कविनंदन

कविजनसंस्तुत काव्यदेवते वंदन तव पायी
क्षराक्षराचे जननी, व्यक्त प्रणवाचे आई !

’बालकवीचा’ जीवननिर्झर जाता ओसरुनी
दूर्वांकुरपुष्पांची त्यावर चादर पसरूनी,

चंदेरी दरियाचे काठी प्रेमप्रळयात,
निजल्या ’रामा’ अक्षयतेच्या वेष्टुनि शेल्यात,

ह्या दोघा रस-रंगा घेउनि अंतर्हित होशी
कोठे ? मागे टाकुनि उघडा कविजन परदेशी.

जाशी का तू पडली पाहुनि तख्ते दोन रिती
चिरंतनाच्या निर्झरिणीवरि पैलाडापरती ?

शाश्वतेचे भरूनि पाणी आणावा कलश
कुणा भाग्यवंताचे तेणे न्हाणावे शीर्ष,

अम्लान प्रतिभेची अद्वय लेणी लेववुनी
स्वानंदाचे लगबग उतरुनि लिंबलोण वरुनी,

दोन्ही सिंहासनी तया एकाते बसवावे
प्रयाण करिती झालिस का तू देवी या भावे ?

कविजनसंस्तुत काव्यदेवि ये परतुनि लवलाही
मुग्धमधुर वसुधा ग ! सारखी वाट तुझी पाही !

आधुनिकांचे कविते बाई ! अझुनी तुजवरचा
रोष न सरता होई काही विद्वद्वर्यांचा.

नूतन चालीरीती नूतन भूषावेषांना
भावाविष्करणाच्या नूतन घेशी धाटींना.

बाळपणे तू उथळ जराशी, अल्लड वृत्तीची,
सौंदर्याची अस्फुट अंगे कोर्‍या रंगाची,

लाजेच्या सांजेचा नाही मुखमंडळि मेळ
अवगत नाही अझुनि चोरटा नेत्रांचा खेळ,

नटचंचल बावरा झडे फुलछडीचा न नाच
जाणपणाची अझुनि लागली नच मंदहि आच,

कोमल कलिकेमधली अस्फुट मधुसौरभसृष्टी
बादलछायेआडिल किंवा चंद्राची दृष्टी,

अथवा, दृष्टीपुढची अस्थिरसृष्टी बाळाची
लाट जणो तू स्वर्भूःसरितासंगमलीलेची.

प्रौढ कलाढ्यत्वाचे वारे अंगि न जरि वाजे
मुग्धदशेची चंचलता तुज कुलजेते साजे.

कारकसंधीरूपे व्याकरणातिल सूक्ष्मतर
रसरीत्यादिक साहित्यांतिल दगडांचा चूर,

बूझ कशी या नियमे व्हावी तव माधुर्याची,
अगाध लावण्याची, निस्तुळ रूपारीतीची ?

ह्रस्वदीर्घवेलांटीमात्राशास्त्री जी घेती
जुनी मापकोष्टके जराशी बाजुस सारा ती.

होता केव्हा, काही, किंचित्‌, संप्रदायभंग
रंगाचा बेरंग काय हा अथवा बेढंग ?

कवितेच्या साम्राज्यामधली ही का बंडाळी
तेणे होते काहो त्याची राखरांगोळी ?

शुद्ध मराठी धाटी साधो कोणा अथवा न
गीर्वाणप्रचुरा रचना ती केव्हाही हीन.

शब्दरूपसंपदा ’रांगडी’ वाळावी म्हणुनी,
’रांगड’ अथवा ’नागर’ हे तरि ठरवावे कोणी ?

संस्कृतभाषानियमांची का तुजवरि बळजोरी
स्वतंत्र अस्तित्व न तुजला की झाली वाढ पुरी ?

नागर कुल तव, नागर लोकी सारा व्यवहार,
नागर वाङ्मयदेशी सतत करिशी संचार.

इथुन आणखी तिथुनि आणिशी रत्‍नांचे हार
समृद्ध आम्हाकरिता करिशी भाषाभांडार

बिंदु बिंदु रक्ताचा, कण कण देहाचा, उमले,
विकास सौंदर्याचा र्‍हासानासाविण चाले !

अथांग अव्यक्तांतुनि होशी निजलीला व्यक्त
तुझे तूच निर्मिशी प्रसाधनशासन अभियुक्त.

मृगजळ पाणी भरुनि रांजणी पढिका फुंजू दे
सौंदर्याच्या कुंजी आम्हा रुंजी घालू दे.

कविजनसंस्तुत काव्यदेवि ये परतुनि लवलाही
मुग्धमधुर वसुधा ग ! सारखी वाट तुझी पाही

काव्य नव्हे शब्दांचा सुंदर नादमधुर मेळ
अर्थचमत्कृतिचाही नोहे डोंबारी खेळ.

निसर्गसृष्टीची सादृश्ये, नीतिपाठ भव्य,
थाटदार घाटाची रचना केवळ नच काव्य.

ऐश्वर्यात्मक सामर्थ्याची निर्माणक्षमता
अंतरंग ओथंबुन ओसंडे ती ’सुंदरता’

केवळ सौंदर्याची स्फुरणे प्रस्फुरणे दिव्य
जिव्हार हेच स्वानंदाचे. -’सौंदर्यचि’ काव्य.

या सौंदर्यस्फुरणा म्हणती ’चैतन्य-स्फूर्ती-
प्रसाद-भगवंताचे देणे-नैसर्गिक शक्ती’.

देवी शारदा हीच. न हे स्थल अभ्यासा साध्य
लोकोत्तर काव्याचे हेचि प्रसवस्थल आद्य.

यास्तव कविजन अहंभाव सोडोनी संपूर्ण
प्रसादसिद्धीसाठी पहिले करिती तुज नमन.

देवि ! जशी तू, तसे तुझे ते भक्तहि, मज पूज्य
वंदन माझे गतास, त्यासहि असती जे आज.


कवी - बी
कवितासंग्रह - फुलांची ओंजळ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा