वियुक्ताचा उद्धार (पाठान्तर)

राहे नित्य वसुंधरेस धरुनी हा भाग्यशाली गिरी;
यालागीं दयितावियोग न कधीं माझ्यापरी जाचितो,
वेलेला लहरीकरीं निरवधी हा अब्धि आलिंगितो,
कान्तेपासुनि मी परी विचारितों या दूरदेशान्तरीं !
चित्रोल्लास चिर प्रकाश सुभगच्छायासखीशीं करी;
त्यांचें संगमसौख्य पाहुनि मनीं मी फार वेडावतों;
पोटाशी धरुनी सदा सुरधुनी आकाश हा नांदतो,
त्याचा मत्सर उग्र दंश करितो वेगें मदभ्यन्तरीं !
तेणें व्याकुल होउनी झडकरी मी झांकितो लोचनें;
माया-ईश्वर, पुरुष-प्रकृतिही, वागर्थ, ऐशीं द्वयें-
सम्यग्युक्त बगून आंत, उघडीं त्रासून मी ईक्षणें,
तों नित्य द्युतिदेवतेसह रमे तो द्दग्पर्थीं सूर्य ये !
त्यायोगें विरहाग्रि फार भडके !- होतें नकोसें जिणें;
आतां हाय! न राहवे तुजविणें, कैसे करुं गे सये !


कवी - केशवसुत
वृत्त - शार्दूलविक्रीडित
- १६ डिसेंबर १९०१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा