनंद वाढवतो, तो धर्म.

 नातरीं येथिचा दिवा । नेलिया सेजिया गांवा ।

 तो तेथें तरी पाडवा । दीपचि कीं ।।

या गावात तेवत असलेला दिवा जरी दुसऱ्या गावाकडे नेला तरी तो दिवाच असतो. प्रकाश हा त्याचा धर्म आहे. चहुकडे केवळ प्रकाशच देणारा जसा दिवा असतो

गुलमोहर - व पु काळे

1. आपत्ती पण अशी यावी की, त्याचाही हेवा वाटावा इतरांना – आणि व्यक्तीचा कस लागावा. पडून पडायचं तर ठेच लागून पडू नये – चांगलं दोनशे फुटांवरून पडावं. माणूस किती उंचीवर पोहचला होता ते तरी जगाला कळेल


2. प्रचंड आघातांनी माणूस तेवढा खचत नाही. कारण त्याच्या मनाची पूर्वतयारी झालेली असते. अनपेक्षित बारीकसारीक धक्क्यांनीच माणूस खचतो, कारण त्या प्रसंगांना तोंड देताना तो एकटा असतो.

3. एखाद्या प्रश्नाचं उत्तर देण्याची वेळ एकदाच येते. तो क्षण निसटू द्यायचा नसतो.

4. पहिलं दु:ख येतं ते डोळ्यांवाटे. पहिला मोह नजरेचा. ही नजर एकदा बिघडली की माणूस बिघडला

5. बाह्य जगावर, सजावटीवर भुललेला माणूस स्वत:त डोकावून पाहूच शकत नाही. पापमार्गाकडे वेगाने नेते ती दृष्टी.

6. आपली सतत कीव केली जाते यासारखी दु:खदायक गोष्ट नाही.

7. पोट भरण्यासाठी जेव्हा पुण्य धावून येत नाही तेव्हा पापच करावं लागतं.

8. चोरांना, दरोडेखोरांना किंवा खुन्यांना, एवढं माहीत असतं की देव काही जगात येऊन कुणाला सांगत बसत नाही. तो काही बोलतच नाही. तेव्हा देवाची भीती काही नाही. जी काय भीती आहे ती माणसाची माणसाला. माणूसच माणसाला केव्हातरी पकडतो. माणसाला चुकवलं म्हणजे झालं.

9. अनोळखी माणसंच ओळखीची होतात आणि ओळख नसतानाच्या काळातले प्रश्न विचारून केव्हा केव्हा बेजार करतात.

10. देवाला दु:ख म्हणजे काय हे कळलं असतं तर त्यानं ते निर्माणच होऊ दिलं नसतं.

11. आपण वाहतो म्हणून ढग हालचाल करतात, समुद्रावर लाटा येतात, वणवा भडकतो, पाचोळा उडतो, त्याची जाणीव वाऱ्याला नसेल का? तो वाहतोच.

12. पळून जाणं एकदम सोपं. तेव्हा ते केव्हाही करता येतं. पळण्याची वाट केव्हाही हाताशी आहे हे गृहीत धर आणि परत आपल्या घरी जा. आधी जे अवघड आहे ते सोडवायचा प्रयत्न कर. कारण सोपी गोष्ट आपल्या मालकीची आहे

13. खरं प्रेम कमी पडतं; पण खोट्या प्रेमाला तूट पडायचं कारणच नव्हतं. अभिनयच करायचा हेच जिथं ठरवलेलं तेव्हा कमी पडायचं कारणच नव्हतं.

14. आजारी माणसाच्या बुद्धीवर ताबा असतो तो त्रासलेल्या शरीराचा. आजारपणातले माणसाचे निर्णय कधीच व्यवहार्य नसतात.

15. प्रवासाला निघालेल्या माणसाला आपण फक्त स्टेशनपर्यंतच पोचवतो. पुढचा प्रवास त्यालाच करावा लागतो.

16. स्वत:च्या रूपाचा अहंकार जळाला तेव्हा इतर सौंदर्य दिसायला लागलं.

17. माणसं कृती विसरतात, पण हवेत विरणारे शब्द मात्र धरून ठेवतात.

18. जोडीदाराची निवड कानांनी करावी, डोळ्यांनी करू नये.

19. प्रेमाच्या राज्यात माणूस कधीच मोठा-वयस्कर होत नाही.

20. निरनिराळ्या लोकांच्या दृष्टिकोनातून आपण जर स्वत:ला पाहू शकलो, तर आपल्याला खूप नवे मित्र आपल्यातच मिळतील.

21. अति ऊ-तिला खाज नाही आणि अति ऋण त्याला लाज नाही.

22. मासळी आणि पाहुणा कितीही चांगला असला तरी तीन दिवसांनंतर वास मारू लागतात.

 चोखाळपण रत्नांचे । रत्नावरी किरणांचे ।

 तैसे पुढा मन जयाचें । करणें पाठी ।।

ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की रत्नाचे शुद्धपण जे असते तेच फार वेधक असते. त्यावर किरण पडल्यावर त्या शुद्धपणाला झळाळी प्राप्त होते. ती रत्नाची आभा अधिक चोखळ होते. अगदी तसेच काहींचे मन असते. शुद्ध, स्फटिकासारखे स्वच्छ आणि पारदर्शक, ते मन सतत प्रकाशत रहाते त्या रत्नासारखे. त्याची स्वयंप्रकाशी झळाळणारी कृती मग मागोमाग उमटतेच. पण प्रकाशाचा मार्ग ते रत्न पहिल्यांदा दाखवते.

 जैसा दीपे दीपु लाविजे । तेथ आदील कोण हें नोळखिजे । 

तैसा सर्वस्वे जो मज भजें । तो मी होऊनि ठाकी ।।

दिव्याने दिवा लावला की सर्वच दिवे उजळू लागतात आणि मग ह्या प्रकाशाच्या वाटेवरचा पहिला कोणता तेच लक्षात येईनासे होते. तसे कृष्णभक्तीत सर्वस्वाने बुडून गेलेला अर्जुन शेवटी श्रीकृष्णरूप होऊनच उरतो.

 सुखी संतोषा न यावें । दुःखी विषादां न भजावे ।

 आणि लाभालाभ न धरावें । मनामाजीं ।

सुखाचा वारा अंगावर आला म्हणून बेभान होऊन नाचू नये की दुःखाचा झंझावात अवघं आयुष्य समूळ नष्ट करायला लागला म्हणून विषादाचा विलाप करू नये. मनातल्या अंतर्मनातसुद्धा लाभ आणि हानी यांची चित्रे उमटू देऊ नयेत,