यौवनयात्रा

अशी हटाची अशी तटाची
उजाड भाषा हवी कशाला?
स्वप्नांचे नव गेंद गुलाबी
अजून फुलती तुझ्या उशाला

अशीच असते यौवनयात्रा
शूल व्यथांचे उरी वहावे
जळत्या जखमांवरी स्मितांचे
गुलाबपाणी शिंपित जावे

जखमा द्याव्या जखमा घ्याव्या
पण रामायण कशास त्याचे?
अटळ मुलाखत जर अग्नीशी
कशास कीर्तन रोज धुराचे?

उदयाद्रीवर लक्ष उद्याची
पहाट मंथर तेवत आहे
तुझ्याचसाठी लाख रवींचे
गर्भ सुखाने साहत आहे!


कवी - कुसुमाग्रज

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा